सोशल : रविशंकरांच्या अयोध्या विधानाला काही वाचकांचा पाठिंबा, तर काही म्हणतात 'आर्ट ऑफ आतंक'

श्री श्री रविशंकर Image copyright Mark Wessels/AFP/GettyImages
प्रतिमा मथळा श्री श्री रविशंकर

अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा न सुटल्यास भारताचा सीरिया होईल, असं वक्तव्य करणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

NDTVला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, "जर न्यायालयानं सांगितलं की या जागेवर बाबरी मशीद होती, तर लोक ते मान्य करतील का? 500 वर्षांपासून मंदिराची लढाई लढणाऱ्या बहुसंख्याक हिंदूंसाठी ही कडू गोळी सारखं असेल. अशा परिस्थितीत हिंसाचार होऊ शकतो. मुस्लिमांसाठी हे श्रद्धास्थळ नाही. मुस्लिमांनी सद्भावनेतून ही जागा सोडून द्यावी."

तसंच कोर्टाच्या निकालाआधीच मुस्लिमांनी स्वतःहून अयोध्येतली जागा हिंदूंकडे द्यावी, असा उपायही श्री श्री रविशंकर यांनी सुचवला आहे. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं असून काँग्रेससह अनेक पक्षांनी यावर टीका केली आहे.

याच विधानाबाबत BBC मराठीने वाचकांना त्यांचं मत विचारलं होतं.

त्यावर काहींनी भारताचा सीरिया कधीच होऊ शकत नाही, असं ठामपणे सांगत श्री श्री रविशंकर यांचं म्हणणं खोडून काढलं आहे. तर काहींनी 'आर्ट ऑफ आतंक', 'श्री420' असं म्हणून त्यांना संबोधलं आहे. अशाच प्रतिक्रियांचा घेतलेला हा आढावा.

नसिम शेख यांनी डॉ. विनय काटे यांनी लिहिलेली एक पोस्ट शेअर केली आहे. ते लिहितात, "अयोध्येच्या विवादाची न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात आहे, तेव्हा रविशंकर यांच्यासारखे आणि त्यांनी विकत घेतलेल्या काही मुस्लीम मौलानांसारखे स्वयंघोषित शहाणे कोर्टाच्या बाहेर तोडगा काढण्याच्या गोष्टी करत आहेत."

"वास्तविक पाहता रविशंकर आणि हे मौलाना यांचा या केसशी कसलाही संबंध नाही, कारण ते या खटल्यात पक्षकारच नाहीत. सत्तेच्या आसपास राहून फायदे मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी यांचे हे फालतू उद्योग सुरू आहेत, ज्याला सुप्रीम कोर्ट मुळात भीक घालत नाही," असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.

Image copyright Facebook

तर नसीम शेख यांच्या दिलेली प्रतिक्रियेशी चेतन पाटील, अशोक काटकर आणि माधव पोस्टे सहमत असल्याचं दिसत आहे.

"आपल्या देशात कायद्याला स्थान सर्वोच्च आहे. न्यायव्यवस्थेचा याबाबतचा अंतिम निर्णय आपणा सर्वांना मान्य करावाच लागेल. सर्वांनीच थोडा धीर धरायला हवा आणि या "बुवांनी" बोलण्याआधी थोडं तारतम्य बाळगायलाच हवं होतं," अशी प्रतिक्रिया चेतन पाटील यांनी दिली आहे.

"रामजन्मभूमीच्या ठिकाणी झालेल्या उत्खननातून हे सिद्ध झालं आहे की बाबरी मशीदीखाली राम मंदिराचा पाया आहे. तसंच इस्लाममध्ये जोर-जबरदस्ती करून, धमकावून, हिसकावून, कोणाच्या जागेवर कब्जा करून, एखादी वास्तू पाडून त्याचा पाया वापरून बांधलेली मशीद ही मान्य होत नाही. अशा मशिदीत अदा केलेला नमाजही ईश्वराला मान्य नाही. तेव्हा आता मुसलमानांनी जास्त नं ताणता मोठेपणा दाखवून आपला हक्क सोडून द्यावा," असं मत कुशल राणे यांनी व्यक्त केलं आहे.

"भारताचा सीरिया कधीच होऊ शकत नाही. कारण भारतात सर्वोच्च भारतीय 'राज्यघटना' आहे," असा विश्वास हर्षल ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. तर "सीरियासारखी परिस्थिती नक्कीच होणार नाही, परंतु अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यकांच्या आस्थेचा मान राखून, मनाचा मोठेपणा दाखवला तर दोन समाज एकत्र नक्कीच येतील," असं सुशील सुळे सांगतात.

"हे अध्यात्मिक गुरू लोकांच्या टाळूवरच लोणी खाऊन गडगंज होतात, पण खरी अध्यात्मिक शक्ती त्यांना माहितीच नसते. देशात शांतता नांदावी यासाठी कार्य करायचं सोडून यांच्या तोंडी हुकूमशाही भाषा येतेच कशी?" असा सवाल पूजा तांबे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

"भारतीय संविधानानुसार भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. हीच आपली जमेची बाजू आहे. तरीही कट्टर धर्मांध शक्तीला वेळीच ठेचलेलं बरं," असं अभिषेक रुके यांनी म्हटलं आहे.

तसंच, पूजा यांनी आपल्या प्रतिक्रियेतून लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. "उद्या यांच्याच आडून या देशात दंगली घडवून आणल्या जाऊ शकतात. हे लोक परदेशात पळून जातील आणि आपली लेकरं-बाळं या दंगलीच्या भक्ष्यस्थानी पडतील. त्यामुळे सावध राहा."

Image copyright Facebook

आंतकवादचा नवीन चेहरा, 'आर्ट ऑफ आतंक, श्री420'? अशी उपरोधक प्रतिक्रिया मिर्झा नद्वी यांनी दिली आहे. तर आम्हाला मंदिर-मशिदींपेक्षा शाळा, रुग्णालयांची आवश्यकता असल्याचं गोविंद गडियार यांनी म्हटलं आहे.

सचिन सावंत म्हणतात, "हे स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणून घेतात, आणि देशात असं विधान करून असंतोषाचं वातावरण निर्माण करतात."

तर संदीप पवार यांनी "काहीही हं श्री" अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

तु्म्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)