#AAPology : माफीनाम्यानंतर केजरीवालांवरून लोकांचा विश्वास उडालाय का?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

2012 मध्ये एका जनआंदोलनानंतर आम आदमी पार्टीचा जन्म झाला. असं वाटत होतं की हा पक्ष शहरी वर्गातील राजकारणात नवी जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. यामुळे भारतीय राजकारणाला एक नवा आयाम मिळेल. आता ही उमेद खचत चालली आहे.

माफी प्रकरणांमुळे निर्माण झालेल्या धर्मसंकटातून अरविंद केजरीवाल कदाचित बाहेर पडतील, पक्षाला कायद्याकडून माफी मिळेल, पण त्यांना राजकीय आणि नैतिक क्षमा मिळणार नाही.

जो राजकारणाचा घोडा त्यांना इथवर घेऊन आला आहे, आता ते पुन्हा त्यावर स्वार होऊ शकतील का? इथून पुढे त्यांच्या प्रवासाची काय दिशा असेल? आता ते जनतेला कसं सामोरे जातील?

सोन्याची संधी गमावली

दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशात आदर्श शहरकेंद्रित राजकारण करण्याची संधी 'आप'ला मिळाली होती. जर ते हळूहळू काम करत राहिले असते तर त्यांचं हे मॉडल देशभर लागू कसं करता येईल, याची चर्चा नेहमी झाली असती. पण त्यांनी ती संधी हातची गमावली.

त्यांच्या नेत्यांच्या महत्त्वकांक्षेचा कॅन्व्हास इतका मोठा होता की त्यावर कुठलंही चित्र काढता येणं शक्यच नव्हतं.

भगवंत मान यांचा राजीनामा

आता हे खरं आहे की केजरीवाल हे मोठ्या नेत्यांविरोधात मोठे आरोप लावणार नाहीत आणि जरी त्यांनी ते लावले तरी त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यांनी आपला विश्वासार्हता गमावली आहे. आता पक्षासमोरचं सर्वांत मोठं आव्हान हे आहे की पुढची दिशा काय असेल?

फक्त काही लोकांच्या हातात असलेल्या आणि विचारधारेचा अभाव असलेल्या या पार्टीचं भविष्य अंधःकाराकडे जाताना दिसत आहे.

केजरीवाल यांचा विषय तूर्तास बाजूला ठेवला तर लक्षात येईल की आम आदमी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना या प्रकरणांची झळ बसली आहे. त्यांना बराच त्रास सहन करावा लागलाय. अनेकांवर खटले भरण्यात आले आहेत किंवा त्यांना अपमानित व्हावं लागलं आहे. असं असलं तरी ते आपल्या नेतृत्वाला बरोबर समजत आले.

मग आता केजरीवालांच्या माफीसत्रानंतर खरी फसवणूक तर त्यांचीच झाली आहे, असं म्हणावं लागेल.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

असा संदेश जात आहे की केजरीवाल स्वतःसाठी आरामदायक वातावरणाची निर्मिती करून घेत आहेत आणि कार्यकर्त्यांना मात्र वावटळीत एकटं सोडून देत आहेत.

गोष्ट केवळ केजरीवाल यांची नाही, प्रश्न त्यांच्या पूर्ण राजकारणाचा आहे. असं का झालं की त्यांनी गपचूप माफी मागितली आणि बाकी लोक मार खात बसले?

अंजली दमानियांमुळे अडचणीत आले तेव्हा

केजरीवाल यांच्या एक जुनी सहकारी म्हणजे अंजली दमानिया. त्यांच्यावर विश्वास ठेऊन अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरी यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. दमानिया यांनी 2014मध्ये नागपुरातून लोकसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यात अर्थातच त्यांना यश आलं नाही.

मग 2015मध्ये दमानिया आपमधून बाहेर पडल्या. त्यांचं म्हणणं आहे, "माझ्यावर 24 खटले आहेत आणि मी ते लढणार आहे."

त्यांच्यासारखे असे बरेच लोक असतील.

अरविंद केजरीवाल यांनी केवळ एका प्रकरणात माफी मागितली असती तर असं समजलं असतं की त्यांनी भावनेच्या आहारी जाऊन असं केलं असेल. पण खरी गोष्ट ही आहे की त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्त्वपूर्ण काळ आरोपांच्या राजकारणाभोवती केंद्रित होता. अशा स्थितीत ते आरोपांना वेगळं कसं करू शकतात.

Image copyright Getty Images

आरोप करणं आणि माफी मागणं इतकं सोपं थोडंच असतं. त्यांनी आरोप लावला आणि माफी मागून सुटले. आरोप लावताना त्यांना समजलं नाही आणि आता त्यांचं गांभीर्य त्यांना कळलं आहे?

त्यांना यश मिळालं ते त्यांच्या निरागसतेमुळं मिळालं होतं. त्यांच्या या शौर्याचा पुरस्कार जनतेने त्यांना दिला होता.

केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया म्हणाले, "आम्हाला फालतू गोष्टींवर वेळ वाया घालवायचा नाहीये. आम्हाला काम करायचं आहे."

गुन्हेगारांची स्थिती देखील काही काळानंतर अशीच होते. ते जगापासून दूर जाऊ पाहतात पण परिस्थिती त्यांना तसं करू देत नाही. पक्षाच्या एका नेत्याचं असं म्हणणं होतं, "अब्रुनुकसानीचे दावे म्हणजे कायदेशीर आणि अधिकृत दादागिरी आहेत. कायद्याच्या किचकट प्रक्रियेचा फायदा घेऊन आमच्यावर दबाव निर्माण केला जायचा."

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं तर हे होत नाही ना?

राजकारण करायचं म्हटलं तर पैसा लागतो आणि 'आप' अद्याप अशा स्रोतांपर्यंत पोहोचला नाही आहे जिथून राजकीय पक्षांना प्राणवायू मिळतो. विरोधाभास असा आहे की अशा ऑक्सिजनचा राजकारणातला सप्लाय बंद करू, असं वचन देऊन आप सत्तेत आला होता. पण त्याच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं त्यांचा बळी गेला.

आणि समस्या इथेच संपत नाही. पार्टीमध्ये चालणाऱ्या गोंधळावर केजरीवालांना नियंत्रण ठेवणं शक्य झालं नाही. सर्वकाही त्यांच्या विरोधकांमुळं झालं, असं म्हणता येणार नाही. बऱ्याच गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बालिशपणामुळेही झाल्या आहेत.

या प्रकरणांचा सोक्षमोक्ष एकदाच त्यांनी लावावा, अशी इच्छा बाळगणं देखील रास्त नाही कारण सध्या पार्टी अनेक अडचणींमध्ये गुरफटली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा योगेंद्र यादव यांच्यासोबत अरविंद केजरीवाल.

कदाचित पक्षाची या गोष्टीची तयारी देखील नसावी. पण अचानक बिक्रम सिंग मजेठिया यांनी केजरीवाल यांच्या माफीचं बिंग फोडलं आणि हे प्रकरण वादळासारखं गाजलं.

कुणा कुणाची माफी मागावी लागेल?

दिल्ली विधानसभेच्या 20 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या तर त्यांच्याकडे या प्रश्नाची उत्तरं नक्कीच नसतील. त्यांना केवळ प्रभावी विरोधी पक्षातील नेत्यांची माफी मागायची नाही तर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून, माजी सहकाऱ्यांकडून आणि जनतेकडून माफी मागावी लागेल. यामध्ये योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि आनंद कुमार यांचा समावेश आहे. ही यादी मोठी आहे आणि यापैकी अनेकांना तर केजरीवाल यांचं राजकारणच पटत नाही.

केजरीवाल यांच्या माफीवरही कुणाला विश्वास बसेल का? गेल्या चार वर्षांत त्यांनी अनेक सहकाऱ्यांना बदललं, अनेक गोष्टी बदलल्या, अनेक वचनं बदलली.

दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांचा कदाचित त्यांच्यावर विश्वास असेल. पण मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय गटातील लोकांचा विश्वास तर उडाला आहे.

ही पार्टी देशातील सार्वजनिक जीवनात असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी आली होती. भ्रष्टाचार संपला नाही पण पार्टी मात्र सत्तेच्या गल्लीबोळात जागच्या जागीच फिरत आहे.

जर त्यांच्याकडे व्यवहारिक शहाणपण नव्हतं तर ते राजकारणात पडलेच कशासाठी? परिवर्तनाचं राजकारण आणि सत्तेच्या राजकारणाचे रस्ते वेगळे आहेत.

(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)