दृष्टिकोन : शेतकऱ्यांच्या जखमांपेक्षा शमीच्या घरचं भांडण का महत्त्वाचं?

शेतकरी Image copyright AFP

शेतकरी शब्द शहरी लोकांसाठी तसा परका आहे. सुशिक्षित लोकांच्या तोंडी शेतकरी शब्द किती वेळा येतो?

कदाचित तुम्हाला आठवत असेल, टीव्हीच्या सुरुवातीच्या दिवसांत कृषी दर्शन हा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांची थट्टा केली जायची.

शेती हे मागासलेल्या लोकांचं काम आहे असं या थट्टेमागचं कारण असतं. अशा लोकांना आयुष्यात बुद्धिवादी शहरी लोकांना का रस असावा? भारत एक कृषिप्रधान देश आहे हे शाळेतलं घोकलेलं वाक्य ज्या लोकांचं घर खरंच कृषिप्रधान आहे त्यांच्याबाबत काहीच सांगत नाही ही सगळ्यांत मोठी शोकांतिका आहे.

180 किमी चालत येणाऱ्या शेतकऱ्यांची चर्चा अगदी शेवटच्या दिवशी झाली. याची अनेक कारणं आहेत. पण न्यूजरूममध्ये निर्णय घेणारे ढुढ्ढाचार्यसुद्धा हेच मानतात की, शहरातल्या टीव्ही पाहणाऱ्या लोकांना शेतकरी नाही तर सेलिब्रिटी लोकांना बघायचं आहे.

शमीच्या घरची भांडणं जास्त महत्त्वाची

स्वत:ला बुद्धिवादी समजणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल काय वाटतं हे सगळ्यांना माहीत आहे. दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करतात पण टीव्ही चॅनल किंवा ज्यांना मेनस्ट्रीम मीडिया म्हटलं जातं त्यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही, कारण शेतकरी मेल्यामुळे टीव्ही पाहणारा प्रेक्षक दु:खी होत नाही.

शेतकरी आमच्या जीवनाचा आधार आहे पण तो बरबाद झाला तर आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांना श्वास घेणं कठीण आहे पण प्रसारमाध्यमांनी आमचं मनोरंजन केलं पाहिजे. शहरी मध्यमवर्गाला आपल्या गरजा समजत नाही की आपल्याला मूर्ख बनवलं जात आहे हे त्यांना कळत नाही?

Image copyright Getty Images

शेतकऱ्यांच्या भेगांपेक्षा मोहम्मद शमीच्या कुटुंबाचं दु:ख अचानक कसं महत्त्वाचे झालं? हे समजून घेण्याची गरज आहे.

शेतकरी नपुसंकतेमुळे आत्महत्या करत आहे किंवा शेतकऱ्यांनी मंत्रांचं पठण करून बीज रोवलं तर पीक चांगलं येईल असं सांगत जबाबदार मंत्री निघून जातात. पण यात शहरातल्या प्रसारमाध्यमात जशी प्रतिक्रिया यायला हवी तशी ती येत नाही.

म्हणूनच शहरात राहणाऱ्या तीस टक्के मध्यमवर्गीय लोकांनी स्वत:ला मुख्य प्रवाहातलं मानलं आहे आणि इतर लोकांना काठावर टाकलं आहे. टीव्ही चॅनल जर बारकाईनं बघितलं तर देशाच्या 70 टक्के लोकसंख्येचा संबंध आहे त्या लोकसंख्येचा शेतकरी मोठा भाग आहे.

बातम्याच नाही तर मालिकांमधूनही गायब

मुद्दा फक्त चॅनलच्या बातम्यांचा नाही. आपण सध्या अशी कोणती मालिका बघता ज्यात गाव दाखवलं जातं? बघू नका ती. कारण नाहीतर तुम्हालाच मागासलेलं समजलं जाईल. गावात टीव्हीवर दाखवण्यासारखं काही सुख, दु:ख, नसतं का? सगळ्या मालिकांमध्ये सासू- सुनांची भांडणं दाखवतात. अशी घरं दाखवतात जी 70 टक्के लोकसंख्येच्या गावीही नसतात.

Image copyright Prashant Nanaware

ज्यांचे वडील, आजोबा गावातून शहरात आले होते त्यांची तिसरी पिढी आता शेतकऱ्यांना परकं समजते. परक्यांचं दु:ख त्यांच्यासाठी शीतल असतं. मुंबईला पोहोचलेल्या लोकांचे सोललेलं पाय हे परक्या माणसाचे आहेत, आपल्या लोकांचे तसे पाय असते तर जास्त त्रास झाला असता.

एका शाळेतल्या मुलाची झालेली हत्या दु:खद आहे. दिल्लीत असं झालं तेव्हा सगळा देश हलून गेला. टीव्ही चॅनलवर लाईव्ह अपडेट येत होते. हाच मुलगा समजा खेड्यापाड्यात मेला असता तर कोणाला काही फरक पडला नसता. कारण या मुलाला शहर आणि तिथला मीडिया परकं समजतो.

Image copyright Getty Images

मागच्या 20 वर्षांत शहर आणि गावात राहणाऱ्या लोकांमध्ये दुरावा वाढला आहे. त्याची अनेक कारणं आहेत. पण मोठ्या प्रमाणात हे लोक एकमेकांसाठी परके झाले आहे. त्यात स्वत:ला अपमार्केट समजणाऱ्या शहरी प्रसारमाध्यमांनी मोठी भूमिका निभावली आहे. ते फक्त चांगल्या गोष्टी विकतात. जाहिरातीच्या अर्थव्यवस्थेत हे सगळं तार्किक ठरवू लागले.

आता आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहोत की इथले युवा लोक हॉलिवुडशी रिलेट करू शकतात पण शेतकरी किंवा आदिवासींशी नाही.

कृषीप्रधान देशात जात, राज्य आणि क्षेत्रात विखुरलं जाणं हेसुद्धा अन्नदात्याच्या उपेक्षेचं कारण आहे. त्यांना मतांची तशी चिंता नाही जशी राजस्थानच्या राजपुतांना, हरियाणाच्या जाट लोकांना आणि कर्नाटकच्या लिंगायत लोकांना आहे.

निवडणुकांत शेतकऱ्यांची चर्चा

शेतकऱ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होतं असं नाही. शेतकऱ्यांची चर्चा फक्त राजकारणीच करतात आणि तेसुद्धा ते निवडणुकीच्या आधी. त्यांची कर्ज माफ केली जातात. कारण त्यांचं निवडणूक क्षेत्र ग्रामीण आहे. खेडेगावाची उपेक्षा करण्याचे परिणाम गुजरात निवडणुकीत दिसले. जिथे भाजपला ग्रामीण भागातील जागा गमवाव्या लागतात.

पंतप्रधान आणि कृषीमंत्री शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या गोष्टी करतात. किसान चॅनलवर त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्याची स्वप्नं दाखवली जातात, त्यांच्या समस्यांचा तोडगासुद्धा सांगितला जातो. पण शेतकरी मध्यमवर्गीयांच्या भावभावनांमध्ये आहे तरी कुठे?

Image copyright BBC/Shrirang Swarge

मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्यांमध्ये आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ते जंगलाचा अधिकार मागत आहेत. आदिवासी तर शेतकऱ्यांपेक्षा जास्त परके आहेत. त्यांचं नाव घेताच एखादं लोकगीत गाणाऱ्या लोकांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आदिवासींबद्दल लोकांना जास्त माहिती नाही आणि ते जाणून घ्यायची इच्छासुद्धा नाही.

असं असलं तरी मुंबईच्या सामान्य लोकांनी आंदोलकांना जी मदत केली त्याला तोड नाही. आंदोलकांचा अद्भूत संयम आणि शांतिपूर्ण मार्ग, मुंबईचं जनजीवन कमीत कमी प्रभावित व्हावं या दृष्टीनं त्यांनी केलेले प्रयत्न हेसुद्धा त्याचं महत्त्वाचं कारण आहे.

पाय ठेचकाळल्यावर जशा वेदना शेतकऱ्यांना होतात तशाच त्या आपल्याला होतात. पण या सगळ्या गोष्टी टीव्ही बघून नक्कीच कळणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)