दादा कोंडकेंचे विनोद निष्पाप होते की अश्लील?

  • सिद्धनाथ गानू
  • बीबीसी मराठी
दादांनी कायम भोळ्या-वेंधळ्या माणसाचं पात्र साकारलं.

फोटो स्रोत, EKTA JEEV/ANITAA PADHYE

फोटो कॅप्शन,

दादांनी कायम भोळ्या-वेंधळ्या माणसाचं पात्र साकारलं.

मराठीतले विनोदवीर म्हणून दादा कोंडके ओळखले जातात. त्यांच्या नावावर 9 सिल्व्हर ज्युबिली हिट्स आहेत.

1. दादा आणि वाद

दादा कोंडकेंच्या अनेक चित्रपटांच्या वेळी काही ना काही वाद झाले. दादांचं पडद्यावरचं पदार्पण जरी भालजी पेंढारकरांच्या 'तांबडी माती' या सिनेमातून झालं असलं तरी त्यांचा पहिला मोठा सिनेमा होता 'सोंगाड्या'. दादांनी स्वतःच या सिनेमाची निर्मिती केली होती.

'सोंगाड्या'च्या प्रदर्शनावेळीही वाद झाला. मुंबईतल्या कोहिनूर थिएटरने हा सिनेमा लावायला नकार दिला आणि मग थिएटरबाहेरच निदर्शनं सुरू झाली.

दादांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बाळासाहेब ठाकरेंना मदतीची विनंती केली. मराठी चित्रपटाला जागा देत नाही म्हणून शिवसेनेनेही थिएटर मालकाविरुद्ध दादांची बाजू घेतली.

फोटो स्रोत, EKTA JEEV/ANITAA PADHYE

फोटो कॅप्शन,

पांडू हवालदार सिनेमातली जोडी दादा आणि अशोक सराफ.

याबाबतच्या आठवणी सांगताना शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले म्हणाले, "बाळासाहेबांनी यात स्वतः लक्ष घातलं आणि सगळे शिवसैनिक त्यात सहभागी झाले. हा चित्रपट थिएटरमध्ये लागावा यासाठी मोठं आंदोलन झालं."

"सेनेच्या आंदोलनामुळे अखेर थिएटर मालकाला ऐकावं लागलं आणि 'सोंगाड्या' कोहिनूरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भरपूर चालला. दादांच्या स्टारडममध्ये बाळासाहेबांकडून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मौल्यवान मदतीचा मोठा हात होता," असंही रावले म्हणाले.

दादांची आणि सेन्सॉर बोर्डाचीसुद्धा चित्रपटाला कट्स देण्यावरून खडाजंगी व्हायची. याबाबत बोलताना अनिता पाध्ये म्हणाल्या, "दादा गंमतीने म्हणायचे की सेन्सॉरशी होणाऱ्या भांडणांमुळे माझ्या चित्रपटाला आपोआपच प्रसिद्धी मिळते."

पण याच सेन्सॉर बोर्डच्या सदस्यांबरोबर होणाऱ्या मतभेदांबद्दल दादांना आदरही होता. "यात होणारे वाद-विवाद सकारात्मक असायचे कारण 'सेन्सॉर'चे सदस्य स्वतः तितके अभ्यासू होते," असंही दादांनी म्हटल्याचं अनिता पाध्ये सांगतात.

दादा कोंडकेंच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मालमत्तेसंदर्भात सुरू झालेले वाद आजही कोर्टात सुरू आहेत.

2. नाट्यमयता

दादांची प्रत्येक गोष्ट नाट्यमय होती, असं म्हटलं तरी हरकत नाही. कृष्णाष्टमीला जन्माला आले म्हणून दादांचं नाव कृष्णा ठेवलं गेलं. पण त्यांना सगळे 'दादा'च म्हणत असत. त्यांच्या जन्माची कथाही थोडी गमतीशीरच आहे.

दादांच्या आधी जन्माला आलेली काही भावंडं दगावली होती आणि दादांचीही प्रकृती जन्मतः नाजूक होती. त्यामुळे सगळ्यांना त्यांची काळजी होती.

जन्मानंतर दवाखान्यात असतानाच त्यांचे मामा त्यांना आणि त्यांच्या आईला भेटायला दवाखान्यात आले. मामा आले म्हणून संध्याकाळी घरी लवकर, या असा निरोप दादांच्या वडिलांकडे मिलमध्ये पाठवण्यात आला. पण वडिलांना निरोप मिळाला तो फक्त "घरी लवकर बोलवलंय" एवढाच. हे ऐकून त्यांचा समज झाला की मूल वारलं.

दादांचे वडील आणि चुलते दोघं मिलमधून आले, त्यांच्याबरोबर दोन-अडीचशे कामगारसुद्धा आले. हे पाहून हॉस्पिटलचे कर्मचारी चक्रावले!

दादांच्या वडिलांनी जेव्हा विचारणा केली की "मूल कधी गेलं?" तेव्हा उलगडा झाला की मुलाला काहीही झालेलं नाही.

अनिता पाध्ये लिखित 'एकटा जीव' या पुस्तकात हा प्रसंग विस्तृतपणे देण्यात आला आहे. जन्मापाठोपाठ इतक्या नाट्यमय घडामोडी ज्याच्या आयुष्यात झाल्या तो माणूस पुढे जाऊन नट न होता तरंच नवल!

3. बँड पार्टी ते सिल्व्हर स्क्रीन

दादांचा कलेशी संबंध आला तो एका बँडमार्फत. मुंबईत असताना काही मित्रांसोबत दादा एका बँडमध्ये होते. तरुणपणी दादा काँग्रेस सेवा दलाचंही काम करायचे. इथून त्यांचा नाटकांशी संबंध आला.

फोटो स्रोत, JHARKHAND CONGRESS

फोटो कॅप्शन,

काँग्रेस सेवा दलाचं बोधचिन्ह

दादा पहिल्यांदा खऱ्या अर्थाने रंगभूमीवर आले ते 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकामधून. लेखक वसंत सबनीस यांनी दादांच्या विनंतीवरून 'विच्छा...' लिहिलं आणि ते झपाट्याने लोकप्रिय झालं.

महाराष्ट्र आणि गोव्यात 'विच्छा'चे दीड हजार प्रयोग झाले. प्रेक्षकांना 'विच्छा'ने वेड लावलं. मुंबईत होणाऱ्या प्रयोगांना खुद्द बाळासाहेब ठाकरे, आशा भोसले यांच्यासारखे मान्यवर न चुकता हजेरी लावायचे.

पडद्यावर साध्या माणसाचं पात्र साकारणारे दादा प्रत्यक्षातही तसेच साधे होते, असं लेखिका अनिता पाध्ये सांगतात. "त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही दिखावा नव्हता," असंही त्या सांगतात.

फोटो स्रोत, EKTA JEEV/ANITA PADHYE

फोटो कॅप्शन,

दादा कोंडके

4. राजकारण आणि दादा कोंडके

राजकारणाशी दादांचा पहिला संबंध आला तो काँग्रेस सेवा दलातून. पण दादांची भविष्यात कधी काँग्रेस पक्षाशी जवळीक झाली नाही. उलटपक्षी काँग्रेसवर घणाघाती टीका करत महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रचार करणारे दादा कोंडके अनेकांच्या स्मरणात असतील.

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/Getty Images

फोटो कॅप्शन,

बाळासाहेब ठाकरे आणि दादांची मैत्री सर्वश्रुत आहे.

दादांच्या शिवसेनेशी असलेल्या संबंधांबद्दलची एक आठवण सांगताना शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले म्हणतात, "दादा कोंडके एकदा सेनेच्या एका अधिवेशनासाठी आले होते. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना त्या अधिवेशनासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. कॉम्रेड डांगेंनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केलं. त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या भाषणानंतर दादा बोलायला उभे राहिले. दादांनी केलेल्या भाषणाने शिवसैनिकांना भारावून सोडलं. त्यांनी कॉम्रेड डांगेचं भाषण झाकोळून टाकलं!"

'एकटा जीव' मध्ये बाळासाहेबांचा आणि दादांचा एक विशेष किस्सा आहे. 1995 साली सेना-भाजप युतीचं बहुमत आल्यानंतर मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीसाठी बाळासाहेबांनी दादांना बोलावलं होतं. या बैठकीत बाळासाहेबांनी दादांना विचारलं की "दादा, तुम्हाला कोणती जागा (मंत्रिपद) पाहिजे?" यावर दादांनी बाळासाहेबांना प्रतिप्रश्न केला आणि विचारलं ते कोणती जागा घेणार आहेत.

आपण शिवसेनाप्रमुखच राहणार असं बाळासाहेबांनी सांगितल्यावर "मी शिवसैनिकच राहणं पसंत करेन, कारण त्याचा मान सगळ्यात मोठा!" असं उत्तर दादांनी बैठकीत दिलं आणि उपस्थित नेत्यांनी त्यावर टाळ्यांचा कडकडाट केला.

"1998 साली दादांचं निधन झालं तेव्हा बाळासाहेबांना किती अपार दुःख झालं होतं ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. बाळासाहेब खूप रडले होते," असं मोहन रावले सांगतात.

5. विनोद आणि अश्लीलता

दादा कोंडकेंनी मराठी सिनेमात 'गावरान' विनोदाला स्थान दिलं. तोवर मराठी सिनेमात विनोद नव्हता, असं नाही. पण दादांनी 'चावटपणाचा' मुक्तहस्ते वापर केला. एकीकडे अत्यंत संवेदनशील, भावनापर आणि सामाजिकदृष्ट्या ज्वलंत विषयांवरचे चित्रपट मराठीत येत असताना दादांचा चित्रपट एक वेगळाच प्रवाह आणणारा होता.

फोटो स्रोत, EKTA JEEV/ANITAA PADHYE

फोटो कॅप्शन,

संगीतकार राम लक्ष्मण, आशा भोसले आणि दादा.

दादांच्या या द्वयर्थी विनोदांवर पुढे अश्लील म्हणून अनेकांनी टीका केली. दादांच्या पात्रांचा सततचा चावटपणा आणि टवाळखोरी अश्लीलतेकडे झुकली आहे, असाही अनेकांचा सूर असतो. मग याकडे कसं पाहायचं?

प्रभात चित्र मंडळाचे कार्यवाह संतोष पाठारे म्हणतात, "द्वयर्थी विनोद केले म्हणून दादांना दोष देणं योग्य ठरणार नाही. लोकांच्या वागण्या-बोलण्यात द्वयर्थी विनोद असतोच ना? तोच विनोद दादांनी पडद्यावर आणला. त्यांनी प्रेक्षकांना काय आवडेल, हे बरोबर हेरलं होतं."

"दादांनी नेहमीच साध्या, बावळट माणसाचं पात्र साकारलं. पण त्यांच्या पात्रांमध्ये हा समान धागा असला तरी कथानकानुसार त्याचा विनोद बदलत होता. दरवेळी तो विनोद नवीन होता. 'आली अंगावर' या चित्रपटात दादांनी केलेला विनोद हा सद्यपरिस्थितीवर केलेलं गंभीर भाष्य होतं," असंही पाठारे म्हणतात.

अनिता पाध्ये याबाबत सांगतात की, "ज्या पात्राकरवी दादा हा विनोद करवून घ्यायचे ते पात्र बावळटच असायचं. त्यामुळे हा विनोद निष्पाप वाटायचा."

"मी 'एकटा जीव' साठी सलग 11 महिने दादांना भेटत होते. कधीही विनोदाच्या आडून दादा काही वाईट किंवा असभ्य बोलले, असं झालं नाही. ते एक thorough gentleman होते. त्यांना कुठे थांबायचं हे कळत होतं. म्हणूनच त्यांच्या विनोदाला अश्लील म्हणणं योग्य ठरणार नाही," असं पाध्ये म्हणतात.

दादा कोंडकेंच्या निधनाला 20 वर्षं झाली. त्यांचे काही चित्रपट अजूनही टीव्हीवर दाखवले जातात. काही चित्रपट हक्कांच्या वादात अडकून पडलेत. आयुष्यभर त्यांनी प्रेक्षकांना हसवलं आणि गेल्यानंतरही रसिकांच्या मनात विनोदाचा 'दादा' अशीच त्यांची प्रतिमा कायम ठेवून गेले.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)