त्रिपुरा ग्राऊंड रिपोर्ट : 'मार्क्स, लेनिन, स्टॅलिन यांना जावं लागेल'

लेनिन पुतळा Image copyright KIRILL KUDRYAVTSEV/AFP

"कार्ल मार्क्स, लेनिन, स्टॅलिन. या सर्वांना आता जावं लागेल. पुतळे गेले आहेत आता रस्त्यांना दिलेली त्यांची नावसुद्धा बदलली जातील. त्यांच्याबद्दल शालेय पुस्तकांतून जे शिकवलं जातं तेही बदललं जाईल."

ही प्रतिक्रिया आहे दक्षिण त्रिपुरातल्या बिलोनिया इथले भाजपचे नव्याने निवडून आलेले आमदार अरुण चंद्रा भौमिक यांची.

त्रिपुराच्या दक्षिण भागाला लेनिनग्राड म्हटलं जातं, तिथं आता 'लेनिन' नाहीत. ईशान्य भारतातला एकेकाळचा डाव्यांचा गड म्हणून ओळख असलेल्या त्रिपुरात लेनिन यांचे पुतळे पाडले जात आहेत.

Image copyright TWITTER

भारतीय जनता पक्ष युतीच्या विजयानंतर हे घडत आहे. दोन दशकांच्या सत्तेनंतर राज्यात डावे 'अल्पसंख्याक' झाले आहेत. उजव्या विचारांचे लोक त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि कार्यालयांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप डावे करत आहेत.

बिलोनिया कॉलेज चौकातला लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला. लेनिन यांचा पाडण्यात आलेले हा पहिला पुतळा आहे. दक्षिण त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे बासुदेब मजुमदार चार वेळा निवडून आले होते. यावेळी भाजपचे भौमिक यांनी त्यांचा 753 मतांनी पराभव केला. रविवारी सकाळी त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एका जेसीबीचा ताबा घेतला आणि लेनिन यांचा पुतळा पाडून टाकला.

तर सोमवारी सायंकाळी सब्रूम इथं लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला. हे गावसुद्धा दक्षिण त्रिपुरामध्ये आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळापासून 150 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

या घटनेनंतर शनिवारी बिलोनियामध्ये जिल्हा प्रशासनानं शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, याशिवाय कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेशही लागू केले आहेत.

रस्त्यांवर शुकशुकाट, दुकानं बंद

इथं रस्त्यांवर शुकशुकाट होता आणि दुकानं बंद होती. वयाच्या विशीत असलेली एक तरुणी चालवत असलेलं दुकान सुरू होतं.

प्रतिमा मथळा बिलोनिया इथलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शांतता आहे.

कॅमेरे पाहताच ती पटकन म्हणाली, "मी तिथं नव्हते. माझ्या कुटुंबातलंही कुणी तिथं नव्हतं. मी काहीही पाहिलेलं नाही."

हे स्थळ पोलिसांच्या छावण्यांपासून अगदी जवळ आहे. शिवाय पोलीस अधीक्षकांचं कार्यालय इथून जवळ आहे. असं असतानाही जमावाचा उन्माद सुरूच होता, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षात ही घटन पाहणाऱ्या व्यक्तीनं दिली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय इथून जवळच आहे. पण हे कार्यालय बंद होतं आणि इथंही शुकशुकाट होता.

इथून दुचाकींचा एक ताफा जात होता. मी काय करत आहे, हे विचारण्यासाठी थांबले. मी त्यांना या पुतळा पाडण्याच्या घटनेबद्दल विचारले. पण त्यांनीही त्यांना काही माहीत नसल्याचं सांगितलं.

पण या दुचाकी चालकांपैकी काही जण पुतळा पाडला जात असताना तिथं होते, अशी माहिती एका स्थानिक दुकानदारनं दिली.

प्रतिमा मथळा इथल्या रस्त्यांवर शांतता आहे.

बिलोनियातील भाजपच्या कार्यालयात रेलचेल होती. कार्यालयाचं काम पाहणारे शंतनू दत्त म्हणाले की पुतळा पाडण्याच्या घटनेत भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता. "मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे टीशर्ट घालून हे कृत्य केलं. भाजपला बदनाम करण्यासाठी हे कृत्य करण्यात आलं आहे," असं ते म्हणाले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दीपंकर सेन म्हणाले सर्वसामान्यांच्या कराच्या पैशातून उभारण्यात आलेले लेनिन यांचे पुतळे युक्रेनमध्येही पाडण्यात आले होते. इथं डाव्या पक्षांचे कार्यकर्ते दहशतीमध्ये आहेत, असं त्यांनी सांगितलं.

बिलोनियातून निवडणून आलेले भाजपचे आमदार अरुण भौमिक म्हणाले, "ज्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला अशा भारतीय नायकांचे किंवा दिन दयाळ उपाध्याय यांच्या सारख्या भारतीय विचारवंतांचे पुतळे आम्ही उभारणार आहोत."

Image copyright TATHAGATA ROY @TWITTER

डावे म्हणतात हे सर्व राज्यपाल तथागत रॉय यांनी केलेल्या ट्वीटनंतर सुरू झालं. "लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार जे करू शकतं ते दुसरं लोकशाही सरकार बदलू शकतं," असं ट्वीट रॉय यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)