#5मोठ्याबातम्या : पालघरमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोटानंतर भीषण आग; 14 जण गंभीर जखमी

पालघर इथली कंपनीची आग Image copyright Amey Bhavsar

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. केमिकल फॅक्टरीत स्फोटा

इंडियन एक्स्प्रेसमधल्या बातमीनुसार, पालघरमधल्या तारापूरमध्ये एका औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत गुरुवारी रात्री उशिरा शक्तीशाली स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. यात 14 जण गंभीर जखमी झाले आहेत.

गुरुवारी रात्री उशिरा साडेअकार वाजता ही घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं. तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या नोवाफेन स्पेशालिटीज प्रा. लि. या कंपनीत ही आग प्रथम सुरू झाल्यानंतर ती इतर ठिकाणी पसरली.

"ही आग मोठी असून 7 जणांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आग शेजारील कंपन्यांमध्ये पसरते आहे," अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंघे यांनी दिली.

या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीतल्या बॉयलरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचं प्राथमिक माहितीवरून समजतं. तसंच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

2. तलवार दाम्पत्याविरोधात सीबीआय सुप्रीम कोर्टात

हिंदुस्तान टाइम्समधल्या बातमीनुसार, आरुषी तलवार आणि हेमराज यांच्या दुहेरी हत्या प्रकरणात निर्दोष ठरलेल्या तलवार दाम्पत्याविरोधात सीबीआयनं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

राजेश आणि नुपूर तलवार यांची मुलगी आरुषी आणि त्यांचा नोकर हेमराज यांची 2008मध्ये नोएडा इथे हत्या झाली होती. अलाहाबाद हायकोर्टानं या प्रकरणी अपुऱ्या पुराव्यांअभावी तलवार जोडप्याची मुक्तता केली होती.

Image copyright Getty Images

मात्र, महिनाभरापूर्वी कायदा मंत्रालयानं सीबीआयला या प्रकरणी विशेष याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सीबीआयनं सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलं.

3. मेट्रो-3 च्या कारशेडसाठी विकास आराखड्यात बदल

लोकमतमधल्या बातमीनुसार, मुंबई मेट्रो-३ च्या कारशेडसाठी राज्य सरकारनं विकास आराखडा २०३४च्या मसुद्यामध्ये बदल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि आरेमधल्या रहिवाशांनी गुरुवारी न्यायालयाला दिली.

यापूर्वी हिरवा पट्टा म्हणून राखीव असलेलं आरे आता कारशेडसाठी राखीव असल्याचं मसुद्यात दाखवण्यात आलं आहे, असं रहिवाशांनी न्यायालयाला सांगितलं.

Image copyright Getty Images

आरे कॉलनीमधील २५ हेक्टर जागा मेट्रो-३ च्या कारशेडसाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते झोरू बाथेना आणि आरेतील काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. संबंधित ठिकाण हे 'ना विकास क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

विकास आराखडा २०३४ च्या मसुद्यातही हे ठिकाण हरित पट्टा आणि 'ना विकास क्षेत्र' म्हणून दाखविण्यात आलं आहे. मात्र, सरकारनं परिपत्रक काढून ही जागा कारशेडसाठी राखीव असल्याचं म्हटलं आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

4. हादियाचा विवाह वैध - सुप्रीम कोर्ट

टाइम्स ऑफ इंडियामधल्या बातमीनुसार, हादिया (पूर्वाश्रमीची अखिला अशोकन) आणि शफिन जहान यांचा विवाह सुप्रीम कोर्टानं वैध ठरवला आहे. दहा महिन्यांपूर्वी केरळच्या हायकोर्टानं हा विवाह अवैध ठरवत हादियाला तिच्या पालकांकडे पाठवण्याचा निकाल दिला होता.

मात्र, या प्रकरणातला 'लव्ह जिहाद'चा संबंध तपासण्यात येणार असून हा तपास NIAला करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे. मात्र, हा विवाह वैध ठरल्यानं हादिया आता पालकांसोबत न राहता आपला पती शफिन जहान याच्यासोबत राहू शकणार आहे.

5. दाऊदचा मुख्य साथीदार फारुक टकलाला अटक

इंडियन एक्स्प्रेसमधल्या बातमीनुसार, फारुक टकला याला अटक करण्यात आली आहे. तो कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा साथीदार आहे. यासीन मन्सूर मोहम्मद फारुक एलियास उर्फ फारुक टकला याला दुबई पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे हस्तांतरीत केलं. सध्या त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

1993च्या मुंबई बाँबस्फोटांमध्ये फारुक हा आरोपी आहे. तो दाऊदचा प्रमुख साथीदार समजला जातो. दुबईत लपून राहण्यासाठी तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही वर्ष पाकिस्तानात राहल्यानंतर तो दाऊदच्या आदेशानंतर दुबईत स्थलांतरीत झाला, असं त्याला अटक केलेल्या तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)