महिला दिन विशेष : ‘पोलीस पाटील झाले तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आनंद सासरच्यांना झाला’

 • प्राजक्ता ढेकळे
 • मुक्त पत्रकार
शमिता धाईंजे

फोटो स्रोत, Prajakta Dhekale

फोटो कॅप्शन,

शमिता धाईंजे

सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या शिंदेवाडी या छोट्याशा गावात राहणाऱ्या शमिता धाईंजे यांच्या कधी ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की त्या कधी पोलीस पाटील बनतील. गावातल्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून त्या काम करत होत्या. 39 वर्षांच्या शमिता यांना तीन मुलं आहेत, त्यांच्या मोठ्या मुलीचं सात महिन्यांपूर्वीच लग्न सुद्धा झालं.

पण पोलीस पाटील पदाची परीक्षा दिली आणि त्याचं आयुष्य बदलूनच गेलं.

घरातल्या निर्णय प्रक्रियेत फारसं स्थान नसलेल्या या महिलेना गावाच्या निर्णय प्रक्रियेत अचानक महत्त्व प्राप्त झालं.

"माझं मालक रिक्षा चालवतात आणि आमचं किराणामालाचं दुकान आहे. माझं शिक्षण अकरावीपर्यंत झालं आहे. पण या पदाची भरती निघताच माझ्या मालकांनी माझा परीक्षेचा फॉर्म भरला" शमिता सांगतात.

पदाचा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेची तयारी करावी लागणार होती. परीक्षा पास होण्याचं त्यांना सगळ्यांत जास्त टेन्शन होतं. कारण शिक्षणानंतर अनेक वर्षांनी त्या परीक्षा देणार होत्या. त्यात त्यांची दोन मुलं मुलं पदवीचं शिक्षण घेत होती. त्यामुळे नापास झाले तर चुकीचा मेसेज जाण्याची भीती त्यांना सतावत होती.

फॉर्म भरल्यावर लगेच परीक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असणारी चालू घडामोडीचं पुस्तक आणली आणि कामातून जसा वेळ मिळ तसा त्यांनी अभ्यास सुरू केला.

"माझ्या दृष्टीनं परीक्षेत मेरीटमध्ये नाही आली तरी पास होणं महत्त्वाचं होतं. माझ्या प्रयत्नांना शेवटी यश मिळालं," त्या अतिशय उत्साहाने सांगत होत्या.

त्यांच्या कामाविषयी त्या पुढे सांगतात, "माळशिरस तालुक्यातल्या महिला पोलीस पाटलांमध्ये सर्वाधिक वय असलेली मी एकटीच आहे. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या महिलेला आपल्या गावच्या पोलीस पाटील होण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत 4000 ते 5000 लोकसंख्या असलेल्या गावात आमच्या समाजातून पहिल्यांदाच असं पद आम्हाला मिळालं आहे."

शमिता अनुसूचित जातीतून येतात. शिंदेवाडीचं पोलीस पाटील पद अनुसूचित जातीसाठई राखिव होतं. गावगाड्यातला निर्णय चुकू नये यासाठी त्या सजग असतात.

"या पदामुळे ग्रामपंचायत आणि गावात मला सन्मानानं बघितलं जातं. लोक आदरानं बोलतात. भांडण तंटा सोडवताना आपण दिलेला निर्णय मान्य केला जातो, याचं अप्रुप वाटतं. पोलीस पाटील होण्याआधी मला माझ्या घरातल्या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेत नव्हते, पण आता मी घरातल्याच काय गावगाड्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभाग घेत आहे," शमिता त्यांना येणाऱ्या अनुभवाविषयी सांगतात.

पोलीस पाटील पदं महिलांसाठी 33 टक्के राखिव केल्यामुळे आज अनेक महिलांना या पदावर काम करता येत आहे.

अर्चना सोनावणे

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात बोरीबेल नावाचं एक गाव आहे. 480 लोकवस्तीच्या या गावात अर्चना सोनावणे यांची दोन महिन्यांपूर्वीच पोलीस पाटील पदावर नियुक्ती झाली.

या यशाबद्दल बोलताना त्या सांगतात, "आम्ही मूळ चर्मकार समाजातले, माझ्या घरी अजूनही चपला सांधण्याचा व्यवसाय केला जातो. घरात कधीच कोणी ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच तर सोडाच साधं सदस्यही झालेलं नाही. माझी पहिल्यांदाच पोलीस पाटील या सरकारी पदावर नियुक्ती झाली आहे."

फोटो स्रोत, Prajakta Dhekale

फोटो कॅप्शन,

अर्चना सोनावणे

गावातील चर्मकार समाजाच्या पहिल्या महिला पोलीस पाटील होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

अर्चना पुढे सांगतात, "आमच्या घरातली शिकलेली ही आमची पहिलीच पिढी आहे. पोलीस पाटील म्हणून निवड झाल्याचं कळलं तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आनंद हा माझ्या सासरच्यांना झाला."

या पदाच्या कामाविषयी त्या पुढे सांगतात, "बरेचदा गावामध्ये महिलांवर होणारा अन्याय दाबला जायचा, मात्र आता स्वत: महिलाच पोलीस पाटील असल्यामुळे या प्रकारांना आळा बसेल. पोलीस पाटलाचं पद हे उच्च शिक्षित महिलेला मिळल्यामुळे गावातील इतर महिलांचाही आत्मविश्वास वाढला आहे.''

सुभद्रा बाबासाहेब चंदनशिवे

अवघ्या 29 वर्षें वयाच्या सुभद्रा बाबासाहेब चंदनशिवे सांगतात, "आमच्या गावातलं पोलीस पाटलाचं पद अनुसूचित जातीसाठी राखीव होतं. मी या पदासाठी अर्ज केला. पदवी आणि D.Ed चं शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे 60 स्पर्धकांपेक्षा मला जास्त गुण मिळाले आणि माझी महिला पोलीस पाटील म्हणून निवड झाली."

फोटो स्रोत, Prajakta Dhekale

फोटो कॅप्शन,

सुभद्रा चंदनशिवे

"4000 ते 4500 हजार लोकसंख्या असलेल्या माझ्या गावातल्या लोकांना माझ्या निवडीचं खूप कौतुक वाटतं. या कामामध्ये माझे पती मला खूप मदत करतात. या पदाच्या जबाबदारीमुळे मला अनेक गोष्टींचा नव्यानं उलगडा होत आहे. ग्रामसभा आणि विविध कार्यक्रमांच्या नियोजनात माझं मत विचारात घेतलं जातं."

अपर्णा लोंढे

माळशिरस तालुक्यातल्या सदाशिवनगरच्या अपर्णा लोंढे सांगतात, "अनुसूचित जातीच्या महिला राखीव गटामधून या पदावर माझी नियुक्ती झाली. माझ्या घरी कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही. माझे पती सदाशिवनगरच्या साखर कारखान्यवर हंगामी कामगार म्हणून काम करतात. पहिल्यांदाच अशा पदावर मी काम करत आहे. 3500 ते 4000 च्या जवळपास आमच्या गावची लोकसंख्या आहे. वयाच्या 27 व्या वर्षी मला हे पद मिळालं."

फोटो स्रोत, Prajakta Dhekale

फोटो कॅप्शन,

अपर्णा लोंढे

"गावात उघडपणे जरी बोललं जात नसलं तरी कुणाला फारसं चांगलं वाटत नाही. पण आज या पदामुळे माझ्याकडे अनेक अधिकार आहेत. बरेचदा इच्छा नसतानासुद्धा लोकांना माझ्याशी व्यवस्थित वागावं लागतं. पण मी मिळालेल्या या संधीचा योग्य फायदा घेईन."

ग्रामीण महिलांना एक नवी संधी

पोलीस पाटील पदाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच या पदासाठी महिलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलं. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. यामुळे अनेक अनुसूचित जातीच्या महिलांना प्राधान्य मिळालं. साधारण 25 ते 40 वर्षें वयोगटातल्या महिलांचा त्यात समावेश आहे.

"ग्रामीण भागात महिलांवर होणारे अत्याचार जे बरेचदा उघडकीस येत नव्हते त्यांना आता त्यांना आळा बसण्यास निश्चित मदत होईल," असं माण-खटाव (उपविभाग दहिवडी) जि. सातारा येथील उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितलं.

पोलीस पाटील म्हणजे नेमकं काय?

 • 'बॉम्बे सिव्हिल अ‍ॅक्ट' 1857 नुसार या पदाची निर्मिती करण्यात आली.
 • महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 अन्वये 1 जानेवारी 1962 पासून राज्यातलं वंशपरंपरागत मुलकी पाटलाचं पद रद्द झालं.
 • आता महाराष्ट्र ग्राम अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती करण्यात येते.
 • जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्ती केली जाते.
 • पोलीस पाटील पदाची वयोमर्यादा 25 ते 45 आहे.
 • साधारणपणे पाच वर्षांसाठी या पदावर नियुक्ती केली जाते, मात्र पाच वर्षांची मुदतवाढ मिळते.
 • पोलीस पाटलांकडून गैरवर्तन झाल्यास त्याला शिक्षा करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकाऱ्यांना आहे.
 • दंडात्मक कारवाईबरोबरच एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई यांच्यावर केली जाते.

पोलीस पाटलांची जबाबदारी

 • कायदा व सुव्यस्था राखणे
 • गावपातळीवर किंवा त्याच्या कार्यक्षेत्रातल्या गुन्ह्याची माहिती नजीकच्या पोलिस ठाण्यात देणे.
 • गावात विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे.
 • नैसर्गिक आपत्ती, रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे.
 • गावात अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाला असल्यास त्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)