#5मोठ्याबातम्या : उत्तर प्रदेशात 'प्रदूषणमुक्तीसाठी' 500 क्विंटल लाकूड जाळणार

हवन

पाहूयात आज सकाळी विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर असलेल्या पाच मोठ्या बातम्या.

1. 'प्रदूषणमुक्तीसाठी' 9 दिवस 500 क्विंटल लाकूड जाळणार

'प्रदूषण कमी करण्या'च्या उद्देशानं मेरठमध्ये रविवारपासून एका महायज्ञाला सुरूवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महायज्ञात तब्बल 500 क्विंटल आंब्याचं लाकूड जाळण्यात येणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आयुतचंडी महायज्ञ समितीनं या यज्ञाचं आयोजन केलं होतं. 125 x 125 चौरस फूट क्षेत्रावर एक भव्य यज्ञशाळा उभारण्यात आली असून त्यात 108 होम कुंड पेटवण्यात आले होते. वाराणसीहून 350 ब्राह्मण सहभागी झाले आहेत.

उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळानं यात कारवाई करण्यासंदर्भात धोरणात्मक नियम नसल्याचं सांगत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. "हे एका विशिष्ट धर्माशी संबधित असल्याने आम्ही त्यावर कारवाई करणार नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.

108 होम कुंडामध्ये आंब्याचं लाकूड जाळण्यात येईल. त्यात गाईचं शुद्ध तूप टाकलं जात आहे. अशा यज्ञामुळे वातावरण आणि हवा शुद्ध होते अशी हिंदू धर्मात मान्यता असल्याचं समितीचे उपाध्यक्ष गिरीष बंसल म्हणतात.

2. प्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला- संभाजी भिडे

राजकीय स्वार्थ आणि मतांसाठी कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दंगलीचा वापर करण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळे महाराष्ट्र पेटला. या प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम सुरू असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला.

फोटो कॅप्शन,

संभाजी भिडे

1 जानेवारीला पुण्याजवळच्या भीमा कोरेगावात भडकलेल्या दंगलींप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे संशयित आरोपी आहेत. या दोघांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आला असून एकबोटे यांना गेल्याच आठवड्यात अटक झाली होती.

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, संभाजी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. कोरेगाव भीमा प्रकरणी जे आरोपी आहेत ते शोधून काढावेत, या साठी आम्ही येत्या 28 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत.

"दंगलीत नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घ्या. विनाकारण मिलिंद एकबोटे आणि माझं नाव त्यामध्ये घेतले जात आहे. हे खरंच लोकशाहीला घातक आहे. एल्गार परिषद घेणाऱ्यांना तात्काळ अटक करा," असं संभाजी भिडे म्हणाले.

3. अरविंद केजरीवाल यांचं माफीसत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आधी आरोप केलेल्या नेत्यांची आणि व्यक्तींची माफी मागण्याचं सत्र सुरू केलं आहे.

फोटो कॅप्शन,

अरविंद केजरीवाल

द इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबचे माजी मंत्री विक्रमसिंग मजेठीया यांची माफी मागितल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी, तसंच ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा मुलगा अमित सिब्बल यांची माफी मागितली आहे.

आगामी काळात केजरीवाल आणि आम आदमी पार्टी अशाच 20 प्रकरणांमध्ये प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

"हा काही अंहकारांचा संघर्ष नाही. जर आमच्या बोलण्याने कुणी दुःखी होत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो," असं दिल्लीचे उपमुख्यंत्री मनिष सिसोदिया म्हणाले.

4. राजू शेट्टींची काँग्रेसशी हातमिळवणी

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2019ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या साथीनं लढविण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला.

फोटो कॅप्शन,

नवी दिल्ली इथं राहूल गांधी यांची भेट घेताना राजू शेट्टी

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, खासदार राजू शेट्टी यांच्या या निर्णयानं पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. शेट्टींनी काही महिन्यांपूर्वीच भाजपशी मैत्री सोडली होती.

त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा यापूर्वीच केली होती. शेट्टी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचं जाहीर केलं.

5. 'गुटख्यापासून कोणीतरी परावृत्त करायला हवं होतं'

तंबाखू आणि सुपारीचं सेवन केल्याचा पश्चात्ताप होत असल्याची भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली.

फोटो कॅप्शन,

शरद पवार

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत इंडियन डेंटल असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. "तंबाखू आणि सुपारीचं सेवन करत आल्याचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे. चाळीस वर्षांपूर्वी ही सवय सोडण्यासाठी कोणीतरी दटावलं असतं तर बरं झालं असतं," अशी खंतही पवारांनी व्यक्त केली.

शरद पवारांनी तोंडाच्या कर्करोगावर मात केली आहे. लाखो भारतीय अजूनही गुटख्याच्या आमिषाला बळी पडतात, हे पाहून त्रास होतो, असंही ते यावेळी म्हणाले.

2022 पर्यंत तोंडाच्या कर्करोगाचं उच्चाटन करण्याचं इंडियन डेंटल असोसिएशनचं उद्दिष्ट आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)