काँग्रेस - भाजपनं एकमेकांवर सोडलेले 5 बाण

राहुल गांधी Image copyright Twiitte@INCINDIA

काँग्रेसचं 84 वं महाअधिवेशन दिल्लीत सुरू आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात मोदी सरकारवर टीका केली.

भाजप - काँग्रेसची लढाई ही कौरव पांडवांच्या लढाईसारखी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. भाजपच्या सत्तेसाठीच्या युद्धाला काँग्रेस सत्याच्या लढाईनं उत्तर देईल, असं ते म्हणाले.

त्यावर उत्तर देताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी जनतेला कोण कौरव आणि कोण पांडव याची पुरेशी जाण असल्याचं सांगितलं.

या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर केलेल्या आरोपांपैकी महत्त्वाचे 5 मुद्दे :

राहुल यांनी इंग्रजी आणि हिंदीत केलेल्या या भाषणातले प्रमुख मुद्दे -

  • हजारो वर्षांपूर्वी इथे कुरुक्षेत्रावर युद्ध झालं होतं. कौरव ताकदवान होते पण अहंकारी होते. तर पांडव नम्र होते. कौरवांप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सत्तेसाठी लढण्याचं आहे. पांडवांप्रमाणे काँग्रेस सत्यासाठी लढत आहे.
  • पंतप्रधान आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी एकामागोमाग एक इव्हेंट्स करत आहेत. जेव्हा पंतप्रधानांनी बोललं पाहिजे असं वाटतं, तेव्हा ते गप्प बसतात. आम्हाला मात्र आता सत्य बोलण्यावाचून कुणी रोखू शकणार नाही.
Image copyright Twitter/INCINDIA
  • आज भ्रष्ट पण ताकदवान लोक देश चालवत आहेत. भारत आता या मिथ्यातच जगत राहणार की सत्याचा सामना करण्याचं धैर्य दाखवणार?
  • भाजप म्हणतं अर्थव्यवस्था तेजीत आहे. पण देशातल्या तरुणांना विचारा, त्यांच्याकडे रोजगार नाही. काँग्रेस पूर्ण देशात फूड पार्कचं नेटवर्क उभं करेल. पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं काँग्रेसनं. आता छोट्या आणि मध्यम आकाराच्या जमिनींच्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा काँग्रेस मदतीसाठी उभं राहील.
  • लोक भाजप अध्यक्ष म्हणून अशा व्यक्तीला स्वीकारत आहेत जिच्यावर खुनाचा आरोप आहे.

भाजपच्या नेत्या आणि देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल यांच्या भाषणानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजपतर्फे या शरसंधानाला प्रत्युत्तर दिलं.

निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतले हे प्रमुख मु्द्दे :

  • मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. पण सरकार शुद्ध आहे. साफ आहे. पंतप्रधान गेली चार वर्ष पद सांभाळत आहेत. त्याअगोदर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून अनेक वर्षं पदावर होते. पण या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही.
Image copyright Getty Images
  • राहुल यांनी न्यायव्यवस्थेलाही सोडलं नाही. या व्यवस्थेचीही खिल्ली उडवली.
  • अमित शहा यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. जे आरोप त्यांच्यावर केले गेले ते काँग्रेसने केले होते. अमित शहांना खुनाच्या आरोपातले दोषी म्हणताना राहुल कोर्टाचा आदेश धुडकावून लावत आहेत. हा कोर्टाचा अवमान नाही का?
  • काँग्रेसची विचारधारा काय आहे? देशाचे तुकडे होतील, अशा घोषणा करणाऱ्या फुटीरवाद्यांबरोबर राहुल गांधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात उभे राहिले.
  • आणीबाणी आणि शिखांचं शिरकाण याला काँग्रेस जबाबदार होतं. आता माध्यमस्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना सांगायला हवं की याची आवश्यकता नाही. कारण आता माध्यमं स्वतंत्रच आहेत. 1988 मध्ये राहुल यांच्या वडिलांनीच प्रेस डिफमेशन बिल आणलं होतं. आता त्याच राजीव गांधींचे पुत्र आणि आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींचे नातू माध्यम स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)