#5मोठ्याबातम्या : काँग्रेस मुस्लीम धार्जिणा पक्ष असल्याचं भाजपनं भासवलं- सोनिया गांधी

सोनिया गांधी Image copyright Getty Images

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. काँग्रेस मुस्लीम धार्जिणा असल्याची भाजपची बतावणी : सोनिया

भारतीय जनता पक्षाने आम्ही मुस्लीम धार्जिणा पक्ष असल्याचं भासवलं. मात्र हे खरं नाही. राहुल गांधी यांच्या मंदिरभेटी हे भाजपद्वारे निर्माण करण्यात आलेलं फसवं चित्र बदलण्यासाठीचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

"ब्रेनवॉश हा शब्द मी वापरणार नाही. कारण तो कठोर शब्द आहे. परंतु भाजपने सातत्याने काँग्रेस म्हणजे मुस्लिमांचे लांगुलचालन करणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण केली. आमच्या पक्षात सर्वाधिक हिंदू सदस्य आहेत. अनेक मुस्लीम नेतेही आहेत. त्यामुळे आम्हाला मुस्लिमांचा पक्ष ठरवणे चुकीचे आहे. आम्हाला एकटं पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र तो यशस्वी होणार नाही. आम्ही कुटुंबीय अनेकदा देवळात जातो. त्यात नवीन काहीच नाही. राहुलही यापूर्वी अनेकदा मंदिरात गेले आहेत," असं त्यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, "2004 मध्ये भाजपच्या शायनिंग इंडिया घोषवाक्याचं जे झालं होतं तेच अच्छे दिन संकल्पनेचं होणार आहे. राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. न्यायव्यवस्था अडचणीत सापडली आहे. सामान्य नागरिक, विद्यापीठं, विद्यार्थी सगळ्यांनाच झळ बसते आहे. प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे. मुक्त लोकशाहीच्या तत्वांना हरताळ फासला गेला आहे. भाजपला नमवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे."

पक्षाने सांगितल्यास 2019 निवडणुकीत रायबरेलीतून निवडणूक लढवेन असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकारणात पूर्णवेळ उतरायचे की नाही याबाबत प्रियंका गांधी स्वत: निर्णय घेतली असंही त्यांनी सांगितलं.

2. मुंबई लोकल तोट्यात

मुंबई लोकल सेवा पूर्णपणे तोट्यात चालत असून गेल्या तीन वर्षात मुंबई लोकलचा तोटा तब्बल चार हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्यांना दरवाढ सहन करावी लागू नये, या भूमिकेतून रेल्वेच्या तोट्यात भर पडत गेली आहे. महाराष्ट्र टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

रेल्वे राज्यमंत्री रईन गोहेन यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात 2014 ते 2017 पर्यंत मुंबई लोकलला 4,279 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावर लोकलच्या दररोज 2,342 फेऱ्या होत असून त्याचा फायदा सुमारे 75 लाख प्रवासी घेतात.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा मुंबई लोकलसेवा तोट्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

2006-07 पर्यंत मुंबई लोकलचा तोटा 50 कोटींच्या आसपास होता. 2008-09 हा तोटा 328 कोटी रुपयांवर गेला. 1 जानेवारी 2016 पासून सहावा वेतन आयोग लागू झाल्याचा परिणामही तोट्यात दिसून आला. 1999 ते 2000 हा तोटा एक हजार कोटी रुपयांवर गेला. मात्र फेऱ्या आणि तिकीट महसूलातून मिळणारे उत्पन केवळ 6.5 टक्केच राहिले.

3. क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

पत्नी हसीनच्या तक्रारीवरून भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात हत्येचा प्रयत्नासह अन्य गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिव्य मराठीने यासंदर्भात बातमी दिली आहे. कोलकात्याच्या जादवपूर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Image copyright facebook
प्रतिमा मथळा पत्नी हसीना यांनी पती मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले आहेत.

तक्रारीत शमीची आई, बहीण, वहिनी यांच्या नावांचाही समावेश आहे. त्याच्या कुटुंबीयांविरोधात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीने त्याच्या भावाशी शारीरिक संबंध ठेवण्याची बळजबरी केली असा गंभीर आरोप शमीची पत्नी हसीन यांनी केला आहे. दरम्यान शमीने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. हसीन आणि तिच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याविरुद्ध कोणीतरी तिला भडकावत आहे असं शमीने सांगितलं.

4. सीआयएसएफतर्फे पंचतारांकित हॉटेलांना सुरक्षा सल्ला

भविष्यात 26/11सारख्या दहशतवादी हल्ल्यांना सामोरं जाण्यासाठी 'द सेंट्रल इंडस्ट्रीअल सेक्युरिटी फोर्स' अर्थात सीआयएसएफतर्फे पंचतारांकित हॉटेलांना सुरक्षेसंदर्भात सल्ला पुरवण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे. सीआयएसएफने यासाठी कृती आराखडाही तयार केला आहे. 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताजमहाल तसंच ट्रायडेंट हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं होतं. सीसीटीव्ही कॅमेरे कुठे बसवायचे, सुरक्षारक्षकांची नियुक्ती कशी करावी, प्रवेश तसंच बाहेर पडण्यासाठीच्या मार्गावर नियंत्रण कसं ठेवावं, हॉटेल कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीसाठीचं प्रशिक्षण, आपात्कालीन मदत अशा अनेक मुद्यांवर सीआयएसएफतर्फे हॉटेलांना मार्गदर्शन करण्यात येईल.

5. आरोपींची तोंडं उघडण्यात तपासयंत्रणा अपयशी

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आरोपींना बोलते करण्यात आणि त्यांच्याकडून गुन्ह्याविषयीची माहिती मिळवण्यात तपासयंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. एनआयए वापरत असलेल्या पद्धतीप्रमाणे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देश सीबीआय आणि महाराष्ट्र एसआयटीला द्यावेत अशी विनंती दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांतर्फे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली.

प्रतिमा मथळा दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनी खटल्याच्या तपासात मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या दोन्ही कुटुंबीयांतर्फे दाखल करण्यात आलेल्या फौजदारी जनहित याचिकेवर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)