#पाळीविषयीबोलूया : 'पाळीची रजा म्हणजे मला कमकुवतपणा वाटत नाही'

हेमांबिका केटी Image copyright हेमांबिका केटी
प्रतिमा मथळा हेमांबिकाला मासिक पाळीत रजा घेणं हा कमकुवतपणा वाटत नाही.

मासिक पाळीच्या काळात एक किंवा दोन दिवसाची रजा असावी का? या प्रश्नावरून भारतात नव्हे तर जगभरात बरीच चर्चा सुरू आहे. सरकारने याबद्दल अजून कोणतंही धोरण ठरवलेलं नाही. काही कॉर्पोरेट कंपन्यांनी याची अंमलबजावणी केली आहे. त्यांनी हे कसं केलं, कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया काय होती, कसा प्रतिसाद मिळाला? हे आम्ही जाणून घेतलं.

"माझा मासिक पाळीचा पहिला किंवा दुसरा दिवस खूपच वेदनादायी असतो. कधीकधी ऑफिसमध्ये जाऊन किंवा फिल्डवर जाऊन काम करणं शक्यच होत नाही. त्यामुळे पाळीच्या काळात मला रजा घ्यावी लागते आणि हा मला माझा कमकुवतपणा वाटत नाही", हेमांबिका केटी सांगतात.

"मी माझं काम खूप जबाबदारीने आणि उत्तम करते. मी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कष्टाळू आहे," त्या पुढे सांगतात. हेमांबिका केटी मुंबईतल्या 'कल्चरमशिन' या मीडिया कंपनीत सीनिअर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करतात.

ज्यांना पाळीच्या काळात पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी खूप त्रास होतो त्यांच्यासाठी एक दिवसाची रजा घेण्याचा पर्याय हेमांबिका यांच्या कंपनीमध्ये आहे.

त्या म्हणतात, "मला 'पीरिअड लीव्ह' मिळू शकते, असं कधीच वाटलं नव्हतं. आधी जेव्हा असा त्रास व्हायचा तेव्हा मी बॉसला मेसेज करून सांगायचे. माझं पोट दुखतंय, बरं वाटत नाहीये, वगैरेसारखे ते मेसेज असायचे. त्यामुळे माझी रजा 'सिक लिव्ह' मध्ये धरली जायची."


#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतला हा लेख आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या लेखमालेचा उद्देश आहे.


"आता मात्र मी माझी रजा FOP म्हणजेच 'फर्स्ट डे ऑफ पीरियड' या नावाने घेते. त्यामुळे पाळीच्या काळात त्रास होत असेल तर हे बॉसला कसं सांगू, रजा कशी घेऊ, असे प्रश्न मला पडत नाहीत किंवा अपराधीही वाटत नाही", हेमांबिका म्हणाल्या.

Image copyright CULTURE MACHINE
प्रतिमा मथळा मासिक पाळीच्या काळात रजा घेण्याचा पर्याय 'कल्चरमशिन' या कंपनीमध्ये आहे.

या कंपनीच्या मनुष्यबळ अध्यक्ष (प्रेसिडिंट, HR) देवलिना मजुमदार यांनी त्यांच्या महिला आणि पुरुष सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून, महिलांना पाळीच्या काळात एक दिवस रजेचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला. अशी रजा वर्षातले सरसकट 12 दिवस दिलेली नाही. "ही पर्यायी रजा आहे. ऑफिसमधल्या 7 ते 8 टक्के महिला या पर्यायाचा वापर करतात", देवलिना सांगतात.

देवलिना मजुमदार यांनी पीरियड लीव्हसंदर्भात ऑनलाईन मोहीमही सुरू केली आहे.

कल्चरमशीन या संस्थेत असोसिएट प्रोड्युसर म्हणून काम करणारे अनिकेत तारी म्हणतात, "मी आधी ज्या कंपनीत काम करायचो तिथे कुणी पिरियड्सबद्दल उघडपणे बोलायचं नाही. माझ्या सहकारी महिलेने मला सांगितलं की - मला बरं वाटत नाहीये, पोट दुखतंय तर मी आम्ही समजून घ्यायचो. पण त्या रजेचं नेमकं कारण मात्र माहीत नसायचं."

Image copyright Aniket Tari
प्रतिमा मथळा मासिक पाळीच्या पर्यायी रजेबाबत एकमेकांवर विश्वास ठेवण्याचाही प्रश्न आहे, असं अनिकेत तारी यांना वाटतं.

"आता मात्र आमच्या कंपनीत आम्ही हे उघडपणे बोलतो. कुणाला जर 'पीरियड लिव्ह' घ्यावीशी वाटली तर त्याबद्दल फारशा शंका न घेता ती दिली पाहिजे. एखादी महिला सहकारी काम करताना कम्फर्टेबल नसेल तर कामही चांगलं होणार नाही, असं आम्हाला वाटतं."

पीरियड लीव्हचा गैरवापर होईल. त्या महिलेची खरंच पाळी आहे की नाही याची खात्री कशी करणार? असे प्रश्न यावर विचारले जातात. यावर ते म्हणतात, "आमचा आमच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास आहे. 'पीरियड लीव्ह'च्या नावाखाली कुणी खोटं बोलणार नाही."

यावर हेमांबिकाचंही उत्तर आहे, "अशी पर्यायी रजा महिन्यात एकच दिवस असते. जर मी खोटं बोलून रजा घेतली तर जेव्हा मला खरंच त्रास होईल तेव्हा मी ती कशी घेणार, हा प्रश्न आहेच ना."

Image copyright CULTURE MACHINE
प्रतिमा मथळा देवलिना मजुमदार यांनी मासिक पाळीच्या रजेसाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे.

अनिकेत तारी सांगतात, ''यामुळे कामाच्या ठिकाणी स्त्री - पुरुष भेदभाव वाढीला लागेल, असाही एक आक्षेप घेतला असतो. पण आमच्या कंपनीत तरी असा भेदभाव होत नाही. पाळीच्या काळात काही जणींची शारीरिक स्थिती ठीक नसते हे आपण मान्य केलं पाहिजे. आमच्या कंपनीत अशी रजा सुरू केल्यानंतरही कामावर फारसा परिणाम झालेला नाही. कारण एखाद्या महिला कर्मचाऱ्याने अशी रजा घेतली तरी ते काम नंतर पूर्ण करण्याची तिची तयारी असते."

"आमच्या कंपनीत हे लागू केल्यावर मी माझ्या आईला आणि बहिणीला हे सांगितलं. त्याच वेळी आम्हीही घरात पहिल्यांदा या विषयावर बोललो. आणि ही सुविधा आपल्यालाही असावी, असं माझ्या बहिणींनाही वाटलं. एवढंच कशाला, आमच्याकडे काम करणाऱ्या महिलेला जर अशी सुटी हवी असेल तर तिच्यासाठीही हा पर्याय खुला आहे", अनिकेत सांगतात.

Image copyright Facebook
प्रतिमा मथळा गोझूपच्या चीफ हॅपीनेस ऑफिसर बन्सी राजा (सर्वांत मध्ये) आणि महिला कर्मचारी

कल्चर मशिनच्या पुढाकारानंतर गोझूप ही डिजिटल मार्केटिंग कंपनी आणि मातृभूमी या टीव्ही चॅनलनेही पाळीच्या काळात महिलांना काही सोयसुविधा दिल्या आहेत. गोझूपने मात्र रजा न देता 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय दिला आहे.

घरून काम करण्याचा पर्याय

गोझूप या कंपनीच्या चीफ हॅपीनेस ऑफिसर बन्सी राजा म्हणाल्या, "पीरियडच्या काळात जर जास्तच त्रास होत असेल तर ती महिला कर्मचारी घरून काम करू शकते किंवा त्या दिवशी थोडी सवलत घेऊ शकते, असं मला वाटतं. महिलांसाठी आधीच प्रसूती रजेची तरतूद आहे. त्यातच वर्षातले 12 दिवस पीरियड लीव्ह देणं शक्य नाही. अशा रजांचं प्रमाण वाढलं तर कॉर्पोरेट कंपन्या महिलांची भरती करणार नाहीत. म्हणूनच रजेऐवजी हा एक प्रकारचा सपोर्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे."

कोणत्याही कंपनीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या असावी असं आपलं उद्दिष्ट असेल तर अशी रजा त्याआड येऊ नये, असंही त्यांना वाटतं. त्यांच्या कंपनीत पाळीच्या काळात 70 टक्के महिला 'वर्क फ्रॉम होम' या पर्यायाचा वापर करतात. ही डिजिटल मार्केटिंग कंपनी असल्यामुळे हा पर्याय शक्यही आहे.

'पाळीसंदर्भातल्या आजारांमध्ये सुट्टी हवीच'

"काही महिलांना पाळीच्या काळात खूप त्रास होतो पण काही महिलांना गंभीर आजारांमुळेही मासिक पाळीच्या काळात त्रास होतो. यावेळी या समस्येकडे गांभीर्याने बघायला हवं", असं केईएम हॉस्पिटलच्या चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. कामाक्षी भाटे यांचं म्हणणं आहे.

डॉ. कामाक्षी भाटे सांगतात, ''पीसीओडी म्हणजेच पॉलिस्टीक ओव्हेरियन डिसिज, एन्डोमेट्रोसिस अशा गंभीर आजारांमध्ये रजेची गरज असते. पीसीओडी मध्ये शरीरातल्या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. यात रक्तस्राव जास्त होतो किंवा कमी होतो. 12 ते 45 या वयोगटातल्या महिलांना हा आजार असू शकतो. एन्डोमेट्रिओसिसमध्ये पोटामध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता असते पण या आजाराचं प्रमाण अगदी एक टक्क्याएवढं आहे."

"असे गंभीर आजार किंवा वेदनादायी पाळी अशा स्थितीत वर्षातून 5 ते 6 वेळा रजा घेण्याचा पर्याय महिलांकडे असायला हवा, मग त्या सरकारी नोकरीत असो किंवा खाजगी कंपनीत.'' असं त्यांचं म्हणणं आहे.

मासिक पाळीच्या रजेच्या मुद्द्यावर भारत सरकारने अजून कोणतंही धोरण ठरवलेलं नाही. पण अरुणाचल प्रदेशचे काँग्रेसचे खासदार निनाँग एरिंग यांनी मात्र यात पुढाकार घेतला आहे. शाळा आणि सरकारी नोकरीमध्ये अशी रजा मिळावी यासाठी सरकारने पाऊल उचललं पाहिजे, असं त्यांचं मत आहे.

लोकसभेत विधेयक

शाळकरी मुलींना किंवा महिलांना पाळीच्या काळात होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास लक्षात घेता अशी रजा मिळावी यासाठी त्यांनी लोकसभेमध्ये 2017 साली खाजगी विधेयक मांडलं होतं. यात प्रत्येक महिन्याला दोन दिवस पिरियड लीव्ह देण्याचा प्रस्ताव होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा निनाँग एरिंग

निनाँग एरिंग म्हणतात, ''माझी पत्नी शिक्षिका आहे. तिला पाळीच्या काळात होणारा त्रास बघून मला जाणवलं की महिलांना अशा रजेची गरज आहे. त्यातच कल्चरमशिनने सुरू केलेली ही मोहीम मला पुढे न्यावीशी वाटली. समान काम, समान वेतन यासोबतच महिलांना या काळात काही सोयीसुविधा मिळायला हव्यात, असं मला वाटतं.''

निनाँग एरिंग यांनी हे विधेयक मांडल्यावर त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा मुद्दा महत्त्वाचा आहे पण त्यावर धोरण आखताना खूप काळजीपूर्वक आखावं लागेल, असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं. यामागचा हेतू चांगला आहे पण अशी पीरियड लीव्ह देण्याचा सरकारचा आता विचार नाही, असंही त्यात म्हटलं आहे.

जगभरात कुठे मिळते पीरियड लीव्ह?

जगभरात इटली, जपान, इंडोनेशिया यासारख्या देशांनी 'पीरियड लिव्ह'ची अंमलबजावणी केली आहे. पण भारतात अशी 'पीरियड लिव्ह' लागू करायला काही जणांनी विरोधही केला आहे.

मासिक पाळीमध्ये जर त्रास होत असेल तर सहानुभूती नक्कीच बाळगली पाहिजे. पण मासिक पाळी हा विषय आधीच स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव करण्यासाठी वापरला जातो. प्रथा - परंपरा, सोयीसुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण भागात मुलींना शाळेतही जाता येत नाही. अशा परिस्थितीत सुटी मागणं हा विरोधाभास आहे, असं वरिष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनीही एका मुलाखतीत म्हटलं आहे.

सर्वंकष धोरण आवश्यक

मेन्स्ट्रुपिडिया या मासिक पाळीविषयी जागृती करणाऱ्या संस्थेच्या आदिती गुप्ता यांना मात्र मासिक पाळीबद्दल एक सर्वंकष धोरण आखण्याची गरज वाटते. त्यांच्या संस्थेत मासिक पाळीची रजा ऐश्छिक आहे. या काळात रजा देण्याच्या मुद्दा महत्त्वाचा आहे पण मासिक पाळीच्या विषयावर संवेदनशील रितीने चर्चा केली पाहिजे, असं त्यांना वाटतं.

प्रतिमा मथळा या चर्चेत जास्तीत जास्त पुरुषांना सामावून घेतलं पाहिजे असं आदिती गुप्ता यांना वाटतं.

"आपण या चर्चेत जास्तीत जास्त पुरुषांना सामावून घेऊ तेवढा समाजाचा याबदद्लचा दृष्टिकोन बदलेल," असं त्या म्हणतात.

मासिक पाळीच्या रजेचा मुद्दा महत्त्वाचा आहे पण त्याआधी आपल्याला जनजागृती, संवाद, प्रशिक्षण हे टप्पे पार करावे लागतील, असं आदिती गुप्ता यांना मनापासून वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)