औरंगाबादेत कचरा प्रश्न कसा पेटला? आंदोलकांची दगडफेक अन् पोलिसांचा लाठीचार्ज

महापालिकेची वाहनं पेटवण्यात आली.
प्रतिमा मथळा महापालिकेची वाहनं पेटवण्यात आली.

गेल्या 20 दिवसांपासून औरंगाबाद शहराला भेडसावणाऱ्या कचराकोंडीच्या प्रश्नाला आज हिंसेचं गालबोट लागलं. आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या गाड्यांवर दगडफेक आणि त्यांची जाळपोळ केल्यानंतर पोलिसांना अश्रुधुराच्या कांड्या फोडाव्या लागल्या.

हे प्रकरण सुरू झालं साधारण 20 दिवसांपूर्वी जेव्हा औरंगाबादनजीकच्या नारेगावमध्ये असलेल्या महापालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध केला. तेव्हापासून महापालिकेची यंत्रणा शहराच्या आजूबाजूच्या परिसरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यालाही नागरिकांकडून कडाडून विरोध होत आहे.

बुधवारीही महापालिकेची दहा वाहनं कचरा घेऊन नाशिक रोडवरील मिटमिटा भागात निघाली होती. गावाच्या परिसरात ही वाहनं येताच नागरिकांनी वाहनांचा रस्ता अडवला, रस्त्यावरच ठिय्या दिला.

याचदरम्यान काही लोकांनी महापालिकेच्या वाहनांवर दगडफेक सुरू केली आणि प्रकरण चिघळलं. महापालिका आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

दगडफेक आणि त्याच्या प्रत्युत्तरात झालेल्या लाठीचार्जमध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Image copyright Amey Pathak / BBC
प्रतिमा मथळा रस्त्यांवर पडलेला दगडांचा खच

महापालिकेच्या वाहनांवर अशी दगडफेक होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून या वाहनांसोबत पोलीस बंदोबस्तही देण्यात येत आहे. आजही पोलिसांची वाहनं महापालिका यंत्रणेसोबतच होती.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या राज्य राखीव दलाच्या दोन वाहनांवरही अचानक दगडफेक सुरू झाली. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

महापालिकेची दोन वाहनं पेटवून देण्यात आली. महापालिकेच्या वाहनांच्या जत्थ्यात अग्निशमन दलाचं एक वाहन होतं. त्याचीही तोडफोड नागरिकांकडून करण्यात आली.

प्रतिमा मथळा पोलिसांची वाहनं फोडण्यात आली.

या दगडफेकीत रस्त्यांवरून जाणाऱ्या खाजगी वाहनांचंही नुकसान झाल्याचं प्रत्यदर्शींनी सांगितलं. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचं प्रत्यदर्शींनी सांगितलं.

प्रत्युत्तरात पोलिसांनीही लाठीचार्ज केला.

महापालिकेची वाहनं कचरा टाकण्यासाठी निघाली असता ही घटना घडली, असं पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. घडलेल्या दगडफेकीत तीन पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

तसंच काही आंदोलनकर्तेही जखमी झाले असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

रस्त्यावर जवळपास दोन किलोमीटरपर्यंत दगडांचा खच पडला होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या, जलद कृती दलाचं पथक आणि 300 पोलिसांचा ताफा या भागात तैनात करण्यात आला आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)