आदिवासी मधूच्या आई म्हणते 'तो भुकेला होता पण अन्न चोरण्याचा त्याचा स्वभाव नव्हता'!

आदिवासी
प्रतिमा मथळा मधूची आई आता त्याच्या आठवणीत जगतेय

केरळच्या जंगलात एका गुहेत मधू राहायचा. त्याने घरच्यांना, त्याच्या आईला सांगितलं होतं, "माझी काळजी करू नका. मी प्राण्यांबरोबर इथे सुरक्षित आहे. ते माझ्यावर हल्ला करत नाही." पण तीन आठवड्यापूर्वी काही लोकांनी या आदिवासीची हत्या केली.

का? मधूने तांदूळ चोरले आहेत, असा त्यांचा आरोप होता. त्यां लोकांनी त्याच्याबरोबर सेल्फी घेतले. त्याला एका झाडाला बांधलं आणि त्याचा छळ केला. 23 फेब्रुवारीला जेव्हा जेव्हा ही घटना घडली, तेव्हाही प्राण्यांबरोबर जंगलात राहणाऱ्या मधुला हे कधी वाटलं नसावं की माणसांकडूनच आपण मारले जाऊ.

मधूची आई मल्ली 56 वर्षांची आहे. जेव्हा मायलेकाचा सुरक्षेबद्दलचा संवाद आठवतो तेव्हा ती हमसूनहमसून रडू लागते. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कच्या आत तिचं घर आहे. घरापासून काही अंतरावरच तिचा मुलगा एका गुहेत राहतो, ही कल्पनाच तिला कधी रुचली नव्हती.

'अन्न चोरण्याचा स्वभाव नव्हता'

"तो जंगलात सुरक्षित आहे, यावर माझा विश्वास नव्हताच. पण त्याला चोर म्हटलं आणि त्यासाठी त्याला मारण्यात आलं, हे सगळ्यांत वाईट आहे," असं मल्ली यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.

"मधू चोर नव्हता. काहीतरी चोरण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. दुसऱ्यांच्या अन्नाला आम्ही कधीच परवानगीशिवाय हात लावत नाही. त्याला खायला हवं असेल तेव्हा तो स्वतः मागायचा. हा त्याचा स्वभाव होता," असं सांगताना मल्ली आपलं तोंड टॉवेलमध्ये लपवून आपले ओघळणारे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते.

त्या दिवशी मधू अन्नाची एक पिशवी घेऊन जात होता तेव्हा त्याला एका जमावानं थांबवलं. त्यांनी ती पिशवी तपासली आणि त्यांना खाण्याची काही पाकिटं दिसली. ती पाकिटं कुठून आणली असं विचारलं आणि त्याला बेदम मारायला सुरुवात केली. शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं.

त्याला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या जीपमध्ये त्यानं जीव सोडला.

प्रतिमा मथळा मधूचं कुटुंब

मल्लीच्या घरी जातानाच जंगलातील आदिवासींची काय परिस्थिती आहे, हे लक्षात यायला सुरुवात झाली. पल्लाकड जिल्ह्यात मन्नारक्कड ते मुक्काली हे अंतर कापल्यानंतर कार सोडून द्यावी लागते आणि शटल जीपचा आधार घ्यावा लागतो.

आदिवासी रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी हे 4 ते 6 किमी अंतर कापावं लागतं. त्यासाठी या खडकाळ परिसरात जाण्यासाठी शटल सेवेचा उपयोग करावा लागतो. तिथे रस्ता नावाची गोष्टच नाही. हॉस्पिटलच्या 100 मीटर आधी एक पायवाट आहे. तिथून जंगलात एक वाट जाते. तिथून कोणीही मधूच्या घरी घेऊन जातं.

प्रतिमा मथळा आदिवासी

चिंदकीपळयूर मध्ये मधूच्या आजोबांचं घर आहे. तिथेच मल्ली तीन दशकांपूर्वी लग्न करून आल्या होत्या. पण त्यांच्या पतीच्या अचानक निधनानंतर मुलांना वाढवण्यासाठी त्या माहेरी आल्या. त्यांच्या मुली सारसू (29) आणि चंद्रिका (28) या शेजारच्या वायनाड मधील एका आदिवासी शाळेत 12वीपर्यंत शिकल्या.

मग मधू करायचा काय?

मधू या भावंडांमध्ये सगळ्यांत मोठा होता. तो कोकमपलयमच्या शासकीय शाळेत सहावीपर्यंत शिकला. नंतर त्याने जंगलात मध गोळा करायला आणि काही वनौषधी विकायला सुरुवात केली. ही औषधं त्याने चिंदाक्की येथील कुरुंबा शेड्युल्ड ट्राईब सर्व्हिस को ऑपरेटिव्ह सोसायटीला विकली.

मल्लीला नंतर एका अंगणवाडी केंद्रात एक मदतनीस म्हणून काम करण्याचे 196 रुपये मिळायचे. मुली मोठ्या झाल्यावर त्या चिंदाकीपळयूर इथे आपल्या पतीच्या घरी गेल्या.

मधू 16 वर्षांचा असताना विचित्र वागायला लागला. तो कधी शांत राहायचा तर कधी अचानक हिंसक व्हायचा. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला कोळिकोडेला मनोरुग्णालयात नेले. "त्यांनी मधूला औषधं दिली. काही काळ त्याने ती घेतली नंतर त्याने ती घ्यायला नकार दिला," असं मल्ली सांगत होत्या.

प्रतिमा मथळा मधूची कबर

मधूच्या आई सांगतात, "काही काळानंतर मधू गुहेत जाऊ लागला आणि तिथेच राहू लागला. एकदा तो बेपत्ता झाला. आम्ही पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यांना तो गुहेत दिसला पण त्याने घरी यायला नकार दिला."

पण त्या पुढे म्हणाल्या, "मी त्याला दोन वेळचं अन्न देऊ शकायची." जेव्हा मधू गुहेत रहायचा तेव्हासुद्धा त्याला पुरेसं अन्न मिळेल याची ती काळजी घ्यायची.

त्यांची कमाई आता 6000 पर्यंत पोहोचली होती. तिचे जावईसुद्धा संसाराचा गाडा चालवण्यास मदत करायचे.

मधूचा बळी नेमका गेला कसा?

Image copyright FACEBOOK VIDEO GRAB
प्रतिमा मथळा मधू

मग मधूचा बळी भुकेमुळे गेला? की एका मानसिक रुग्णाबाबत समाजाच्ये अनास्थेने त्याचा जीव घेतला? त्याच्या आईच्या कथनानुसार तर दुसरं कारण यास अधिक जबाबदार असल्याचं स्पष्ट होतं.

"तो एकटा राहत होता म्हणून तो भुकेला होता. कोणालाही त्रास देण्याचा त्याचा स्वभाव नव्हता," असं जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभू दास म्हणाले.

"आदिवासी संस्कृतीत अन्नाबदद्लच्या धारणा, त्याबद्दलची श्रद्धा वेगळी असते. अन्न कुणा एकाचंच असतं, असं ते मानत नाही. हे लोक तुम्हाला कितीही दिवस खाऊ घालू शकतात. त्यामुळे ते अन्न घेणं म्हणजे चोरी आहे, असं त्याला वाटलं नसावं," असं राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रकल्प संचालक सीमा भास्कर सांगत होत्या.

मधू त्या परिसरातला एकटाच मनोरुग्ण नाही. "जिल्हा आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सध्या 350 व्यक्तींची नोंदणी केली आहे. फक्त 50 व्यक्ती नियमित उपचारासाठी येतात," असं दास सांगतात

पण एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आणखी एक प्रश्न उपस्थित केला.

"एक गोष्ट स्पष्ट आहे की हे प्रकरण भुकेशी निगडीत नाही. हे मानसिक आरोग्याबद्दल असू शकतं. त्याने काही गैर किंवा बेकायदेशीर गोष्टी होताना पाहिल्या असतील असंही होऊ शकतं. मधू ज्या गुहेत रहायचा तिथे सहजासहजी जाणं शक्य नव्हतं. वनाधिकाऱ्यांनासुद्धा तिथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मग इतके सारे लोक तिथे त्याला मारायला गेलेच कसे?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)