#पाळीविषयीबोलूया : पाळी सुरू होण्याचं वय अलीकडे येतंय का?

वयात येताना Image copyright Getty Images

पाळी सुरू होण्याचं वय अलीकडे येत चाललंय का? त्याची काय कारणं आहेत आणि बाल्यावस्थेतच पौंगडावस्था प्राप्त होणाऱ्या या मुलींचे, पालकांचे प्रश्न कसे समजून घ्यायचे? पौगंडावस्थेतील मुला- मुलींच्या प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितलेले अनुभव आणि उपचार.

'डॉक्टर, अहो माझी मुलगी आत्ताशी कुठे चौथीत गेलीय. जेमतेम ती आपापली आंघोळ करायला शिकलीय. तरी केस धुवायला मीच लागते तिला. किती निरागस आहे ती अजून! हे पाळी वगैरेचं तिला काही कळेल तरी का? आणि कोणत्या शब्दात सांगू तिला?'

माझ्यासमोर बसलेली मृणालची आई एकदम गोंधळून गेलेली दिसत होती. नेहमीच्या लसी घेण्यासाठी मृणालला (नाव बदललं आहे) घेऊन ती आली होती. लस देण्याआधी शिरस्त्याप्रमाणे मी तिचं उंची-वजन मोजून चार्टमध्ये भरलं आणि तिला तपासलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मृणालची उंची एकदम वाढायला लागली आहे आणि तिच्या स्तनांच्या गाठीही तयार झाल्यात.

ही लक्षणं सुचवत होती की मृणाल वयात यायला लागली आहे आणि पुढच्या एक ते तीन वर्षांमध्ये तिला पाळी येण्याची शक्यता आहे. अर्थातच मी तिला याविषयी काही माहिती दिली आहे का ते विचारलं. ते ऐकूनच मृणालची आई गोंधळली होती.

अशा केसेस क्लिनिकमध्ये येणं आजकाल नवल राहिलेलं नाही. पाळी सुरू होण्याचं वय अलीकडे येत चाललंय हे नक्की. वैद्यकीय संशोधनांमधूनही याला पुष्टी मिळतेय.

शाळांमध्ये वयात येण्याविषयी माहिती देण्यासाठी सत्र घेतली जातात ती पूर्वी आठवीतल्या वर्गासाठी घेतली जायची. हळूहळू हे वर्ग मागे मागे येत आता पाचवीतल्या मुलींसाठी घ्यायला लागत आहेत.


#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतला हा लेख आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या लेखमालेचा उद्देश आहे.


अमेरिका, युरोप सारख्या पुढारलेल्या देशांपासून ते आशिया-आफ्रिकेतल्या विकसनशील, अविकसित देशांपर्यंत सगळ्या प्रदेशांत हे बदल दिसताहेत. त्याचं एक कारण आहे माणसाची उत्क्रांती. जसजशी मानवजात विकसित होत जाईल, तसतसे आपल्या शरीरात काही बदल अपरिहार्यपणे दिसून येतात, त्यातलाच हा एक.

तसं बघायला गेलं तर पाळी सुरु होणे ही काही पहिली खूण नव्हे मुलींच्या वयात येण्याची. सगळ्यात पहिली खूण असते छातीतल्या स्तनपेशींची वाढ.

पाळी सुरू होण्याचं नॉर्मल वय

आजच्या व्याख्येनुसार आठ वर्षांच्या नंतर जर या वाढीला सुरुवात झाली तर ती नॉर्मल समजली जाते. त्याच्या साधारण एक ते तीन वर्षांनंतर पाळी सुरु होते.

Image copyright Getty Images

भारतात पाळी सुरु होण्याचं सर्वसाधारण वय आहे साडेअकरा वर्षं! अमेरीकन मुलींपेक्षा हे जवळजवळ एक वर्ष अलीकडे आहे. एकूणच आपल्या आजूबाजूच्या वातावरणात खूप बदल झालेयत. आपली जीवनशैली कमालीची बदललीय. ती निसर्गापासून दूर दूर जातेय.

लवकर वयात येण्याची कारणं

भाज्या, फळं आणि इतर पिकं जोमानं यावीत यासाठी मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर होतो. दूध देणारे गाई-म्हशीसारखे प्राणी हाच चारा खातात. त्यामुळे डेअरी पदार्थांमध्ये या रसायनांचं प्रमाण लक्षणीय आहे. तीच गोष्ट चिकन, मटण, मासे यांची. शिवाय आपण वापरतो ती प्लास्टिकची भांडी, बाटल्या यातूनसुद्धा खूप रसायनं आपल्या पोटात जात आहेत.

ही रसायनं आपल्या शरीराला गोंधळवून टाकतात. मुख्यत: आपली हॉर्मोन्स तयार करणारी संप्रेरकसंस्था खूपच गडबडते. ही Endocrine disruptive chemicals किंवा ईडीसी ही रसायनं वातावरणातल्या अनेक घटकांमध्ये सापडतात. प्रजननसंस्थेतल्या GnRH, गोनॅडोट्रॉपिन्स, इस्ट्रोजेन अशा संप्रेरकांशी ती स्पर्धा करतात.

त्यामुळे वयात येण्याचे बदल आजकाल लवकर सुरू होतात. त्याचबरोबर लहान मुलांच्यात वाढलेली स्थूलता आणि टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यासमोर घालवलेला अतिरिक्त वेळ हेही लवकर पाळी यायला कारणीभूत ठरतात असं आढळून आलं आहे.

लवकर वयात येताना...

पाळी सुरू झाल्यावर सगळ्यांत महत्त्वाची असते स्वच्छता. पण ती नीट करता येण्याजोगी परिपक्वता अजून आलेली नसते. दुसरं म्हणजे पाळीच्या अंतर्गत घटनेबरोबर बाहेरून पटकन दिसणारे अनेक बदल होत असतात. त्यांना तोंड देणं आव्हानात्मक वाटतं मुलींना आणि त्यांच्या आयांनाही.

स्तनांची वाढ झाल्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी स्लिप, स्पोर्ट्स ब्रा, बिगिनर्स ब्रा किंवा रेग्युलर ब्रा वापरावी लागते. काखेत केस आल्यामुळे स्लीव्हलेस कपडे घालणं अवघड जातं. चेहरा तेलकट होतो आणि पिंपल्स येतात. शिवाय या मुलींमध्ये प्रौढ वयात स्तनांचा कर्करोग, ब्लड प्रेशर, डायबेटिस अशासारख्या काही दुखण्यांचं प्रमाण जरा जास्त आढळून आलंय.

वाढत्या वयाशी जुळवून घेताना...

प्रत्यक्ष पाळी सुरू होण्याआधी मुलींची उंची जोमानं वाढायला लागते. साहजिकच या मुली वर्गात उंच आणि मोठ्या दिसायला लागतात. पण एकदा का पाळी सुरु झाली की हाडांची वाढती टोकं जुळतात आणि उंचीची वाढ होणं बंद होतं. त्यामुळे सुरुवातीला जरी उंच दिसत असल्या तरी त्यांची फायनल उंची तशी कमीच असते.

Image copyright Getty Images

या शारीरिक अडचणींबरोबरच काही सायकोसोशल किंवा मनोसामाजिक समस्या येतात. त्या हाताळायला जरा जास्त अवघड जातात.

आपल्या शरीरप्रतिमेविषयी मुली खूप जागरूक होतात. शरीराचा आकार बदलल्यामुळे त्या खेळणं कमी करत हळूहळू बंदच करतात. त्यामुळे ज्या वयात भरपूर शारीरिक व्यायामाची आवश्यकता असते, तेव्हाच नेमका तो होत नाही.

लैंगिक नजरांचा सामना

दिसताना जरी मोठ्या दिसत असल्या तरी या मुली खरंतर लहानच असतात. लोक मात्र त्यांच्याकडून परिपक्व वागण्याची अपेक्षा करतात.

लोकांच्या लैंगिक नजरांना तोंड द्यायला लागतं ते वेगळंच. आपल्याकडे मुलगी वयात आली की, तिच्यावर जी बंधनं घातली जातात ती फार लवकर या मुलींवर येतात.

मुली आपल्या मानसिक वयापेक्षा शारीरिक वयाच्या जवळ येणाऱ्या, थोडया मोठ्या मुलींशी मैत्री करतात. त्यामुळे व्यसनं, असुरक्षित लैंगिक संबंध, त्याबाबतचे प्रयोग, डिप्रेशनसारखे मानसिक आजार हेही यांच्यात जास्त आढळतात.

मुख्य म्हणजे हे सगळं त्यांना समजावून सांगणं काहीसं अवघड असतं, कारण त्यांचा मेंदू अजून तितका विकसित झालेला नसतो.

मानसिक पूर्वतयारी आवश्यक

स्तनांची वाढ पाळी येण्याच्या आधी होते, त्यामुळे ही एक सोयीची पूर्वसूचना असते. मुलींची आणि त्याचबरोबर आपली मानसिक तयारी करण्याची ती आपल्याला एक संधी देते.

त्याचबरोबर ही वाढ जर फार लवकर सुरू झालेली लक्षात आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. शारीरिक तपासणी, काही रक्ताच्या तपासण्या, हॉर्मोन्सच्या पातळया आणि हाडांचं वय समजण्यासाठी मनगटाच्या हाडांचा एक्स रे अशा काही चाचण्यांनंतर डॉक्टर काही निर्णय घेऊ शकतात.

काही औषधांच्या, इंजेक्शनांच्या सहाय्यानं हा लैंगिक विकास तात्पुरता पुढे ढकलता येतो. पण तसं ठाम कारण नसेल तर बहुतेकवेळा हॉर्मोन्समध्ये फार लुडबुड करत नाही आपण.

हे टाळता येईल का?

पालकांचा नेहमी प्रश्न असतो की हे सगळं इतक्या लवकर होणं टाळता येईल का? काही गोष्टी करणं आपल्या हातात आहे.

उदाहणार्थ प्लास्टिकच्या बाटल्या न वापरणे, प्लास्टिकच्या भांड्यात मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न गरम न करणे, स्क्रीन समोर घालवलेला वेळ कमी करणे, प्रोसेस्ड फूडचा वापर टाळणे, भरपूर खेळून वजन वाढू न देणे.

पण खरं सांगायचं तर आपल्या जीवनशैलीमध्ये झालेले बदल पूर्णपणे उलटे करणं जवळजवळ अशक्य आहे. वातावरणात वापरली जाणारी रसायनं टाळणं काही आपल्या हातात नाही. प्लास्टिक वापरायचं नाही म्हटलं तरी ते शक्य नाही. कॉम्प्युटर्सचा वापर कसा टाळणार?

म्हणजे या बदलांचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याही मनाची तयारी त्यासाठी करायला हवी. याबद्दल मुलींसमोर 'अरेरे', 'बिच्चारी' असं न चुकचुकता सकारात्मक राहायला हवं. पाळी येणं ही गोष्ट पूर्वीइतकी त्रासदायक राहिलेली नाही. आज चांगल्या प्रतीचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत. बहुतांश शाळांमध्ये बाथरूम्सची सोय आहे. आणि आपल्याला वाटतं त्यापेक्षा मुली या बदलांना बऱ्याच सहजतेनं सामोऱ्या जातात ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे.

(डॉ. वैशाली देशमुख बालरोगतज्ज्ञ असून पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांच्या विशेषतज्ञ - Adolescence expert- आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)