शेतकरी लाँग मार्च : मध्यरात्रीच आझाद मैदानात पोहोचणार

भारतीय किसान सभा Image copyright PRASHANT NANAWARE

भारतीय किसान सभेच्या पुढाकारानं सुरू झालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईत दाखल झाला आहे. सोमवारी विधानभवनाला घेराव घालण्याचा त्यांचा इरादा आहे.

त्यासाठी ते सोमवारी सकाळी दक्षिण मुंबईकडे कूच करणार होते. पण दहावीची परीक्षा असल्यानं सोमवारी अडचण होऊ नये म्हणून नाशिकहून मुंबईत पोहोचलेले शेतकरी रविवारी मध्यरात्रीच आझाद मैदानात जाणार आहेत, अशी माहिती मिळाली.

"जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन आपल्याला मुंबईच्या दिशेने निघायचं आहे", अशी घोषणा आमदार जीवा पांडू गावित यांनी रात्री उशीरा केली. सोमय्या मैदानावर रात्री उशीरा शेतकरी विश्रांतीसाठी थांबले असताना त्यांनी ही घोषणा केली.

रात्री दोन वाजता मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघणार आहे.

रविवारी सकाळी मुलंड-आनंदनगर चेकनाक्यावरुन निघालेले शेतकरी घाटकोपरच्या सोमय्या मैदानात पोहोचले आहेत. जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही मोर्चेकऱ्यांची भेट घेतली.

संध्याकाळी चेंबूरजवळ पोहोचलेल्या मोर्चातली दृश्य इथे पाहा -

दरम्यान, "दहावीची परीक्षा असल्यानं सोमवारी अडचण होऊ नये म्हणून रविवारी रात्रीच आम्ही चुनाभट्टी ते आझाद मैदान हा प्रवास करणार आहोत," असं भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

"सोमवारी सरकारनं आम्हाला चर्चेसाठी बोलावलं आहे. आमचं शिष्टमंडळ दुपारी 2 वाजता विधिमंडळात जाऊन सरकारशी चर्चा करणार आहोत. शेतकरी त्या काळात आझाद मैदानात थांबणार आहेत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महानगरपालिकेनं हा मोर्चा लक्षात घेऊन आझाद मैदानात मोबाईल शौचालय, चार वॉटर टँकर, रुग्णवाहिका, सफाई कर्मचारी यांची व्यवस्था केली आहे.

चार प्रमुख मागण्या!

अखिल भारतीय किसान सभेतर्फे काढण्यात आलेल्या नाशिक ते मुंबई या लाँग मार्चदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील शेतक-यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीसह आदिवीसींच्याही काही विशेष मागण्या आहेत. कॉ. आमदार जीवा पांडू गावित यांनी त्या मागण्या बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितल्या.

  • जमीन : आदिवासींच्या वनजमिनींचा प्रश्न मोठा आहे. वनजमिनी कसणाऱ्यांच्या नावावर वनजमीन झाली पाहिजे. तसंच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे.
  • पाणी : आदिवासी भागातील पश्चिमेकडे जाणारं पाणी अडवून त्याचा फायदा स्थानिकांना करून दिला पाहिजे. उर्वरित पाणी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला दिलं गेलं पाहिजे.
  • रेशनकार्ड : आदिवासींना नवीन रेशनकार्ड दिलं गेलं पाहिजे. केशरी रंगाच्या रेशनकार्डवर धान्य महाग मिळतं. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डाचं वाटप करण्यात यावं.
  • पेन्शन : नियमितपणे पेन्शन मिळायला पाहिजे. तसंच पेन्शनची रक्कम 600 रुपयांवरून वाढवून 1500 करण्यात यावी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)