पतंगराव कदम : 5 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली तेव्हा...

पतंगराव कदम Image copyright BHARATI VIDYAPEETH

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातलं मुरब्बी व्यक्तिमत्व पतंगराव कदम यांचं शुक्रवारी (दिनांक 9 मार्च) मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झालं. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे न होऊ शकलेले मुख्यमंत्री म्हणून अनेकांनी त्यांचा उल्लेख केला आहे.

1999नंतर काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री बदलायची किंवा मुख्यमंत्री निवडीची चर्चा झाली, तेव्हा तेव्हा पतंगराव कदम यांचं नाव नेहमी चर्चेत आलं. साधारणतः पाच वेळा मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे आलं. पण पाचही वेळेला त्यांना या पदानं हुलकावणी दिली.

1999 ते 2014 दरम्यान महाराष्ट्रात निवडणुका जिंकून आल्यावर किंवा आधीच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागल्यानं साधारणतः सहा वेळा काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा केली. त्यापैकी पाच वेळा पतंगराव कदम यांचं नाव अग्रभागी होतं, असं राजकीय निरीक्षक सांगतात.

"एक दिवस आपण राज्याचं नेतृत्व हातात घ्यावं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, अशी त्यांची खूप इच्छा होती", कोल्हापुरातले ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी पतंगरावांच्या आठवणी सांगताना बीबीसीला ही माहिती दिली.

"1999ला सरकार स्थापनेच्या निमित्तानं वार्तांकनासाठी मी दहा-बारा दिवस मुंबईत होतो. त्यातील आठ-नऊ दिवस रोज पतंगराव कदम यांची भेट झाली. त्यावेळी ते नेहमी म्हणायचे की मी, एक दिवस मुख्यमंत्री होणारच. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये इतर भागातील आमदार जास्त निवडून आले होते. त्यामुळे पतंगराव त्यांचा दबावगट निर्माण करू शकले नाहीत आणि विलासरावांनी बाजी मारली."

"त्या वेळी ते म्हणाले होते की, ही संधी गेली, पुढच्या वेळी पाहू," असं भोसले सांगतात.

Image copyright DrPatangraoKadam.com

सांगलीतले पत्रकार शिवाजी मोहिते हेही पतंगरावांची अशीच एक आठवण सांगतात, "सांगलीत पत्रकारांशी बोलताना ते नेहमी म्हणायचे की, माझी खूप इच्छा आहे. पण अजून माझा नंबर येत नाही."

"1999च्या निवडणुकीच्या वेळी ते स्पर्धेत होते. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि पतंगराव यांचं नाव चर्चेत होतं. पण ते होऊ शकलं नाही. नंतरच्या काळात तब्येतीमुळे किंवा अन्य कारणांमुळे असेल पण ते स्पर्धेतून बाजूलाच गेले."

"युतीच्या पराभवानंतर काँग्रेसची 1999मध्ये पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा आणि 2008ला त्यांनी खूप प्रयत्न केले होते", असं मोहिते सांगतात.

Image copyright Facebook

मुंबईतले राजकीय पत्रकार संतोष प्रधान सांगतात, "पतंगराव कदम हे स्वतःच सांगायचे की माझं नाव स्पर्धेत आहे."

"राज्यात काँग्रेस सत्तेत असताना 2003मध्ये विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करायचं ठरलं तेव्हा पतंगराव आणि रोहिदास पाटील यांनी प्रयत्न केले होते. ते दिल्लीतही जाऊन आले होते. पण त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली", प्रधान सांगतात.

"2004 मध्येही पतंगरावांचं नाव चर्चेत आलं. पण काँग्रेस पक्ष त्यांच्या नावाबाबतीत गंभीर नसल्याचं नेहमी जाणवलं. नारायण राणे काँग्रेसमध्ये आल्यावर तर तेच मुख्यमंत्री होणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. तेव्हाही पतंगराव कदम यांनी मी स्पर्धेत असल्याचं पत्रकारांना सांगितलं होतं", संतोष प्रधान म्हणाले.

हुलकावणी देणारे हे 5 प्रसंग

पत्रकार वसंत भोसले यांनी पतंगरावांविषयी आठवणी सांगताना या पाच प्रसंगांची माहिती दिली.

1. 1999 : सत्तापालटानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली, तेव्हा पहिल्यांदा पतंगराव कदम यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं. पण त्यावेळी त्यांची एवढी चर्चा नव्हती.

2. 2003: मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तेव्हा नवे मुख्यमंत्री म्हणून पतंगराव यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. पण त्यांच्याऐवजी सुशीलकुमार शिंदे यांना संधी मिळाली.

Image copyright Bharati Vidyapeeth / Bharati Vidyapeeth Deemed Uni

3. 2004: निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तेव्हा विलासराव देशमुख यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदावर निवडण्यात आलं. त्यावेळीही पतंगराव कदम यांना या पदासाठीचे एक दावेदार समजलं जात होतं.

4. 2008 : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्यापाठोपाठ विलासराव यांनीही राजीनामा दिला. निवडणुका वर्षभरानंतर होणार होत्या. त्यावेळी पतंगराव कदम पुन्हा एकदा या पदाचे दावेदार म्हणून पुढे आले. पण त्यावेळी अशोकराव चव्हाण यांनी बाजी मारली आणि ते मुख्यमंत्री झाले.

5. 2009: काँग्रेस- राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अशोक चव्हाण हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण पुढल्याच वर्षी 2010 मध्ये त्यांना हटवण्यात आलं. तेव्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद कुणाला याची चर्चा झाली आणि पतंगरावांचं नाव चर्चेत पुढे आलं. पण या वेळी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून महाराष्ट्रात पाठवलं.

मुख्यमंत्रिपद दूर राहिलं कारण...

पतंगराव कदम काँग्रेसचे एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेते होते, तरीही मुख्यमंत्रिपद दूर का राहिलं याविषयी पत्रकार वसंत भोसले सांगतात, "जेष्ठ नेते म्हणून त्यांचं नाव नेहमी चर्चेत असायचं. पण त्यांचा पाठीराखा गट असा नव्हता. ते कधी लॉबिंग करायचे नाही. ते त्यांना जमलं नाही. सर्वांशी संबध ठेवायचे. लॉबिंग करून दबाव गट करावा, असं त्यांनी कधी केलं नाही. हायकमांडवर त्यांचा फार विश्वास होता. काँग्रेसमध्ये असं होत नसतं, असं त्यांना वाटायचं. त्यांच्यात एक मोकळेढाकळेपणाही होता. लॉबिंगसाठी जे काही करायची तयारी असावी लागते ती त्यांच्यात नव्हती."

Image copyright Paadise

"राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यानंतर काँग्रेसमध्ये फार थोडे मास लीडर राहिले होते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी पतंगराव कदम यांच्यावरच होती. पण पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रावादीचं वर्चस्व होतं. कदाचित हेही एक कारण असेल."

"लॉबिंग करायला ते कमी पडले, कारण राष्ट्रवादी सत्तेत होती. अशातच त्यांना मानणारे लोक पश्चिम महाराष्ट्रात होते. खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागातील नेत्यांचं काँग्रेसमध्ये त्या वेळी वर्चस्व होतं. त्यामुळे तिकडचेच मुख्यमंत्री झाले. काँग्रेस एक जर असती तर कदाचित चित्र वेगळं असतं," असं वसंत भोसले सांगतात.

सांगलीचे पत्रकार शिवाजी मोहिते यांनी स्थानिक राजकारणाचे पदर उलगडून सांगितले. त्यांनी माहिती दिली. "1980 ला अपक्ष म्हणून ते पहिल्यांदा निवडून आले. 1985ला फक्त सात मतांनी पराभूत झाले. 1990 ला निवडून आल्यानंतर पाच वर्षं ते शिक्षण राज्यमंत्री होते. 1995ला पुन्हा पराभूत झाले. 1999नंतर 2014 पर्यंत सलग निवडून आले." ते म्हणाले.

Image copyright Bharati Vidyapeeth / Bharati Vidyapeeth Deemed Uni

"1995आधी सांगली जिल्ह्यातच काँग्रेसचे दोन गट परस्पर सक्रीय होते. याकाळात पतंगरावांना फारसं काही करता आलं नाही. पतंगरावांबरोबरच आर.आर. पाटील यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1999-2000मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यावेळेस आर.आर. पाटील हे राष्ट्रवादीत गेले आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले."

"राज्यात पतंगरावांचा स्वतःचा गट कधी नव्हता. आमदारांचा दबाव गट पाठीशी लागतो. तो कधी तयार नाही झाला. जे आमदार त्यांच्यापाठीशी होते, ते मुख्यमंत्री पदासाठी नाव पुढे करण्यासाठी पुरेसे नव्हते. याशिवाय दिल्लीत त्यांची लॉबिंग नव्हती. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे पतंगराव स्पर्धेत असताना मुख्यमंत्री झाले. या नेत्यांचं दिल्लीत प्रस्थ होतं." अशी मोहिते यांनी दिली.

संतोष प्रधान म्हणतात, "त्यांचा स्वभाव अघळपघळ होता. ते लोकांमध्ये मिसळायचे. त्यामुळे लोकांना वाटायचं हे मुख्यमंत्री होतील. पण दिल्लीत त्यांचं नाव पक्षाकडून कधी गांभीर्यानं घेतलं गेलं नाही."

सांगलीतले ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या मते, पतंगराव कदम यांच्या कारकिर्दीचा विचार केल्यास मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली किंवा डावललं गेलं असा विषय नाही.

सहस्रबुद्धे सांगतात, "पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात हा विषय कधीच प्रकाशातझोतात नव्हता. ज्येष्ठ नेते म्हणून सगळीकडे पतंगरावांचं नाव असायचं. इच्छुक असल्याची चर्चा तर होतच असते. पण त्यांना जी मंत्रिपदं मिळाली, ती त्यांनी जबाबदारीनं सांभाळली. या खात्यांमध्ये पतंगरावांनी केलेलं काम लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते उद्योगमंत्री असतानाच्या काळात पुण्यात उद्योगांचा विकास झाला. पतंगरावांचे हे पैलू मला जास्त महत्त्वाचे वाटतात."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)