सोशल - लेनिन प्रकरणावर बीबीसी वाचकांचा युक्तिवाद : 'भारतीयांचे परदेशातले पुतळे पाडले तर...?'

लेनिन Image copyright Getty Images

त्रिपुराच्या दक्षिण भागाला लेनिनग्राड म्हटलं जातं, तिथं आता 'लेनिन' नाहीत. ईशान्य भारतातला एकेकाळचा डाव्यांचा गड म्हणून ओळख असलेल्या त्रिपुरात लेनिन यांचे पुतळे पाडले जात आहेत.

दक्षिण त्रिपुरामधील बेलोनिया शहरातल्या कॉलेज चौकात 5 वर्षांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या समवारी दुपारी हा पुतळा पाडण्यात आला आहे. हा पुतळा पाडतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरल्याने या घटनेची चर्चा दिल्लीसह देशभरात होत आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत गेली २५ वर्षें सत्तेत असलेल्या डाव्यांचा भाजपने पराभव केला. त्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचा नादात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा पाडला, असे आरोप होत आहेत. मात्र भाजपने हे आरोप फेटाळले असून काही नेत्यांनी या कृतीचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने आपल्या वाचकांना त्यांचं मत विचारलं होतं.

यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही जणांच्या मते असे पुतळे तोडल्याने कोणाचे विचार नष्ट होऊ शकत नाही. तर काहींनी पुतळा पडला हे अशोभनीय कृत्य आहेच, पण तो भारतात उभारलाच का गेला, असा प्रश्न विचारला आहे.

"भाजप विजयी झाल्याचा किंवा काँग्रेस पराभूत झाल्याचा आनंद नाही. हा अपार आनंद झाला आहे तो कम्युनिस्ट पक्ष त्रिपुरामधून हद्दपार झाल्याचा. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी असेल पण देशद्रोही नाही. पण कम्युनिस्ट पक्ष हा देशद्रोही आहे," अशी प्रतिक्रिया अमोल पाटील यांनी दिली आहे.

तसंच, देशद्रोही विचारधारेच्या कम्युनिस्ट पक्षाने केरळ, त्रिपुरा आणि बंगालमधील जनतेचे केलेले हाल, फक्त तिथली जनताच समजू शकते, असंही पाटील यांनी पुढे म्हटलं आहे.

Image copyright facebook

"पुतळे पाडून किंवा पुतळ्यांना काळं फासून त्या मोठ्या व्यक्तींचे विचार मिटवता येत नाहीत. ही सर्व अराजकता माजवण्याचं काम भाजपवाल्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे याला सर्वस्वी भाजपच जबाबदार आहे," असं हर्षल जाधव यांनी म्हटलं आहे.

"कम्युनिस्ट लोक नास्तिक आहेत. त्यांना मूर्तीपूजा मान्य नाही. मग यांना पुतळा कशाला पाहिजे? त्यातल्या त्यात तो रशियन, ज्याचा भारताशी कसलाही संबंध नाही. पेरियार तर स्वतंत्र देश मागत होते, भारतामध्ये लेनिन देखील तेच करत होते. मग लेनिन यांच्या पुतळ्यावर फुकट खर्च कशाला करायचा?" असा प्रश्न गजानन पाचंकर यांनी उपस्थित केला आहे.

Image copyright Facebook

ओम शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणात भाजपचा छुपा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात, "स्लो पॉयझनिंग करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे. हे चाचपणी करून दुसऱ्या फळीचे नेते लगेच सारवासारव करतील. पण प्रत्यक्ष अजेंडापेक्षा छुपा अजेंडा पूर्ण करत राहणार, हे वास्तव या घटनेवरून सिद्ध झालं आहे."

Image copyright Facebook

दिनेश पाटील सांगतात, "लेनिनचा लढा रक्तरंजित होताच. त्याला विरोधच आहे. पण त्याचबरोबर त्या देशाचा (रशियाचा) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास हा देखील लेनिन मुळेच झाला, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे भाजप नेत्यांनी केलेला विरोध हा निश्चितच स्वागतार्ह नाही."

लेनिन यांचं कार्य भारतासाठी महत्त्वाचं का होतं, हे नितीन पवार यांनी इतिहासातल्या एक किस्स्यातून सांगितलं आहे -

Image copyright Facebook

"लेनिनचा संबंधच काय भारताशी आणि त्याने कोणता शांतीचा संदेश दिला होता? जगभरात लेनिनचे पुतळे पाडले जाताहेत ते बघा की आधी," असं कुशल राणे सांगतात.

Image copyright Facebook

तर कुशल राणे यांच्या उलट, सचिन पाटील यांचं मत आहे की, "पुतळे तोडून विचार नष्ट होऊ शकत नाहीत. मग तो पुतळा अफगाणिस्तानातल्या बुद्धाचा असो की त्रिपुरातील लेनिनचा! भारतीय महापुरुषांचे पुतळे, समाधी वेगवेगळ्या देशातही आहेत. त्या फोडल्यावर कसं वाटेल? की तिथल्या स्थानिक लोकांचा 'हे भारतीय नेते तुमचे कोण लागतात?' हा युक्तिवाद मान्य कराल. पुतळे, मूर्ती हे केवळ प्रतीक असतात. ते भंग करून विजयोत्सव साजरा करणं म्हणजे कुरूप व्यक्तीने आरसा फोडून स्वतःचं समाधान करून घेण्यासारखं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)