पैशाची गोष्ट : शॉपिंग करताना फसगत झाली तर हे नक्की करा

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : शॉपिंगचा आनंद लूटा. पण, त्याचवेळी ग्राहक म्हणून राहा सावध

रश्मीला विमानाचं तिकीट बुक करायचं होतं. लांबच्या प्रवासाचं म्हणून लाखो रुपये किमतीचं तिकीट तिने ऑनलाईन खरेदी केलं. बँक अकाऊंटमध्ये पैसेही वळते झाले. पण, काही तास वाट बघूनही तिकीटाचा मेसेज आलाच नाही.

असा अनुभव आपल्यापैकी काहींना आला असेल. ऑनलाईन खरेदी करताना पैसे तर दिले गेले पण सेवा किंवा वस्तू मिळालीच नाही, असं झालं तर काय करायचं हे समजत नाही.

रश्मीच्या बॅंकेच्या खात्यातून पैसे तर वळते झाले होते पण दिवसभर वाट पाहूनही तिला तिकीच बुकिंगचा कोणताच संदेश आला नव्हता. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या कंपनीकडे फोन केला तर जबाबदारीने उत्तर मिळत नव्हतं. अजूनही रश्मीत्याविरुद्ध दाद मागतच आहे.

हे एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. पण, ऑनलाईन खरेदीच नाही तर दुकानात जाऊन केलेली खरेदी करतानाही आपल्याला फसवणुकीचा अनुभव येऊ शकतो.

कुठे मागाल दाद?

फक्त पैशाचीच नाही तर वस्तूचा दर्जा, प्रत आणि किंमत यातही फसवणूक होऊ शकते. अशावेळी एकतर ग्राहकाने सावध राहण्याची गरज आहे. त्यातूनही जर फसवणूक झालीच तर ग्राहक म्हणून आपले हक्क बजावण्याची आवश्यकता असते.

ग्राहक हक्कांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विश्वास उटगी गेले कित्येक वर्षं काम करत आहेत. दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांकडून फसवणूक झाली तर काय करायचं हे त्यांनी अगदी सविस्तरपणे सांगितलं.

Image copyright Thinkstock

पहिली पायरी असते ती लेखी तक्रारीची. लेखी तक्रारीला कंपनीकडून आठवड्याभरात उत्तर आलं नाही तर आपल्याला ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे, असं ते सांगतात.

ग्राहक संरक्षण कायदा

"ग्राहक संरक्षण कायदा-2005 नुसार ग्राहक न्यायालयात त्याची सुनावणी होते. अर्थात तक्रारीबरोबरच आपल्याला पुरावेही सादर करावे लागतात," असं ते म्हणाले.

लेखी तक्रारीशिवाय मात्र पुढे दाद मागता येत नाही. शिवाय तक्रारीचा कुठलाही फॉर्म नाही. तुम्ही तुमच्या शब्दात आपलं गाऱ्हाणं मांडू शकता, असं ते म्हणाले.

वर दिलेलं उदाहरण ऑनलाईन व्यवहारांचं आहे. त्यात रश्मीनं बुकिंग केलं होतं ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीकडे आणि तिकीट होतं विमान कंपनीचं. अशावेळी काय करायचं, असा प्रश्न पडतो. अशीच काहीशी अवस्था ऑनलाईन शॉपिंग करतानाही असते.

"तुमचा पहिला संपर्क ज्या कंपनीशी येतो तिथं दाद मागायची. ईमेल किंवा लेखी उत्तर सात दिवसात मिळालं नाही तर मग कोर्टाची पायरी चढायची," उटगी यांनी सांगितलं.

पण जर ऑनलाईन शॉपिंग केलं असेल आणि साईट दुसऱ्या देशातली असेल तर मात्र त्या देशाचे नियम लागू होतात.

दाद मागण्याचा आपला हक्क आहेच. पण, त्याशिवाय आपली फसवणूक होऊ नये यासाठी काही काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणूनच उटगी यांच्या मते सरसकट सगळ्या वस्तू ऑनलाईन घेऊ नयेत.

Image copyright Getty Images

आणि विश्वसनीय साईटवरच हे व्यवहार करावे. दुकानातही वस्तू आणि मूल्य पारखून खरेदी करावी.

ग्राहक म्हणून काय घ्याल खबरदारी

सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे जाहिरातींना फसू नका आणि अशा जाहिराती करणं हा गुन्हा आहे तेव्हा जाहिरातदारांची तक्रार आवर्जून करा असं ते सांगतात.

फसवणूक टाळण्यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत.

  1. ग्राहक म्हणून आपले हक्क समजून घ्या. उदाहरणात हॉटेलमध्ये पिण्याचं पाणी मोफत मिळणं, टॉयलेटचा वापर करता येणं हा हक्क आहे.
  2. वस्तू खरेदी करताना किंमत, एक्सपायरी डेट आणि करही तपासून घ्या.
  3. वस्तूची गुणवत्ता तपासून घ्या.
  4. शक्यतो अॅगमार्क, हॉलमार्क, ISI, एगमार्क असं गुणात्मक चिन्ह असलेल्या वस्तू खरेदी करा.
  5. ऑनलाईन शॉपिंग करताना बनावट साईटपासून सावध राहा.
  6. बँकेतून परस्पर पैसे वळते होणार असतील तर बँकेच्या पासबुक किंवा ऑनलाईन स्टेटमेंटमधून व्यवहाराची खात्री करून घ्या.
  7. डेबिट कार्ड ऐवजी शक्यतो क्रेडिट कार्ड वापरा. कारण बँक क्रेडिट कार्डवर तुम्हाला जास्त गॅरंटी देते.
  8. महत्त्वाचं म्हणजे ग्राहक संरक्षणासाठी कायदे अस्तित्वात आहेत आणि ग्राहक मंचाकडे तुम्ही तक्रार करू शकता. तसंच हेल्पलाईनवरही दाद मागू शकता.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)