'जेव्हा मी स्टीफन हॉकिंगला टेबल टेनिसमध्ये हरवलं होतं...' : डॉ. जयंत नारळीकर

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि डॉ. जयंत नारळीकर Image copyright Getty Images / Marathi Science Council
प्रतिमा मथळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि डॉ. जयंत नारळीकर

स्टीफन हॉकिंग आणि मी एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी होतो. तो माझ्या एक-दोन वर्षं मागे होता. तेव्हा मला आठवतं, स्टीफन अगदी साधासुधा विद्यार्थी होता. त्याच्या बुद्धीची चमक त्यावेळी एवढी जाणवायची नाही. पण नंतर मात्र त्याने त्याच्यामधला खजिनाच बाहेर काढला.

1961 मध्ये इंग्लंडमधल्या रॉयल ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरीने विद्यार्थ्यांसाठी एक विज्ञान परिषद आयोजित केली होती. तेव्हा मी आणि स्टीफन पहिल्यांदा भेटलो. तेव्हा तो ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत होता.

या विज्ञान परिषदेत मला विद्यार्थी असूनही व्याख्यान देण्याची संधी मिळाली. या व्याख्यानात सर्वांत जास्त प्रश्न विचारणारा विद्यार्थी कोण असेल तर तो होता स्टीफन हॉकिंग!

कॉस्मॉलॉजी (विश्वविज्ञान), विश्वाचा विस्तार, बिग बँग थिअरी, याबद्दलच्या अनेक प्रश्नांची सरबत्ती त्याने माझ्यावर केली. त्याला उत्तरं देताना जाणवत होतं की त्याच्याकडे कमालीची जिज्ञासा आहे आणि ती पूर्ण करताना आपणही वेगवेगळ्या संकल्पनांवर विचार करू लागतो.

मला आठवतं, याच विज्ञान परिषदेत आमची टेबल टेनिसची मॅच रंगली होती आणि मी त्याला टेबल टेनिसमध्ये हरवलं होतं.

ब्लॅक होलचं संशोधन

स्टीफनला त्यावेळी 'मोटर न्यूरॉन' हा दुर्धर आजार जडलेला नव्हता. त्यामुळे त्याला प्रश्न विचारण्यापासून कुणीही रोखू शकत नव्हतं. हा आजार त्याला जन्मापासून जडलेला नव्हता. या आजाराचं निदान तो 21 वर्षांचा असताना झालं. पण नंतर त्याने त्यावर कशी मात केली, हे सगळ्यांना माहीत आहे.

Image copyright Rex Features

या परिषदेनंतर एक वर्षानंतर स्टीफन केंब्रिज विद्यापीठात PhD साठी दाखल झाला आणि मला त्याच्याकडे काय दडलं आहे, याची जाणीव झाली. याआधी तो प्रश्न विचारायचा पण त्याची उत्तरं त्याच्याकडे तरी आहेत का, असा प्रश्न मला पडायचा.

'प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग युनिव्हर्स' या त्याच्या PhDच्या प्रबंधात मात्र त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली.

स्टीफन हॉकिंगने 30 वर्षं केंब्रिजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. त्याने 'ब्लॅक होल्स' (कृष्णविवरं) बाबत केलेलं संशोधन हे त्याचं सगळ्यांत महत्त्वाचं योगदान आहे.

त्याने कृष्णविवरांचे नियमही मांडले. ब्लॅक होलमध्ये सगळं शोषून घेतलं जातं, असं आधी आपण मानायचो. पण या ब्लॅक होलमधून किरणोत्सर्ग होतो, याचा स्टीफन हॉकिंगने शोध लावला. विश्वाची रहस्यं उलगडण्याच्या संशोधनाला यामुळे एक वेगळीच दिशा मिळाली.

'देव अस्तित्वात नाही'

केंब्रिजमध्ये असताना आमची वैज्ञानिक सिद्धांतांवर चर्चा व्हायची. यात देवाणघेवाण जास्त असायची. आमच्यात कधीही एखाद्या मुद्द्यावरून वाद झालेले मला आठवत नाहीत.

"देव अस्तित्वात नाही आणि देवाने हे विश्व निर्माण केलेलं नाही," हे स्टीफन हॉकिंगचं विधान खूपच गाजलं. "या विश्वाच्या पलीकडे दुसरं विश्व असू शकतं," असंही त्यानं म्हटलं होतं.

खरंतर अशी अनेक वक्तव्यं त्यानं केली आहेत.

Image copyright NASA
प्रतिमा मथळा स्टीफन हॉकिंग नासाच्या झिरो ग्रॅव्हिटी स्टेशनमध्ये.

मला असं वाटतं की याकडे एक अंदाज किंवा भाकित म्हणूनच पाहिलं पाहिजे. कारण या विधानांना दुजोरा देणारे पुरावे त्याच्याकडे नव्हते, आपल्याकडेही नाहीत. पण स्टीफनची जिज्ञासा, कुतूहल, त्याच्या मनातले असंख्य प्रश्न याला दाद द्यायला हवी.

स्टीफन नंतरच्या काळात त्याच्या आजारामुळे व्याख्यानं देऊ शकत नव्हता. पण वेगवेगळ्या माध्यमांमधून तो जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचला. त्याच्या मनातल्या विचारांचा आलेख काढून मांडणारं त्याचं संवादाचं ते यंत्रही सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलं. यामुळे आपल्याला त्याचे मोलाचे विचार कळू शकले.

आज स्टीफन गेल्यानंतर पुन्हा आपण त्याच्या संशोधनाची, विज्ञानवादाची चर्चा करतो आहोत. हा विज्ञानवादी दृष्टिकोन आणखी वाढवण्याची गरज आहे. गेल्या 15-20 वर्षांत याचा चांगल्या रीतीने प्रसार झाला आहे, याबद्दल मात्र आनंद वाटतो.

स्टीफन हॉकिंग या माझ्या प्रश्न विचारणाऱ्या सहकाऱ्याला ही माझी भावपूर्ण श्रद्धांजली...

(स्टीफन हॉकिंग यांच्या निधनानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी बीबीसी मराठीच्या आरती कुलकर्णी यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित.)

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)