'वय वाढलं तरी महिलांनी सुंदर दिसण्याचा आग्रह का?'

श्रीदेवी, अभिनेत्री, महिला, Image copyright AKKINENIAMALA
प्रतिमा मथळा अभिनेत्री अमला

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न समोर आले आहेत. त्यातीलच एक म्हणजे महिलांनी सतत सुंदर दिसेल पाहिजे, यासाठी असलेला दबाव, हा होय. दाक्षिणात्य अभिनेत्री अमला यांनी यांनी सविस्तर विचार मांडले आहेत. सतत तरुण आणि चांगलं दिसण्याचा दबाव केवळ अभिनेत्रींवरच नाही तर सामान्य महिलांवरही असतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

श्रीदेवी यांच्या मृत्यूचं वार्तांकन अनेकांना रुचलं नाही. बहुसंख्यांनी या वृत्तांकनावर नाराजी व्यक्त केली होती. अमला यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांची भूमिका मांडली.

या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी वाढतं वय हा महिलांसाठी किती कळीचा प्रश्न या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. वय वाढतं असलं तरी महिलांना सतत तरुण आणि सुंदर दिसण्याची कशी अलिखित सक्ती असते, याविषयावर त्यांनी त्या पोस्टमध्ये विचार मांडले होते.

"अनेक प्रोफेशनल आणि सोशल ग्रुपमध्ये महिला कशी दिसते याला प्रचंड महत्त्व दिलं जातं हे मी अनुभवलं आहे," असं अमला यांनी सांगितलं.

"आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांना सुंदर दिसावं याची मनापासून इच्छा असते. त्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सुंदर दिसणाऱ्या व्यक्तींनी त्यांना प्रभावित करतात," असं त्या सांगतात.

सुंदर दिसण्याचा दबाव

महिला नेहमी सतत सुंदर दिसण्याचं दडपण का घेतात, असं अमला यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "महिलांचं वय वाढू नये अशी एक मानसिकता आहे. काळ पुढे सरत असला तरी वय तेवढंच राहावं असं काहीतरी असावं. पृथ्वीतलावावरच्या प्राण्याला घ्या. तरुण काळातच तो सुंदर दिसतो."

अमला पुढे म्हणतात, "तरुण असताना प्रत्येकजण सुंदरच दिसतो. वय वाढू लागतं तसं आजूबाजूचे लोक तुमची तरुणपणीचे फोटो बाहेर काढून तुलना सुरू करतात. तुम्ही कसे होतात आणि आता कसे झालात अशी तुलनाही सुरू होते. पण माणूस दोन वेगवेगळ्या वयामध्ये सारखा कसा दिसू शकेल?"

सेलिब्रेटी स्वत:हूनच दडपण आणतात की प्रसारमाध्यमांकडून दबाव आणला जातो, याविषयी अमला यांना विचारलं असता त्या सांगतात, "श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्तांकन पाहिल्यानंतर दडपणाची जाणीव तीव्र होते. इतकी मोठी कलाकार एवढ्या कमी वयात जगाचा निरोप घेते हे अविश्वसनीय आहे."

"मी कुठेही गेले तरी लोक माझ्याबद्दल काय बोलत आहेत याकडे माझं लक्ष असते. लोक काहीही बोलू शकतात. बोलण्यापूर्वी ते विचार करत नाहीत. लोक विचित्र प्रश्नही विचारतात. तुमचा रंग काळा होऊ लागला आहे, असं का? तुमचं वजन वाढलं आहे असं काहीबाही विचारतात. ही केवळ माझी अवस्था नाही. हे सगळ्यांबाबत घडतं," असं त्या म्हणाल्या.

फिट राहणं आवश्यक

त्या म्हणतात, "हे सगळं लक्षात घेऊनच मी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्याविषयी अमला सविस्तरपणे सांगतात. त्या म्हणतात, 'महिलांनी फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. यात काही चूक नाही. मात्र विशिष्ट फिगर असायला हवी असा अट्टाहास चुकीचा आहे. सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटायला हवं. वय वाढू लागलं की झोपताना दिवसभरातल्या कामाने येणाऱ्या थकव्याची प्रकर्षाने जाणीव होते. साधं चालतानाही दमायला होतं. अशावेळी शरीराच्या प्रतिसादाकडे आपण लक्ष द्यायला हवं."

Image copyright AKKINENIAMALA
प्रतिमा मथळा अभिनेत्री अमला आपल्या पाळीव कुत्र्यांसमवेत.

"अनेकदा पत्रकार माझी मुलाखत घेण्यासाठी येतात. मुलाखतीदरम्यान ते विचारतात की नागार्जुन यांच्यासाठी काय स्वयंपाक बनवता? आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी स्वयंपाक करतात हे सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं. त्यानंतर मुलाखतकार आणि माझ्यातला संवादच खुंटतो. त्यावेळी मी तो संवाद समाजातील अन्य घटनांकडे वळवते. महिला सामाजिक दबावाचा सामना कसा करतात यावर ते अवलंबून असतं," असं त्या म्हणाल्या.

स्त्रियांना अनेकदा ठोकळेबाज साचेबद्ध प्रश्नांना सामोरं जावं लागतं. लग्नासंदर्भातले प्रश्न, मुलांच्या संगोपनाबाबतचे प्रश्न अशा अनेक त्याच त्याच स्वरूपाच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो, या चौकटीला भेदण्यासाठी महिलांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण करून जपणे आवश्यक आहे असं अमला सांगतात.

सौंदर्यापेक्षा कलात्मकता महत्वाची

सौंदर्य एक प्रतिमा असते. सौंदर्याची धारणा सापेक्ष असते. मात्र त्याचबरोबरीने धैर्य, बुद्धिमत्ता, जबाबदारी, ताकद अशा अन्य गुणवैशिष्ट्यांकडेही लक्ष द्यावं लागतं, असं त्यांचं मत आहे.

तुमच्या चाहत्यांना तुम्ही सदैव तरुण असावं असं वाटतं याविषयी विचारलं असता अमला म्हणाल्या, "ही एकतर्फी गोष्ट झाली. सौंदर्याच्या बरोबरीने चित्रपटात कलाविष्कार असतो. दर्जेदार कथानक, सशक्त अभिनय या गोष्टीही असतात. लोकांना तेही आवडतं. चांगलं काम सातत्याने करत राहण्यासाठी कलाकाराने फिट राहणं आवश्यक आहे. मात्र याचा अर्थ त्याने सदैव सुंदर दिसणं एवढाच होत नाही. काही लोकांना नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली असते. काही कामातून सौंदर्याला अर्थ प्राप्त करून देतात."

Image copyright ACEBOOK/AKKINENIAMALA
प्रतिमा मथळा अमला

"चौकट तोडण्यासाठी चित्रपट क्षेत्राने पुढाकार घेणं आवश्यक आहे. मात्र त्यांनाही मर्यादा आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हानं आहेत. अनेकदा चित्रपटाचं काम संपल्यानंतर चमूतील सदस्यांशी एकमेकांशी पुन्हा भेट होत नाही. म्हणूनच चित्रपटांचं शिक्षण भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतं," असं अमला यांनी सांगितलं.

त्यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टबद्दल त्या म्हणतात, "घरी वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेत असताना हे सगळं मला सुचलं. राहवलं नाही आणि फेसबुकवर पोस्ट टाकली. प्रतिसादाने खूप समाधानी वाटतं आहे. महिलांनी मोकळेपणाने स्वत:चे विचार जगासमोर मांडणं आवश्यक आहे. त्यांनी कर्मठ परंपरा तोडून जगायला हवं आणि हे करताना धडपडणाऱ्या दुसऱ्या महिलेची मदतही करायला हवी."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)