पेरुमल मुरुगन : मेलेला लेखक जिवंत होतोय, पुन्हा लिहितोय

पेरुमल मुरुगन

प्रसिद्ध तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी 2015ला त्यांच्यातील लेखक मेला आहे असं जाहीर केलं होतं. उजव्या विचारसरणीच्या गटांकडून त्रास झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण या स्वयंघोषित मौनातून ते बाहेर पडत आहेत एका शेळीच्या कथेतून. समाजातील दुर्बलांवर होणारे अत्याचार आणि त्यांचं जगणं ते या कादंबरीतून मांडत आहेत. सुधा जी. टिळक यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नवी कादंबरी, त्यांची भूमिका, लेखक म्हणून त्यांनी बाळगलेलं मौन हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

प्रसिद्ध तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी आपण यापुढं कधीही लिहणार नाही असं जाहीर केलं होतं. माझ्यातल्या लेखकाचा मृत्यू झाला आहे. लेखक पेरुमल मुरुगन आता मेला आहे. आता फक्त शिक्षक पेरुमल मुरुगन ( पी. मुरुगन) जिवंत राहील. असं म्हणत त्यांनी लिखाण सोडून दिलं होतं.

2015मध्ये त्यांना उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं त्यांनी आपण यापुढं कधीही लिहणार नाही असं म्हटलं होतं पण या घटनेच्या दोन वर्षानंतर आता ते एक नवीन कादंबरी घेऊन येत आहे.

त्यांच्या नव्या कादंबरीचं नाव आहे, 'पुनाची' किंवा काळी शेळी. मानवी जगातली असमानता आणि हिंसेची पुनाची एक मूक साक्षीदार बनते. एका काल्पनिक गावात एका वयस्कर दाम्पत्याला ही शेळी मिळते आणि ती त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टी पाहत असते असं या कादंबरीचं कथानक आहे.

'वन पार्ट वूमन' ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्याविरोधात खूप निदर्शनं झाली होती. ही कादंबरी त्यांच्या गावावर झालेल्या घटनांवर आधारित होती असं त्यांचं म्हणणं आहे. या कथेला ऐतिहासिक संदर्भ आहे असं त्यांचं म्हणणं होतं. या गोष्टी पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात. त्याच कथांच्या आधारावर ही कादंबरी लिहण्यात आली होती असं मुरुगन यांनी सांगितलं होतं.

Image copyright Penguin

त्यांच्या या कादंबरीवरून वाद निर्माण झाला होता. मुरुगन यांच्या कादंबरीमुळे महिलांची, गावाची आणि धर्माची नाचक्की झाली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. लोकांच्या दबावामुळे त्यांना नोकरी सोडून अज्ञातवासात जावं लागलं होतं. त्यांची पुस्तकं जाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आपण यापुढं कधीही लिखाण करणार नाही असं म्हटलं होतं.

अनेक जणांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. जुलै 2016मध्ये न्यायालयाने त्यांच्या विरोधात असलेल्या सर्व याचिकांना निकाली काढलं आणि त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती.

मी ज्यावेळी अज्ञातवासात होतो तेव्हाचा काळ माझ्यासाठी फारच खडतर होता. तसेच माझ्या मुलांना या काळात खूप कष्ट भोगावे लागले. माझी पत्नी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे मी तग धरून राहू शकलो असं मुरुगन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं.

ज्या वेळी मी अज्ञातवासात होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की लिखाण हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. लिखाण माझ्या अंगात मुरलं आहे असं मला वाटत असे. या काळात त्यांनी 200हून अधिक कविता रचल्या. त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे 'साँग्स ऑफ कावर्ड.'

Image copyright Penguin

या खडतर काळात लिखाणामुळं माझ्या भावनांचा निचरा होत असे. माझ्या मनात दडलेल्या गोष्टी लिखाणानेच बाहेर आल्या.

मुरुगन यांनी वैचारिक विरोधाला नवे आयाम दिले आहेत. ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्यावर लादण्यात आलेल्या बंदीविरोधात लिखाण केलं त्यातून त्यांची सहनशीलता दिसून येते असं शास्त्रीय संगीतकार आणि रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते टी. एम. कृष्णा यांनी सांगितलं. मुरुगन यांच्या कवितांना ते संगीतबद्ध करत आहेत.

ऑरवेलच्या जातकुळीतली कथा

पुनाची ही कादंबरी ऑरवेलच्या जातकुळीतली आहे असं म्हटलं जात आहे. जॉर्ज ऑरवेलने जसं अॅनिमल फार्म ही प्राण्यांची कथा सांगून राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे त्याप्रमाणे शेळीच्या कथेतून मुरुगन यांनी सामाजिक स्थितीवर भाष्य केलं आहे.

समाजातल्या सशक्त लोकांकडून दुर्बलांवर कसे अत्याचार होतात या गोष्टीची ही शेळी एक साक्षीदार बनते. समाजात घडलेल्या घटनांवर आपण भाष्य करत नाहीत तर त्या मूकपणे आपण पाहत जगतो असं प्रतिकात्मकरित्या मुरुगन यांनी या कथेतून सांगितलं आहे असं कृष्णा यांनी बीबीसीला सांगितलं.

दरवेळी मुरुगन यांची कथा खऱ्या गावात किंवा शहरात घडत असते पण यावेळी मात्र ही कथा एका काल्पनिक गावात घडते. मला मानवांबद्दल लिहण्याची भीती वाटते. गाय आणि डुकराबद्दल तर तुम्ही काही बोलू शकत नाही. असं मुरुगन यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे.

पुनाचीची कथा आणि मानवी जीवनात कमालीचं साधर्म्य आढळतं. जगण्यासाठी त्या शेळीला काय कष्ट घ्यावे लागतात, त्या शेळीचा प्रियकर पूवन हा मरतो. तसेच दुष्काळामुळे शेळीचं करडू मरतं.

या शेळीची कथा मुरुगन यांनी सहानुभूतीने लिहिली आहे. या कथेमध्ये मुरुगन यांचा भूतकाळही दिसतो. मुरुगन हे एका शेतकरी कुटुंबात वाढले आहेत. त्यांचं बालपण आई, काकू, आजी, बहिणी यांच्या सानिध्यात गेलं आहे. आईच्या पदराखालचा मुलगा असं म्हणून त्यांना हिणवलं जात होतं.

त्यांचं कुटुंब एका शेतात राहत असे. त्यांच्या घरी अनेक शेळ्या होत्या. मुरुगन जेव्हा सहा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्याकडे करुपायी नावाची एक शेळी होती.

या शेळ्यांचं आयुष्य मी जवळून पाहिलं आहे. या शेळ्या बोकडांपेक्षा जास्त जगतात. बोकड आमच्या घरात येऊ शकत नव्हते पण शेळ्यांचा आमच्या घरात वावर असे, असं ते सांगतात.

मुरुगन यांच्या जगातलं खेडं हे स्वप्नाळू आणि रोमांचक नाही. त्यांच्या खेड्यात हिंसा, लोभ, मत्सर आणि रक्तपात आहे. या गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या आहेत.

पुनाची तिच्या मृत्यूनंतर देवी बनते. तिला जिवंतपणी खराब वागणूक दिली जाते पण मृत्यूनंतर तिची पूजा केली जाते.

यातून मुरुगन यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. मुरुगन यांनी जेव्हा आपला साहित्यिक मृत्यू जाहीर केला त्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली.

लेखन हे माझ्यासाठी हत्यार देखील आहे आणि मन:शांतीचं द्वार देखील आहे असं ते म्हणतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)