#5मोठ्याबातम्या : मोदींचे 60 टक्के ट्विटर फॉलोअर्स फेक?

नरेंद्र मोदी Image copyright AFP

आजच्या दैनिकांतील आणि विविध वेबसाईटवरील पाच मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. मोदींचे 60 टक्के ट्विटर फॉलोअर्स फेक!

द वीकनं दिलेल्या वृत्तात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 60 टक्के ट्विटर फॉलोअर्स फेक असल्याचं म्हटलं आहे. ट्विप्लोमसी या संस्थेनं जगभरातल्या 5 नेत्यांच्या ट्विटर फॉलोअर्सचा अभ्यास केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली असल्याचं या वृत्तात म्हटले आहे.

या संस्थेनं ट्विटर ऑडिटच्या साहायनं हा अभ्यास केला आहे. जगभरात सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेते आणि त्यांचे बॉट फॉलोअर्स असं ट्वीट या संस्थेनं केलं आहे.

यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे 37 टक्के फॉलोअर्स फेक असल्याचं म्हटलं आहे. तर पोप फ्रान्सिस यांचे 59 टक्के फॉलोअर्स फेक आहेत, असं सांगण्यात आलं आहे.

2. RBI कडून LOUवर बंदी

पंजाब नॅशनल बँकेत 12,700 कोटी रुपयांच्या घोटाळा उघडकीला आल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातल्या सर्व बँकांवर लेटर ऑफ अंडर टेकिंग आणि लेटर ऑफ कंफर्ट देण्यास बंदी घातली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.

भारतीय बँकांकडून देशातील निर्यातदारांना परदेशातल्या बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी ही दोन पत्र दिली जातात. गेल्या महिन्यात नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांनी या पत्रांचा गैरवापर करून घोटाळा केल्याचं उघडकीला आलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं हे पाऊल उचललं आहे.

3. मुख्यमंत्री गुन्हेगार आहेत का? - शिवसेनेची टीका

भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी शेतकरी लाँग मार्चमध्ये शहरी माओवादाची लक्षणं दिसत आहेत, असं वक्तव्य केलं होतं. यावर शिवसेनेनं दैनिक सामनामधून भाजपवर टीका केली आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा पूनम महाजन

मुख्यमंत्र्यांनी मोर्चातल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि मागण्याही मान्य केल्या, म्हणजे माओवादास पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांनी अपराध केला, असं पूनम महाजन यांना म्हणायचे आहे का, असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

4. आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ

सुप्रीम कोर्टानं बँक खातं आणि मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढ दिली आहे. ही बातमी लोकसत्तानं दिली आहे.

31 मार्चपर्यंत बँक खातं आणि मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत होती. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं ही मुदतवाढ दिली आहे. सरकार या विषयात बळजबरी करू शकत नाही, असं मतही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नोंदवलं आहे.

5. सोनिया गांधी यांची डीनर डिप्लोमसी

Image copyright Office of RG/Twitter

2019ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवेळी विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. द फर्स्ट पोस्टनं हे वृत्त दिलं आहे. या भोजनासाठी 20 पक्षांचे नेते उपस्थित होते.

पण आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांतल्या महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांना बोलवण्यात आलं नव्हतं असं या वृत्तात म्हटलं आहे.

दोन्ही राज्यांतून 42 खासदार लोकसभेत जातात, त्यामुळे या दोन राज्यांतून मित्र पक्ष निवडण्यासाठी काँग्रेस अधिक काळजी घेत असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)