#5मोठ्याबातम्या : मुस्लिमांनी अयोध्येचा नाद न सोडल्यास भारताचा सीरिया : श्री श्री रविशंकर

रविशंकर Image copyright Getty Images

आजच्या वृत्तपत्रातील आणि विविध वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे.

1. मुस्लिमांनी अयोध्येचा नाद न सोडल्यास भारताचा सीरिया - श्री श्री रविशंकर

अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा वेळीच न सोडवल्यास भारताचा सीरिया होईल, असं मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलं आहे. हे वृत्त लोकसत्ताने दिलं आहे. इंडिया टुडे टिव्हीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

सीरियाचं उदाहरण देत मुस्लिमांनी अयोध्येवरील दावा सोडावा असा सल्ला त्यांनी दिला आहे, अयोध्या ही जागा मुस्लिमांसाठी श्रद्धास्थान नाही, त्यामुळे त्यांनी सद्भावनेतून अयोध्येवरील दावा सोडावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

2. पर्रिकर यांना उपचारासाठी अमेरिकेत नेल जाण्याची शक्यता

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी आज संध्याकाळी अमेरिकेत नेलं जाण्याची शक्यता आहे. हे वृत्त आजतकनं दिलं आहे. उपचारासाठी त्यांना सध्या मुंबईत्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Image copyright Reuters

पर्रिकर यांनी एक व्हीडिओ रीलिज केला असून त्यात त्यांनी लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असं म्हटलं आहे.

3. त्रिपुरामध्ये लेनिन यांचा पुतळा पडाला

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी दुपारी त्रिपुरामधील बेलोनिया इथे असलेला लेनिन यांचा पुतळा बुलडोजरनं पाडण्यात आला.

ही बातमी द इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला असून 25 वर्षांनंतर प्रथमच इथं डाव्या पक्षांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जय अशा घोषणा देत हा पुतळा पाडल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

भाजपनं मात्र डाव्यांच्या दडपशाही खालील लोकांनी स्वतःच हा पुतळा पाडल्याचा दावा केला आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तपन दत्त यांनी हा पुतळा पाडल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे तुकडे केले आणि पुतळ्याच्या शिराचा वापर फुटबॉलसारखा केला, असं म्हटलं आहे.

4. जयललिता यांची पोकळी भरून काढण्यासाठी राजकारणात : रजनीकांत

तमिळनाडूच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढण्यासाठी मी राजकारणात आलो आहे, असं प्रतिपादन अभिनेते रजनीकांत यांनी केलं आहे.

Image copyright AFP

चेन्नईमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे त्यांची भूमिका मांडली, असं फिनान्शियल एक्स्प्रेनं म्हटलं आहे. "जयललिता यांचं निधन झालं आहे तर करुणानिधी आजारी आहेत. तमिळनाडूला नेत्याची गरज आहे. परमेश्वर माझ्या बाजूनं असून मी ही पोकळी भरून काढेन," असं त्यांनी म्हटलं आहे.

5. इरफान खान दुर्मीळ आजाराने ग्रस्त

अभिनेते इरफान खान दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या आजाराविषयीची माहिती ट्विटरवर दिली आहे. या संदर्भातील वृत्त डीएनए या इग्रंजी वृत्तपत्रानं दिलं आहे.

Image copyright Getty Images

इरफान खान यांनी म्हटलं आहे की, "या आजारची माहिती 15 दिवसांत समजू शकेल. या कठीण प्रसंगी कुटुंबीय आणि मित्र माझ्यासोबत आहेत. माझ्यासाठी प्रार्थना करावी."

माझ्या आजाराबद्दल कसलेच अंदाज व्यक्त करू नका, मीच माहिती देईन, असं ही त्यांनी म्हटलं असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)