#पाळीविषयीबोलूया - 'पुरुषांना मासिक पाळी विषयी सज्ञान करण्याची गरज'

Image copyright Praveen Nikam

भारतात मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलायला आता कुठे सुरुवात होते आहे. कित्येक वर्षं 'विटाळ' मानला गेलेला हा विषय पुरुष तर टाळतातच. पण महाराष्ट्राचा 'पीरिअड मॅन' म्हणून ओळख मिळालेले प्रवीण निकम यांच्या आयुष्याचं ध्येय केवळ मासिक पाळीविषयी जनजागृती करणं हे आहे. प्रवीण निकम यांच्या मते, मासिक पाळीविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पुरुषी मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दांत...


माझा एक मित्र आहे हर्षल. त्याला हेमोफिलीया हा आजार आहे. हा आजार असा आहे की, माणसाला जखम झाली तरी रक्तप्रवाह थांबत नाही. रक्त गोठण्याची प्रक्रिया त्याच्या शरीरात होत नाही. एक दिवस सकाळी फळं कापताना हर्षलचं बोट कापलं आणि रक्तप्रवाह सुरू झाला. हर्षलला ऑफिसला जायचं असल्यामुळे त्याने बोटाला कापड गुंडाळलं, पण रक्तप्रवाह थांबत नव्हता. तो सारखं कापड बदलत होता पण त्याचा त्याला खूप त्रास होत होता. आता विचार करा जर प्रत्येक महिन्याला लागोपाठ चार दिवस असाच त्रास होणार असता आणि तेही जवळजवळ अर्धं आयुष्य.. तर?

तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मी असं का म्हणतोय. पण आपण कधी विचार केलाय का - महिलांना येणाऱ्या मासिक पाळीमध्ये नेमका असाच त्रास होतो. त्यांचे ते चार-पाच दिवस त्या कसे सहन करीत असतील?

मासिक पाळी म्हणजे नक्की काय? गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतरत्वचा. गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते त्याला आपण मासिक पाळी म्हणतो.

तुम्ही विचार करत असाल की, माझा आणि मासिक पाळीचा संबंध कसा आला? यावर मी का बोलतोय? याचं कारण ठरला माझा आसामचा अभ्यास दौरा, जो माझ्या आयुष्याला वेगळं वळण देणारा ठरला.


#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतला हा लेख आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या लेखमालेचा उद्देश आहे.


ज्या प्रदेशासाठी काम करायचं आहे, त्या प्रदेशातले प्रश्न समजून घेण्यासाठी मी आसामला गेलो. ईशान्य भारतातील आसाममध्ये फिरताना तिथली शाळा बघण्याचा योग आला. काही कुटुंबांना भेटायला मिळालं. तिथल्या लोकांचं राहणीमान कसं आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती.

'देवानं शिक्षा दिली'

तिथेच एका पारंपरिक सिल्क साडी तयार करणाऱ्या विणकराच्या घरी गेलो. तिथे त्या विणकराची 17-18 वर्षं वयाची 'रोशनी' नावाची मुलगी साडी विणत होती. तिच्याकडून प्रश्नावली भरून घेताना कळलं की तिने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलेलं नाही. तिला त्याचं कारण विचारलं, तर ती म्हणाली देवाने मला शिक्षा दिली. त्यामुळे मी शाळेत जाऊ शकले नाही.

देवाने दिलेली शिक्षा? अशी कुठली बरं शिक्षा असा प्रश्न मला पडला. पण विचारणार कोणाला आणि कसं? मग तिच्या वडिलांनाच विचारलं. त्यांनी सांगितलं की, "मुलींना 'माहवारी' सुरू झाली की, आम्ही त्यांना शाळेत पाठवत नाही."

माहवारी म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीचा एवढा परिणाम पाहिला आणि हा प्रसंग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

तिथून पुण्यात परत येईपर्यंत माझ्या डोक्यात विचार चालू होते की, मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा आणि गैरसमज याबद्दल आपल्याला काय करता येईल.

Image copyright Getty Images

पुण्यात परत आल्यानंतर मी मासिक पाळीबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली. ती कशी येते, का येते, तिचे स्त्रियांच्या आरोग्याला असलेले फायदे अशा सगळ्या बाजूंचा मी अभ्यास सुरू केला. तेव्हा लक्षात आलं, इथे या विषयावर कुणाला बोलायचंच नाहीये.

समाजाचा विरोध

एक तरुण मुलगा पाळीविषयी बोलतो याला समाजातून संमती मिळणं तसं अवघडच होतं. माझ्या आई- वडिलांचा पाठिंबा होता, म्हणूनच हे मी करू शकलो. पण हा काय पुरुषांनी बोलायचा विषय आहे का? करिअर करण्याच्या वयात हे कसलं खुळ असं काहीतरी बाहेरच्यांकडून ऐकावं लागलंच. आता शिक्षण पूर्ण करण्याच्या मी मागे आहे. कायद्याचं शिक्षण पूर्ण करून याच क्षेत्रात करिअरही करता येतं, हे मला दाखवून द्यायचं आहे.

बोलायला अवघड विषय

मासिक पाळी हा काही उघड बोलायचा विषय नाही. इथे घरातल्या माणसांशी त्यावर बोलणं अवघड, तर बाहेरून आलेल्या माझ्यासारख्या मुलाशी मासिक पाळीबद्दल कोण, कसं आणि का बोलेल हा प्रश्न होताच. पण मी मनाशी ठरवलं होतं की, याच विषयावर काम करणार आणि मग सुरुवात झाली मासिक पाळीबद्दलच्या जनजागृतीची.

आसाममध्ये भेटलेल्या रोशनीमुळे मासिक पाळी, त्यातून समाजात खोलवर रुजलेली विषमता, त्यातून स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक या सगळयांशी माझा परिचय झाला. म्हणूनच तिच्याच नावानं सुरुवात केली 'रोशनी' नावाची स्वयंसेवी संस्था.

सुरुवात शाळेतल्या मुलांपासून करायची असं ठरवत मी त्या वयातल्या मुलांसाठी शाळांमध्ये जाऊन छोटे सेमिनार घ्यायला लागलो. आपल्या शरीरात होत असलेले बदल का आणि कसे होतात, त्यांच्याशी कसा सामना करायचा याविषयी बोलू लागलो.

प्रतिमा मथळा शाळेतील उपक्रमात

मी या विषयावर काम करायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा वस्तीतील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण असं लक्षात आलं की कोणीही या विषयावर बोलायला तयार नव्हतं. मित्र-मैत्रिणींशी तसंच आई-वडिलांशी बोलताना हाच अनुभव होता. आणि म्हणून लोकांशी संवाद साधण्यासाठी गटचर्चा, पथनाट्य, युवक शिबिरांच्या माध्यमातून संवाद साधत पुढे गेलो.

सुरुवातीला विरोध

सुरुवातीला हे काम करताना सर्व स्तरांतून थोडा विरोध झाला. पण हळूहळू याचं महत्त्व सर्वांना पटतंय आणि बदल घडवायचा असेल तर सर्वांनी संयमी आणि कृतीशील असणं गरजेचं आहे.

शरीरात होणारे बदल हा विषय सुरुवातीला घेऊन आम्ही बोलायला सुरुवात करतो आणि मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता, गैरसमज याविषयी बोलायला लागतो. पौगंडावस्थेतली तरुण- तरुणी प्रेक्षकांमध्ये असतात. शाळआ- कॉलेजमध्ये आम्ही याविषयी बोलतो, तसं वाड्या- वस्त्यांमध्येही याविषयी बोलायला जातो. बांधकामावरील महिलांमध्येही मी वर्ग घेतले आहेत.

शहरापेक्षा गाव बरा

एकदा विश्वास संपादन केला आणि आरोग्यासाठीच हे चाललं आहे हे लक्षात आलं की वस्तीमधल्या महिला, गावांतल्या स्त्रिया हळूहळू बोलायला लागतात. पाळीविषयीच्या शंकांना मोकळेपणानं वाट करून देतात. पण शहरात मात्र वेगळा अनुभव येतो. कॉलेजमधल्या मुली अजूनही मोकळेपणानं बोलत नाहीत. आम्ही कापड वापरतो, हे सांगायला त्यांना लाज वाटते. न्यूनगंड असतो. खरं तर कापडी पॅड वापरणं याविषयीही आम्ही आवर्जून प्रचार करत असतो, कारण सॅनिटरी नॅपकिन्सचं विघटन हा आणखी मोठा प्रश्न आहे. पण शहरी मुलींमध्ये याविषयी बोलताना संकोच जाणवत राहतो.

अजूनही कुजबूज

मासिक पाळीविषयी अजूनही कुजबुजीच्या स्वरूपात बोललं जातं. त्यामुळे योग्य माहिती मिळवण्याचे स्रोत अनेकांना माहीत नसतात. शेवटी मित्राकडून, टीव्हीमुळे, मासिकांमधून तुकड्या-तुकड्यांत मिळालेली माहिती एकत्रित केली जाते. मात्र ही माहिती योग्य किंवा खरी असते असं नाही. म्हणून कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो.

मानसिक आंदोलन मुलांचंही

कुजबुजीतून मिळालेल्या अर्धवट ज्ञानावर आणि शारीरिक- मानसिक पातळीवरच्या बदलांमुळे त्या काळातील मानसिक आंदोलन जसं मुलींच्या बाबतीत होतं, तसं मुलांच्याही बाबतीत हे होतं. फक्त त्याविषयी बोलता येईल अशी जागा नसते. त्यामुळे मी बोलायला लागलो तसा प्रतिसादही मिळायला लागला.

पाळीविषयी शहरांतही अंधश्रद्धा

या विषयावर काम करत असताना लक्षात आलं की, मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही, तर शहरी भागातही तितक्याच प्रमाणात त्याचा प्रभाव आढळून आला.

भारतातच नव्हे तर जगातील अशा बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा पाळल्या जातात. नेपाळमध्ये 'चौपाडी' नावाची प्रथा आहे. पाळी आलेल्या महिलेस घरात न राहता, गोठ्यात राहावं असं सांगितलं जातं. अशाच प्रकारे आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये, अफगाणिस्तान आणि इतर देशांमध्ये अशाच प्रकारच्या अंधश्रद्धा पाळल्या जातात.

पुरुष आणि महिला यांच्या शरीरात होणारे बदल, 'जेन्डर सेल्स' लैंगिकता या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मिळाली.

मासिक पाळीची देवी

आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तिपीठ म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर गुवाहाटी इथे आहे. कामाख्या देवीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे - म्हणजे 'मासिक पाळीची देवी'.

एकीकडे शक्तिपीठ म्हणून कामाख्या देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे मासिक पाळीबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धांना वाव दिला जातो.

मासिक पाळी या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही.

पुरुषी मानसिकता कारणीभूत

मुळात प्रॉब्लेम आहे तो महिलांना फक्त भोगवस्तू म्हणून पाहणाऱ्या पुरुषी मानसिकतेचा. तिच्यावर हक्क गाजवला पाहिजे या पुरुषी अहंकाराचा. आणि याच पुरुषी मानसिकतेमुळे महिलांना मानसिक गुलामगिरीत बंदिस्त केलं आहे.

Image copyright Yuko Yamada/GETTY IMAGES

आज गरज आहे ती विद्रोह करण्याची - इथल्या दांभिक वास्तवाविरुद्ध आणि पुरुषी मानसिकतेविरुद्ध. म्हणून आज गरज आहे पुरुषांना मासिक पाळीबद्दल सज्ञान करण्याची, तिच्या भावनांना समजून घेण्याची.

माझ्यासारखे अनेक जण या विषयावर काम करत आहेत. सरकारी पातळीवरही जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. महिलांच्या मासिक पाळीतील स्वच्छता, आरोग्य आणि त्याबद्दल असलेली अंधश्रद्धा या अनुषंगाने खूप काम करण्याची गरज आहे.

मासिक पाळीत वापरल्या जाणाऱ्या पॅडवर जीएसटी नको, ही भूमिका घेऊन मी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिलं आहे.

सॅनिटरी नॅपकिन्स ही फक्त पाळी सुरू असलेल्या महिलांचीच गरज आहे. म्हणजे फक्त महिलांवरच हा कर लादला जात आहे. हा एक प्रकारचा भेदभाव ठरतो. पुरुषांसाठी कंडोमवर कर नाही. त्याचप्रमाणे सरकारने महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन्सवर कर माफ करावा.

चारचौघात खुलेपणाने न बोलल्या गेलेल्या या विषयावर वाहिन्यांवर चर्चा होऊ लागल्या आहेत, ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. आता पुरुषांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी घरातील मुली-महिलांना समजून घेऊन स्वातंत्र्य दिल्यास मोठा बदल घडू शकेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)