#5मोठ्याबातम्या : सोनिया गांधी की शरद पवार - विरोधकांचा नेता कोण?

शरद पवार Image copyright Twitter/SharadPawar

वृत्तपत्रांतील आणि विविध वेबसाईट्सवरील आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. सोनिया गांधी की शरद पवार - विरोधकांचा नेता कोण?

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या हेतूनं आज भोजनाचं आयोजन केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही विरोधकांच्या बैठकीचं आयोजन केले आहे.

या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधी गटातले बडे नेते येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला असल्याचे यात म्हटलं आहे.

2. आंदोलनाच्या जागेसाठी अण्णांचं मोदींना पत्र

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

हजारे यांचे आंदोलन 23 मार्चपासून नियोजित आहे. महाराष्ट्र टाइम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Image copyright Reuters

या विषयावर हजारे यांनी नोव्हेंबरपासून आतापर्यंत 12 वेळा पत्र लिहिली आहेत. जागा न मिळाल्यास तुरुंगात आंदोलन करावं लागेल, असा इशारा हजारे यांनी दिला आहे.

3. सुनंदा पुष्कर यांची हत्याच?

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली आहे, असं दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त बी. एस. जयस्वाल यांनी त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.

या संदर्भातील वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. लोकसत्तानं टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. 17 जानेवारी 2014ला दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता.

Image copyright AFP

जयस्वाल यांनी त्यांच्या अहवालात शवविच्छेदन अहवालाचा दाखला देत पुष्कर यांच्या शरीरावर दाताने चावल्याच्या, सिरिंजच्या आणि झटापट झाल्याच्या खुणा असल्याचं म्हटलं आहे.

4. शेतकरी मोर्चातून नक्षलवाद डोकवतोय : पूनम महाजन

भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमधून शहरी नक्षलवाद डोकवतोय, अशी टीका केली आहे. या संदर्भातलं वृत्त सकाळनं दिले आहे. अखिल भारतीय किसान सभेनं नाशिक ते मुंबई अशा लाँग मार्चचं आयोजन केलं होतं.

Image copyright Twitter

सोमवारी सरकार सोबत बैठक झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. सोमवारी महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या आंदोलनातून शहरी नक्षलवाद डोकावत आहे, अशी टीका केली, असं या बातमीत म्हटलं आहे.

5. आदित्य नारायण यांना अटक

प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा, गायक आणि अँकर आदित्य नारायण यांना रॅश ड्रायव्हिंग करून रिक्षाला धडक दिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. या अपघातामध्ये रिक्षातली प्रवासी महिला आणि रिक्षा चालक जखमी झाले असल्याचं म्हटलं आहे. अंधेरीतील लोखंडवालाजवळ हा अपघात झाला. आदित्य यांची नंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)