भगतसिंगांच्या आयुष्यातल्या या 5 घटना स्पष्ट करतात लेनिन यांचा प्रभाव

  • गणेश पोळ
  • बीबीसी मराठी
भगतसिंग आणि लेनिन

फोटो स्रोत, CHAMANLAL/TOPICAL PRESS AGENCY

21 जानेवारी 1930 रोजी भगत सिंग यांना न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा ते गळ्यात लाल स्कार्फ घालून आले होते. न्यायाधीश जागेवर बसताच त्यांनी 'लेनिन झिंदाबाद', 'समाजवादी क्रांतीचा विजय असो' अशा घोषणा दिल्या होत्या.

भगतसिंग यांच्यावर रशियन क्रांतीचे जनक लेनिन यांच्या विचारांचा किती प्रभाव होता? हे जाणण्यासाठी बीबीसीनं भगतसिंग यांच्या विचाराचे अभ्यासक दत्ता देसाई यांच्याशी बातचीत केली.

1. शेवटच्या दिवसात लेनिनच्या नावे पत्र

भगत सिंग यांना ब्रिटीश सरकारनं लाहोरमध्ये फाशीची शिक्षा दिली. त्यांनंतर त्यांचं पार्थिव कुटुंबीयांना परत दिलं नाही. त्यांना एका जंगलात अग्नी दिला गेला. त्याठिकाणी सध्या स्मारक बनवण्यात आलं आहे.

भगत सिंग यांनी त्याआधी लेनिन यांच्यासाठी एक टेलीग्राम पाठवला होता. त्यात ते लिहितात,"लेनिन दिनानिमीत्त सोव्हिएत रशियात होत असेलेला महान प्रयोग आणि लेनिन यांचे यश असंच पुढे जाण्यासाठी मन:पुर्वक सदिच्छा पाठवत आहे. आम्ही जागतिक क्रांतीकारी आंदोलनाचे भाग म्हणून स्वतःला जोडून घेऊ इच्छितो. श्रमिक सत्तेचा विजय होवो भांडवलशाहीचा नि:पात होवो."

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE

2. बालवयातच लेनिन यांच्या विचारांचे संस्कार

लहानपणापासूनच भगतसिंग यांच्यावर लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव होता. वयाच्या दुसऱ्यातिसऱ्या वर्षापासून त्यांना त्यांचे क्रांतिकारी काका अजित सिंग यांच्याकडून समाजवादाचे धडे मिळाले. पुढे गदर पार्टीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव झाला.

भगतसिंग चौथीत गेले तेव्हा त्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांवरील जवळजवळ 50 पुस्तकं वाचली, काकांनी एकत्र केलेली रशियन क्रांतीवरील वर्तमानपत्रातील कात्रणं त्यांच्या नजरेसमोरून जात होती. रशियामध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा भगतसिंग अवघ्या 10 वर्षांचे होते.

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE

भगतसिंग 17 वर्षांचे असताना त्यांनी विश्वप्रेम या नावानं लेख लिहीला होता, यामध्ये अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, मॅझिनी, महात्मा गांधी, लेनिन यांच्याविषयी लिहीलं होतं. त्यांच्यामते विश्वबंधुत्व म्हणजे साम्यवाद. विश्वप्रेम म्हणजे जागतिक पातळीवरची समानता. लेनिन हे या विश्वबंधुत्वाची बाजू उचलू धरणारे होते.

3. रशियन क्रांतीचा प्रभाव

1930-31 दरम्यान तुरुंगात असताना भगतसिंग यांनी डायरी लिहीली. ती डायरी नंतर जेल अधिकाऱ्यांच्या सही, शिक्क्यांसहीत प्रकाशित करण्यात आली. त्यात त्यांनी लेनिन यांच्या पुस्तकातली अनेक अवतरणं लिहीली आहेत. कामगार वर्गाची क्रांती (proletariat revolution) म्हणजे काय? लेनिनची साम्राज्यवादाची व्याख्या काय होती? क्रांतीची कार्यपद्धती आणि डावपेच कसे असावेत, याबाबात त्यांनी लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

महत्त्वाचं म्हणजे भगतसिंग यांची साम्राज्यवादाची समज केवळ वसाहताविरोधात किंवा ब्रिटिशांविरोधात नव्हती. त्यांच्या मते भांडवलशाहीची जागतिक पातळीवर मक्तेदारी वाढते, तेव्हा एक देश दुसऱ्या देशावर वर्चस्व करून शोषण करतो.

लेनिन यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांच्या 'हिंदुस्तान समाजवादी प्रजासत्ताक संघटनेनं' (HSRA) ब्रिटिशांविरोधात डावपेच आखले. ब्रिटीश राजवटीला या डावपेचांनी नेस्तनाबूत तर करता आलं नाही. त्यांना फाशी देण्यात ब्रिटीश यशस्वी झाले, पण संघटनेच्या या डावपेचांमुळे ब्रिटीशांचं खरं स्वरूप पुढे येत गेलं आणि भारतीय जनेतेमधलं ब्रिटीश राजवटीबद्दलचं भय नाहीसं झालं.

4. इन्कलाब झिंदाबाद

'साम्राज्यावाद मुर्दाबाद' (down with imperialism), 'इन्कलाब झिंदाबाद' (long live revolution) 'सर्वहारा झिंदाबाद' (Long live proletariat) या घोषणा लेनिन आणि रशियन क्रांतीतून प्ररित होऊन घेतल्या गेल्या होत्या. त्या पुढे भगतसिंग आणि त्यांच्या संघटनेनं देशभरात लोकप्रिय केल्या.

5. थांबा! एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाशी बोलत आहे...

भगतसिंग यांना फाशी देण्याच्या 2 दिवस आधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी वकीलांकडे लेनिनच्या चरित्राची मागणी केली. अंतिम दिवशी जेलर त्यांना बोलवायला आले तेव्हा भगतसिंग यांच्या हातात लेनिनचं चरित्र होतं. जेलरनं चला म्हटल्यावर, "ठहरो, एक क्रांतीकारी की दुसरे क्रांतीकारी से मुलाकात हो रही है," असं म्हणून त्यांनी पुस्तकाची शेवटची पानं संपवली आणि कोठडीतून बाहेर पडले.

फोटो स्रोत, AFP

"भगतसिंग यांच्यासाठी लेनिन हे महान क्रांतीकारी होते. भारतात श्रमिक आणि शेतकऱ्यांची क्रांती करण्यासाठी लेनिनचे विचार उपयोगी ठरू शकतात, असा त्यांचा दावा होता," असं दत्ता देसाई सांगतात.

"लेनिन हा जागतिक पातळीवर आपल्यापेक्षा परिपक्व आणि जगाला दिशा देणारा नेता म्हणून त्यांच्याविषयी भगतसिंग यांना अपार आदर होता," असं ते पुढे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)