गुढीपाडवा : कौटुंबिक आनंद सोहळ्याकडून सामाजिक शक्तिप्रदर्शनाकडे?

गुढी पाडवा शोभायात्रा Image copyright Getty Images

कोणताही सण आला की, त्या सणाच्या बदलत्या रुपाची चर्चा होते. सणांचे संदर्भही बदलेले असतात, कधी कधी ते नव्या रूपातही समोर येतात. गुढीपाडव्याची मांडणीही अशी नव्यानं करण्यात आली त्याला आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रांनी गुढीपाडवा या कौटुंबिक आनंद सोहळ्याला सामाजिक शक्तिप्रदर्शनाचं रूप दिलं जात आहे का?

समूहशक्तीच्या मार्गानं सकारात्मकता निर्माण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आल्या, असं शोभायात्रांच्या आयोजकांचं म्हणणं आहे. डोंबिवली, गिरगाव, ठाणे, विलेपार्ले असा प्रवास करत त्या पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा मार्गानं आता राज्यभरात पोहोचत आहेत. पण या शोभायात्रांचे राजकीय पडसादही उमटू लागले असल्याचा मतप्रवाह आहे.

"आपले राजकीय पक्ष लोकशाहीच्या गप्पा मारतात पण त्यांचं वर्तन हुकूमशहाचं असतं. पक्षाच्या माणसांना बळजबरीने संसदेत, विधानसभेत जावं लागतं. जनतेच्या भावनांचा राजकीय कारणासाठी उपयोग करून घेतला जातो, हे सांस्कृतिक राजकारण आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या गोष्टी सांस्कृतिक गुन्हेगारी आहेत," असं मत शाहीर संभाजी भगत यांनी या संदर्भात व्यक्त केलं.

तोच मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणतात, "सर्वच सणांचं राजकारण आणि बाजारीकरण झालं आहे. भावनांना साद घातली की माणूस कह्यात येतो हे राजकारणी आणि बाजारू व्यवस्थेला चोख समजलं आहे. म्हणूनच आसवं किंवा मृत्यूसारख्या गंभीर गोष्टीचंही मार्केटिंग होतं."

"भांडवलदारांना आपली वस्तू, सेवा विकायची असते. व्हॅलेंटाइन डे याचं उत्तम उदाहरण. दिवाळी हा दिव्यांचा क्षण. पण आता ते कधीच मागे पडलं आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचाही सण मार्केट झाला आहे. याचं कारण आपली लोकशाही लादलेली आहे. स्वातंत्र्यासाठी संघर्ष केल्यानंतर आपण लोकशाही स्वीकारली. पण त्याबरोबर येणारी मूल्यं, त्याचं शास्त्र आपण दूर ठेवलं आहे," अशी मांडणी भगत यांनी केली आहे.

"भारतीय समाज गुलाम आहे. मध्येच एखादा दिवस अस्मिता जागवली जाते. 364 दिवस जीन्स परिधान करणारी तरुणाई एक दिवस धोतर-नऊवारी नेसतात. फेटे घालतात. आपला समाज दांभिक आहे. एरवी ग्लोबल आणि एक दिवस लोकल अशी 'स्प्लिट पर्सनॅलिटी' असते. 31 डिसेंबरला दारू पिऊन धिंगाणा घातला जातो आणि गुढीपाडव्याला पुरणपोळी खातात. ऋषीमुनी, गुरुकुल, शोभायात्रा याठिकाणीच समाज गोठला आहे. राजकीय पक्षांनी सोयीस्करपणे सण वाटून घेतले आहेत,"असं भगत यांनी स्पष्ट केलं.

Image copyright Getty Images

ठाण्यातील शोभायात्रेचे सहनियंत्रक विद्याधर वालावलकर यांनी शोभायात्रांमागची भूमिका विषद केली. ते म्हणतात, "शोभायात्रा या समाजातील लोकांच्या महत्त्वाकांक्षेचा आविष्कार आहेत."

'ऐतिहासिक वैभवाशी नातं जोण्याचा प्रयत्न'

लोकांच्या आनंदाच्या संकल्पना बदलत असतात. आता मोबाईल आनंदाचं निधान आहे. सणांचं पूर्वीचं स्वरुप आताच्या तरुण पिढीसाठी आनंददायी आहे का? परदेशी गायकाच्या कॉन्सर्टला बेस असतो. भीमसेन जोशींची मैफल वसंतोस्तव, गणेशोत्सव अशा निमित्तानं होत असे. आपल्या सणांची रचना मार्केटआधारित आहे. सणांभोवती अर्थकारण उभं राहिलं आहे. अर्थकारणाला पुरुन टिकण्यासाठी अभिनव पद्धती शोधायला हव्यात. समाजात ज्यांना बदल घडवायचा आहे त्यांच्यासाठी उत्सव आहे, शोभायात्रा आहे."

Image copyright Getty Images

"पूर्वी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जायचे, प्रचंड आवाजात ढोलवादन व्हायचं. आता दोन्हीचं प्रमाण कमी झालं आहे. विदेशात गेल्यानंतरही आपण त्यांचे किल्ले पाहतो, संग्रहालयं पाहतो. थोडक्यात त्यांचा इतिहास जाणतो. संस्कृती समजून घेतो. सणांच्या निमित्तानं आपल्या ऐतिहासिक वैभवाशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला तर बिघडलं कुठे?," असा सवालही वालावलकर करतात.

'शोभायात्रेत राजकारण नाही'

"आपल्या सणांना देवाचं अधिष्ठान आहे. सणांच्या माध्यमातून देवाशी संवाद साधला जातो. सणांचा वापर राजकीय व्यासपीठासाठी होतो, असा आरोप होतो. आमच्या शोभायात्रेत राजकारणी नाहीत. सपोर्ट सिस्टम म्हणून राजकारणी असू शकतात. तेही समाजाचा भाग आहेत. त्यांना अव्हेरणं जसं अयोग्य तसं डोक्यावर घेणंही चुकीचं आहे. लोक राजकारण्यांसाठी येत नाहीत. नागरिकांच्या सादरणीकरणाचा भाव महत्त्वाचा. मोजमापाची पट्टी लावणं चुकीचं आहे," असं वालावलकर यांनी स्पष्ट केलं.

सणांचं राजकारण

नाटककार शफाअत खान यांनी सणांच्या राजकीयीकरणाबद्दल नापसंती व्यक्त केली. ते म्हणतात, "शोभायात्रा, मिरवणुका, उत्सव, इव्हेंट किंवा तत्सम ठिकाणं जिथे गर्दी होण्याची शक्यता असते, ते सगळं राजकारण्यांनी पळवलं आहे. धर्माची, जातीची अशी एक ओळख ठसठशीतपणे सादर करण्याचं काम राजकारणी करतात. संख्याबळाच्या जोरावर समाजातल्या अन्य माणसांना घाबरवणं हा उद्देश दिसतो. आतून आनंद होत नाही. म्हणून मग श्रेष्ठता आनंदाच्या माध्यमातून बिंबवली जाते."

त्यांच्या मते, "व्हॅलेंटाइन डे प्रेमाचं प्रतीक असल्याचं मार्केटनं ठरवलं. मुलं-मुली तो सण साजरा करू लागले. राजकारणी आणि मार्केटला यामागचं मर्म उमगलं आहे. कुठल्याही धर्म-जाती-पंथ पल्याड जाऊन एकत्र येता येईल असे सण आपण शोधायला हवेत. आनंदाचं बाहेरून रोपण केलं जातं. उन्मादी आक्रमकपणा ही आपल्या सणांची ओळख झाली आहे."

'शोभायात्रेला राजकीय किनार नको'

वास्तविक, "हिंदूंनी मुसलमानांचे सण साजरे करू नयेत किंवा मुस्लिमांनी हिंदूंचे सण साजरे करू नयेत असं आपसूकच ठरवण्यात येतं. प्रत्यक्षात तसं काहीच नसतं. समाज नावाच्या प्रतलात आपण विविध घटकांसह एकत्रितपणे वावरत असतो. आनंद एकत्रितपणे साजरा करणं हेच सणांचं वैशिष्ट्य आहे. पण आपण सणांना संकुचित, सीमित केलं आहे. शोभायात्रा निघायला हरकत नाही, पण त्याला असणारी राजकीय किनार दूर व्हायला हवी," असं शफाअत खान म्हणतात.

Image copyright Getty Images

"माणसं घराच्या बाहेर पडणं बंद झालं आहे. चावडी, कट्टे, नाके आता नावापुरते असतात. राजकारण्यांनी मग व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून आपलं म्हणणं पोहोचवायला सुरुवात केली आहे. असा मजकूर देण्यासाठी पगारी माणसं नेमली जातात. इंटरनेटवर आभासी गर्दी असते. विचार थोपवले जातात. सत्यापासून जितकं दूर जावं तितकं ते ठसवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात," असंही खान म्हणाले.

"झगमगाट, चमकोगिरी गरजेची ठरते. बुलेटवर बसून नऊवारी नेसून, नथ लेवणं ही आधुनिक आक्रमक प्रतीकं आहेत. यात निखळपणा नाही. एकीकडे आधुनिक व्हायचंय आणि दुसरीकडे परंपरा खुणावतेय अशा कात्रीत तरुण मंडळी सापडून गोंधळली आहेत. असं करण्यामागे कोणाचा तरी अजेंडा आहे हे सामान्य माणसाला लक्षात येत नाही," अशा शब्दांत खान यांनी ही कोंडी विशद केली आहे.

खान यांच्या मते, "पाश्चिमात्य देशांमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यावर इंटरनेट, सोशल मीडियाचं आगमन झालं. त्यामुळे बदल सुसंगत झाला. पण आपण आधुनिकीकरणाकडे जात असतानाच इंटरनेट अवतरलं. आपण बदलासाठी तयार नव्हतो. चुकीच्या वेळी ही साधनं हाती आली. यामुळे अत्याधुनिक मोबाइल हातात असतो पण रिंगटोन भजनं, स्तोत्रं अशीच असतात. बदलाला आवश्यक एकजिनसीपणा होतच नाही आणि गोंधळ उडतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)