काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन; आज सांगलीत अंत्यसंस्कार

kadam Image copyright Bharati Vidyapeeth

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातलं मुरब्बी व्यक्तिमत्त्व पतंगराव कदम यांचं मुंबईत लीलावती रुग्णालयात निधन झालं आहे. ते गेले काही दिवस आजारी होते.

पतंगराव कदम यांचे पार्थिव शनिवार, 10 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान त्यांच्या घरी सिंहगड बंगल्यावर ठेवण्यात येणार आहे. नंतर त्यांचे पार्थिव धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात सकाळी 10.30 ते 11.30 या काळात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर सोनहिरा साखर कारखाना, वांगी, जि. सांगली येथे दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील.

शुक्रवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तब्येत खालावल्यामुळे गेल्या आठवड्यात पतंगरावांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती त्यांनी हाताळली होती. त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं नाव होतं.

पतंगराव यांचा जन्म 1944 साली सांगली जिल्ह्यातल्या सोनसळ या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर पुढे पुण्यात येऊन त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. शैक्षणिक प्रशासनाच्या विषयात त्यांनी पीएचडीही केली.

शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वयाच्या विसाव्या वर्षी सुरू झाली. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.

सुरुवातीच्या काळात विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे गणित आणि इंग्रजी विषयाच्या प्रमाणपत्र परीक्षा घेण्यापुरतं मर्यादित होतं. पण नंतर भारती विद्यापीठाचा विस्तार वाढत गेला.

Image copyright drpatangraokadam.com

शैक्षणिक क्षेत्रात काम करतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये विविध पदावर त्यांनी काम केलं.

कदम यांनी प्रथम, महाराष्ट्र मंत्रीमंडळात राज्य मंत्री म्हणून जून १९९१ ते फेब्रुवारी १९९३ पर्यंत काम केले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, तंत्रशिक्षण, जलसिंचन, जलप्रदाय क्षेत्र (कमांड एरिआ) विकास, माजी सैनिक कल्याण यांसहित विविध खाती हाताळली. त्यांनी शालेय शिक्षण विभागाचा स्वतंत्र प्रभारही सांभाळला.

कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती होऊन त्यांना उच्च आणि तंत्रशिक्षण आणि रोजगार ही खाती देण्यात आली.

डॉ. कदम महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर 1985-2014 या काळात पाच वेळा निवडून आले होते.

आदरांजली

"चार लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं त्यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचं काम लक्षात राहण्यासारखं आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे," असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

अशोक चव्हाण -

ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री

पतंगराव कदम हा गरिबीतून मोठा झालेला पण गरिबी न विसरलेला माणूस होता. हा सर्वसामान्य माणसाला मोठा धक्का आहे.

सुप्रिया सुळे -

सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

गजानन कीर्तीकर -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)