माणिक सरकार : वडिलोपार्जित घर पक्षाला देणारा मुख्यमंत्री आता कुठे राहणार?

माणिक सरकार Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कम्युनिस्ट पक्ष माणिक सरकार यांना वरखर्चासाठी पैसै देतं.

त्रिपुरामध्ये डाव्या पक्षाचा पराभव झाल्यावर माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी मुख्यमंत्री निवासस्थानातून काही कपडे आणि पुस्तकं घेऊन थेट पक्षकार्यालय गाठलं. हे त्यांचंच वडिलोपार्जित घर आहे.

त्रिपुरामध्ये माजी मुख्यमंत्र्यांना एक घर, स्वीय सचिव आणि Y दर्जाची सुरक्षा मिळेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. फक्त त्रिपुराच नाही तर इतर राज्यातसुद्धा ही तरतूद करण्यात आली आहे.

माणिक सरकार यांनी त्रिपुराच्या तलावाचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमध्ये आपलं वडिलोपार्जित घर आपल्या पक्षाला दिलं आहे. त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जो पगार त्यांना मुख्यमंत्री म्हणून मिळायचा तो ते पार्टी फंडात जमा करायचे आणि पक्ष त्यांना दैनंदिन खर्चासाठी पैसे द्यायचा. त्यांचा खर्च त्यांच्या पत्नीला मिळणाऱ्या पेन्शनमधून चालायचा.

त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचा पराभव झाला असला तरी माणिक सरकार यांच्याविषयी त्यांचे विरोधकही जरा जपूनच बोलतात.

म्हणूनच जेव्हा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा संसदीय कार्यमंडळाच्या बैठकीनंतर ते CPM च्या कार्यालयात गेले आणि माणिक सरकार यांच्या पाया पडले.

बिप्लब देवसुद्धा उदयपूरचे राहणारे आहेत. राजधानी अगरताळामध्ये असो वा उदयपूर, माणिक सरकार अनेकदा भाजी घेण्यासाठी पायी जाताना दिसतात. त्यांच्या पत्नीनं कधीच सरकारी वाहनाचा वापर केला नाही. त्या शिक्षिका होत्या आणि आपल्या शाळेपर्यंतचा प्रवास त्या बस किंवा ऑटोरिक्षानं करायच्या.

आता निवास फक्त एका खोलीत

माणिक सरकार यांनी आपला बंगला रिकामा केला आहे. अगरताळाच्या मेलारमाठ भागात CPMचं ऑफिस आहे. दसरथ देब स्मृती भवन नावानं ओळखल्या जाणाऱ्या या ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी एका खोलीची व्यवस्था केली असल्याचं पक्षाकडून कळलं.

पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं की, ते मुख्यमंत्री निवासस्थानातून काही कपडे आणि पुस्तकं घेऊन निघाले आणि थेट पक्षकार्यालयात पोहोचले.

सध्या ते प्रसारमाध्यमांशी बोलत नाहीत. पण पुढच्या काही महिन्यांसाठी त्यांचं हेच निवासस्थान असेल, असं पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे.

CPM कार्यालयात एका खोलीत बीबीसीशी केलेल्या अनौपचारिक चर्चेत त्यांनी सांगितलं की, दिल्लीत होणाऱ्या पक्षाच्या संमेलनात ते सहभागी होतील. त्रिपुरा आणि सध्याच्या विधानसभा निवडणुकीबद्दल मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

प्रतिमा मथळा दसरथ देब स्मृती भवन

एक पांढरा कुर्ता घातलेले माणिक सरकार काळा चहा पिताना कार्यकर्त्यांचे फोन घेत होते. हे कार्यकर्ते त्यांना त्यांच्यावर हल्ला होत असल्याचं सांगत होते. तुम्ही पोलिसांकडे जा, असा सल्ला माणिक सरकार प्रत्येकाला देत होते.

पक्षाच्या कार्यकत्यांचं सांगतात की, कदाचित ते आमदारांना मिळणाऱ्या सरकारी निवासस्थानातही जाणार नाही.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)