सोशल : 'सरकारवरचा विश्वास उडत चालला, म्हणूनच हे मोर्चाचं हत्यार'

मोर्चा Image copyright Sharad Badhe/BBC

मुंबईत माटुंगा-दादर स्थानका दरम्यान मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून रेल्वेमध्ये अॅप्रेंटीसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागणीसाठी रेलरोको आंदोलन केलं.

या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा ऐन गर्दीच्या वेळेत ठप्प झाली आणि मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झाला.

मध्ये रेल्वेने परिस्थिती लक्षात घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि अॅप्रेंटीसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येईल, असंही सांगण्यात आलं.

पण राज्यात गेल्या 10 दिवसातलं हे चौथं मोठं आंदोलन ठरलं. महाराष्ट्रात सध्या आंदोलनांचं सत्र सुरू आहे. शेतकऱ्यांचा लाँग मार्च, MPSC विद्यार्थी आणि अंगणवाडी सेविकांची आंदोलनं आणि आज रेल्वे अॅप्रेंटीसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रेलरोको आंदोलन केलं.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला होता की, या आंदोलनांचा अर्थ काय? हे तुम्हाला कशाचं निदर्शक वाटतं?

बाबू डिसोझा लिहितात, "सरकारविरोधी असंतोष निर्माण झाला आहे. सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी वा आदिवासी सगळेच नाराज आहेत."

Image copyright Facebook

प्रफुल्ल जोशी यांचं मत थोडं वेगळं आहे. ते यासाठी विरोधकांना जबाबदार धरतात. ते म्हणतात, "विरोधकांचं अस्तित्वच धोक्यात आहे. त्यामुळे येनकेन प्रकारे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधकांनी चालवलेली धडपड म्हणजे ही आंदोलनं आणि मोर्चे."

Image copyright Facebook

कृष्णा पडवळ यांचंही असंच मत आहे. "हे प्रश्न आत्ताच निर्माण झालेत का? पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आंदोलनांना फूस देत आहे."

Image copyright Facebook

"लोकांचा सरकारवरचा विश्वास उडत चालला आहे. आणि म्हणूनच त्यांनी मोर्चाचं हत्यार उपसलं आहे. नाहीतर लाठ्याकाठ्या खायला कोणाला आवडेल?" असं म्हटलं आहे संदीप कुडेकर यांनी.

Image copyright Facebook

प्रदीप निघोत यांना हे मोर्चे म्हणजे आगामी निवडणुकांचे निदर्शक वाटतात.

Image copyright Facebook

जयंत साबळे यांनाही यात काहीतरी वेगळं वाटतं. ते म्हणतात, "एवढे मोर्चे निघतात म्हणजे काही तरी चुकतंय."

हे वाचलंत का?