ब्लॉग : वीर्य की पीरियड ब्लड, त्या फुग्यांत काय भरलं होतं?

फुगे Image copyright Getty Images

माझ्या नखांमधला आणि केसांमधला रंग बऱ्यापैकी उतरला आहे, पण वर्तमानपत्र उघडताच होळीच्या आनंदाचा बेरंग करणारी बातमी नजेरला पडली.

इंडियन एक्सप्रेस मध्ये एका 21 वर्षांच्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची बातमी होती. त्यानं वीर्य भरलेला फुगा एक मुलीवर फेकल्याचा संशय आहे.

या फुग्यात नेमकं काय होतं हे अजून सिद्ध झालेलं नाही. केंद्रीय फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये ते तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

दिल्लीतल्या प्रख्यात लेडी श्रीराम कॉलेजच्या एका विद्यार्थिनीवर वीर्य भरलेला फुगा फेकण्यात आल्याची बातमी पहिल्यांदा वाचली तेव्हा मला किळस वाटली होती.

पण जसजसा होळीचा सण जवळ येऊ लागला तस तसा हा एक टिंगलीचाच विषय बनला. होळीच्या दिवशी तर लोक एकमेकांना विचारत होते, "फुगा मारण्याआधी, तुझ्या फुग्यात काय भरलंय ते सांग?"

एका डॉक्टरनं ट्विट केलं की, या आरोपात काहीही तथ्य नाही. कारण वीर्य हवेच्या संपर्कात येताच घट्ट होतं आणि पाण्यात टाकलं तर विरघळून जातं.

परंतु, गूगल या सर्च इंजिनलाही हाच प्रश्न विचारला, वीर्य पाण्यात मिसळलं तर काय होईल? त्यावर उत्तरादाखल जे लेख आले त्यापैकी काही लेखात वीर्य पाण्यात टाकल्यास ते घट्ट होतं आणि पाण्यात राहू शकतं, असं म्हटलं आहे.

सखोल माहिती मिळाली नाही. कारण यावर इतक्या बारकाईनं शोध घेण्याची गरजच या कथित घटनेच्या आधी फार कोणालाच वाटली नसणार.

हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही. या अशा कृत्याच्या विरोधात दिल्ली विश्वविद्यालयाच्या विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या, त्याचवेळी 'पिरीयड ब्लड' भरलेल्या फुग्यांच्या विरोधात काही तरुणांनी फेसबुकवर व्यक्त होणं सुरू केलं.

एका पोस्टमध्ये मुलानं लिहिलं की, दिल्ली विद्यापीठीच्या जवळ काही मुलींनी त्याच्या पाठीवर फुगा मारला. त्यामुळे त्याचा टी-शर्ट लाल झाला. तो लाल रंग 'पिरीयड ब्लड'चा होता, असा आरोप त्यानं केला. त्यावर खूप कॉमेंट आल्या आणि ते चांगलंच शेअरही केलं गेलं.

काही मुलींनी म्हटलं की अशाप्रकारे 'पिरीयड ब्लड' एकत्र करून फुग्यात भरणं शक्य नाहीच, शिवाय खूप महिन्याचं 'पिरीयड ब्लड' गोळा करावं लागेल.

त्यावर मुलं म्हणाली, फुगे भरण्याएवढं वीर्य गोळा करायलाही खूप दिवस लागतील.

लेडी श्रीराम कॉलेजच्या मुलींना फुगे मारणारी व्यक्ती मुलगा नसून मुलगीच असल्याचं आणि तिनं माफीही मागितल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा हे सगळं प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं.

थोडी चौकशी केल्यावर माहिती मिळाली ती अशी की, माफीचं प्रकरण वेगळंच होतं आणि वीर्यवाल्या फुग्याशी त्याचा काही संबंध नव्हता. सांगोवांगीच्या बातम्या आणि विज्ञानाचं अर्धवट ज्ञान यावर वाढणाऱ्या याविषयावरील वादानं टिंगलीचा रंग कधी घेतला ते कळलंच नाही.

वाटेल त्या चर्चा सुरू झाल्या, वीर्यानं होळी खेळली तर पौरुषावर परिणाम होईल असले काही वॉट्सअप मेसेज फिरू लागले.

तिथं रस्त्यावर फुगे मारणं सुरूच होतं. त्यात मुलंही होती आणि मुलीही.

Image copyright Getty Images

फुगा मारल्यावर त्यातून उडणाऱ्या शिंतोड्यांकडे माझं लक्ष होतं...त्याचा रंग, वास, दुर्गंध हे सगळंच पाहात होते.

कदाचित पुरुषही करत असावेत.

फुग्यात काय आहे ते कळल्यावर मगच ठरवू... किती राग किंवा किळस वाटायला पाहिजे ते!

होळीच्या आधी मी रिक्षातून जात होते, तेवढ्यात स्कूटरवर दोन तरुण आले. त्यावर पाठी बसलेल्या मुलानं त्याचा हात माझ्या छातीवर मारला. हातातला फुगा फुटला.

माझे कपडे भिजले, जोरात बसलेल्या हाताच्या फटक्यामुळे दुखलंही. त्या मुलांनी शिटी वाजवली आणि स्कूटरचा वेग वाढवून पळून गेले.

फुग्यात फक्त पाणीच होतं. पण मला असं वाटलं की, माझ्यावर कोणीतरी चिखल फेकलाय आणि माझ्या शरीराचा बेरंग केला आहे.

एका फटक्यात गेल्या काही दिवसातला मनातला गोंधळ दूर झाला. माझ्या रागाचं कारण फुग्यात वीर्य आहे की पिरियड ब्लड याच्याशी काही देणंघेणं नाही.

मला होळी आवडते. पण मला त्या व्यक्तीबरोबर शिवाय त्यावेळी रंग आणि पाण्याचा हा सण खेळायचा नव्हता, तेव्हाच माझ्यावर फुगा मारण्यात आला. माझी त्याला परवानगी नव्हती.

बस. एवढंच तर होतं. माझी परवानगी असणे किंवा नसणं.

होळीला फुगे मारायचे की नाहीत, त्या फुग्यात वीर्य किंवा पीरियड ब्लड टाकण्याएवढ्या खालच्या स्तरावर जाण्याचं काही कारण नव्हतं.

समोरच्याला होळी खेळायची नसेल तर त्याला वाईट वाटणारचं, मग त्या फुग्यात काही का भरलेलं असेना!

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)