स्वतंत्र द्रविडराष्ट्र मागणारे पेरियार नेमके कोण होते?

पेरियार, तामिळनाडू, सामाजिक Image copyright dhilepan ramakrishnam
प्रतिमा मथळा पेरियार यांनी अनेक अमानुष सामाजिक प्रथांविरोधात आवाज उठवला.

तामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात पेरियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची. म्हणूनच त्यांना औपचारिक आदरणीय व्यक्तीपल्याड असा सन्मान मिळतो.

ई. व्ही. रामास्वामी उर्फ पेरियार यांचा तामिळनाडूच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरचा प्रभाव वादातीत आहे. कम्युनिस्ट ते दलित चळवळ तसंच तामीळ राष्ट्रवादी ते पुरोगामी चळवळी, अशा विविध विचारप्रवाहांचं ते प्रेरणास्थान तसंच मार्गदर्शक आहेत.

त्यांनी कायम विवेकाची कास धरली. ते नास्तिक होते आणि उपेक्षित वर्गाचे तारणहार होते, मात्र त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल खाचखळग्यांनी भरलेली होती.

प्रतिमा मथळा पेरियार यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली.

पेरियार यांनी 1919 मध्ये गांधीवादी विचारसरणीचे समर्थक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते काँग्रेसचे सदस्य होते. गांधीजींच्या मद्यविरोधी धोरण आणि अस्पृश्यता निवारणसारख्या विचारांनी ते आकर्षित झाले.

त्यांनी पत्नी नागम्मई आणि बहीण बालंबल यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त केलं. मद्यविक्री दुकानांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात या दोघी अग्रेसर होत्या. मद्यविक्रीला विरोध म्हणून पेरियार यांनी घराजवळील ताडीची झाडं तोडून टाकली होती.

पेरियार असहकार चळवळीतही सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना अटकही झाली होती. काँग्रेस पक्षाच्या मद्रास (आताचं चेन्नई) विभागाचे अध्यक्ष होते.

वायकोम सत्याग्रह

1924 मध्ये केरळमध्ये त्रावणकोर राजाने दलितांना मंदिरात प्रवेशबंदी केली होती. त्याविरोधात आंदोलन उभं राहिलं होतं. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना राजाने अटक करून तुरुंगात टाकलं. आंदोलन पुढे चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक होतं. त्यावेळी आंदोलनातील कार्यकर्त्यांनी पेरियार यांना नेतृत्व करण्याची विनंती केली.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी पेरियार यांनी मद्रास काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं. गांधीजींच्या आज्ञेविरुद्ध जाऊन त्यांनी ही भूमिका स्वीकारली. राजाचा मित्र असल्यानं त्रावणकोरमध्ये त्यांचं भव्य स्वागत झालं. मात्र राजाच्या धोरणाविरोधातच होणाऱ्या आंदोलनाचं निमित्त असल्याने पेरियार यांनी त्रावणकोर संस्थानतर्फे होणारं स्वागत नाकारलं.

राजाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनात सहभागी झाल्याने, मित्र असूनही त्यांना अटक करण्यात आली. अनेक महिने ते तुरुंगावासात होते. पेरियार यांच्या पत्नी नागम्मई यांनीही केरळमध्ये प्रचलित अस्पृश्येतविरोधात आवाज उठवला.

Image copyright PAttern facebook
प्रतिमा मथळा पेरियार सुरुवातीला काँग्रेस पक्षात होते.

जातीआधारित आरक्षणाची काँग्रेस सभांमधली पेरियार यांची मागणी फेटाळण्यात आली. काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निधीवर चालणाऱ्या चेरनमादेवी गावातील वा. वे. सुब्रमण्यम अय्यर यांच्या गुरुकुल शाळेत भोजन देताना ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर असा भेदभाव करण्यात येत असल्याचं पेरियार यांना समजलं.

ब्राह्मण असणाऱ्या अय्यर यांना असं न करण्याची विनंती पेरियार यांनी केली. मात्र पेरियार यांची विनंती अय्यर यांनी धुडकावली. काँग्रेसने अय्यर यांच्या शाळेला देण्यात येणारा निधी पुरवठा थांबवावा, अशी त्यांची मागणीही मान्य करण्यात आली नाही. दोन्ही आघाड्यांवर अपयश आल्यानं पेरियार यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी ब्राह्णेतर समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली. या मंडळींना द्रविड कुळाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. (ब्राह्मण आर्य वंशाचे असल्याने त्यांनी द्रविड वंश स्वीकारला)

त्यानंतर 1916 मध्ये पेरियार साऊथ इंडियन लिबरल फाऊंडेशन अर्थात जस्टीस पार्टीचे अध्यक्ष झाले. ही ब्राह्णेतर चळवळ होती.

द्रविड कळगम्

द्रविड कळगम् पक्षाच्या स्थापनेसाठी 1944 मध्ये पेरियार यांनी स्वसन्मान मोहीम आणि जस्टीस पार्टी यांचं विलिनीकरण केलं. तामिळनाडूत हा पक्ष अनेक वर्षं सत्तेत आहे.

रशियाच्या दौऱ्यावर असताना पेरियार कम्युनिस्ट विचारसरणीकडे आकर्षित झाले. कम्युनिस्ट पार्टीचा जाहीरनामा तामीळ भाषेत भाषांतरित करण्याचं श्रेय पेरियार यांना जातं. महिलांच्या स्वातंत्र्यासंदर्भात त्यांचे विचार आजही प्रागैतिक आणि काळापुढचे समजले जातात.

बालविवाहाची प्रथा मोडीत निघावी, विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा, साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी, लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही तर सहजीवन असावं, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

मुलांना जन्म देण्याचं ओझं त्यांनी झुगारून द्यावं तसंच महिलांनी शिक्षण घ्यावं, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पेरियार यांच्या अनुयायांनी लग्न सोहळ्यातील रुढी बाजूला सारण्यासाठी प्रयत्न केले. लग्न झालेल्या महिलांना मंगळसूत्र परिधान करण्याची सक्ती नसावी यासाठी त्यांनी मोहीम आखली. महिलांच्या हक्कासाठी आयोजित परिषदेतच त्यांना पेरियार (महान) ही बिरुदावली मिळाली.

समाजातील अंधश्रद्धा आणि भेदभाव यांचं मूळ वैदिक हिंदू धर्मात आहे, असं पेरियार यांचं मत होतं. वैदिक हिंदू धर्मात समाजाची रचना एका उतरंडीसारखी असून ब्राह्मण अव्वल स्थानी आहेत. कडवे नास्तिक असल्याने त्यांनी देवाच्या अस्तित्वाला विरोधाची मोहीम राबवली.

दक्षिणेकडील राज्य स्वतंत्र भारतात सामील होण्याला पेरियार यांचा विरोध होता. दक्षिण भारत मिळून स्वतंत्र द्रविड नाडू अर्थात 'द्रविड राष्ट्र' असावं, असं त्यांचं मत होतं. मात्र अन्य राज्यांनी पेरियार यांना सहमती दर्शवली नाही.

समाजातल्या वंचित गटाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 1937 मध्ये तामीळ भाषिक जनतेला हिंदी बोलण्याची सक्ती करण्याच्या निर्णयाचा त्यांनी विरोध केला होता.

पेरियार यांनी कामाच्या निमित्ताने तामिळनाडू पिंजून काढला. अनेक सभा तसंच सार्वजनिक ठिकाणी त्यांनी आपले विचार मांडले. "मी बोलतोय, म्हणतोय म्हणून गोष्टी मान्य करू नका. सारासार विचार करा. तुमच्या मनाला पटलं तरच तसं वागा. अन्यथा सोडून द्या," असे त्यांचे उद्गार प्रसिद्ध होते.

नास्तिकवाद आणि ब्राह्मणविरोधी विचारांचे पाईक असूनही पेरियार आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी एकमेकांचे मित्र होते. सैव्यियट मठाचे धर्मगुरू कुंद्रकुडी अधीनाम यांच्याप्रती पेरियार यांना आदरभाव होता. अधीनाम यांनाही पेरियार यांच्याप्रती आस्था होती.

विवेकवाद, सर्वसमावेशकता, स्वसन्मान, धर्म आणि देवाच्या अस्तित्वाला विरोध, जात आणि पितृसत्ताक पद्धतीचं निर्मूलन या सगळ्या गोष्टींचा वारसा पेरियार यांनी दिला. धार्मिक भावना दुखावणं आणि परंपरांना विरोध यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)