कृष्ण कोण? कर्ण कोण? राहुल गांधी महाभारतातून काय शिकू शकतात?

महाभारत Image copyright PUNEET BARNALA/BBC

"हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर युद्ध झालं होतं. युद्धात सहभागी झालेले कौरव ताकदवान आणि अहंकारी होते. पांडव मात्र विनम्र आणि सत्यासाठी लढणारे होते. कौरवांप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करतात तर काँग्रेस मात्र पांडवांप्रमाणे सत्यासाठी विनम्रपणे संघर्ष करत आहे," हे वक्तव्य आहे राहुल गांधींचं.

काँग्रेसच्या 84व्या महाअधिवेशनात राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आणि याद्वारे राजकीय संघर्षाला महाभारतासोबत जोडलं. भाजपकडून राहुल गांधींच्या या वक्यव्याचा जोरदार समाचार घेण्यात आला.

"जी माणसं रामाचं अस्तित्व मान्य करत नव्हती, तीच माणसं आज स्वत:ला पांडवांचं रूप म्हणून सांगत आहेत," अशी टीका भाजप नेत्या आणि निर्मला सीतारामण केली.

महाभारताची आठवण कशासाठी?

पण राहुल गांधींनी महाभारताचा उल्लेख का केला ? यामागे काही खास कारण होतं की ते भाजपला नकारात्मक आणि स्वत:च्या पक्षाला सकारात्मक दाखवण्यासाठी एखादा जुमला (क्लृप्ती) शोधत होते.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी बीबीसीला सांगितलं की, "राहुल गांधी यांनी दिलेलं उदाहरण हिंदू पौराणिक कथेतलं आहे. त्यात त्यांनी मंदिराचा उल्लेखही केला आहे. देव सगळ्याच ठिकाणी आहे, असं आपल्याला सांगण्यात आलं आहे, असंही राहुल म्हणाले. ते असंही म्हणाले की सोनिया गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेसकडे मुस्लीम धार्जिणा पक्ष म्हणून पाहिलं जातं. मला वाटतं की, कौरव-पांडवांचा उल्लेखही या रणनीतीचाच एक भाग आहे."

दोन्ही राजकीय पक्षांची आपापली भूमिका आहे. पण सद्यस्थितीत राहुल यांना पांडव व्हायचं असेल तर ते कसं शक्य होईल?

त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या राहुल गांधींना कौरव, पांडव अथवा महाभारत काळातील दुसऱ्या पात्रांची भूमिका शिकवू शकतात.

सकारात्मक राजकारण

कुणाचंही अस्तित्व संपवण्याची इच्छा आपल्या स्वत:साठीच धोकादायक ठरू शकते, असं महाभारतानं शिकवलं आहे.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

कौरवांनीही असाच विचार केला आणि त्याची परिणती काय झाली? राहुल आणि काँग्रेस यांनीही हे लक्षात घ्यायला हवं. भूतकाळात त्यांना या बाबीचं नुकसान झालेलं आहे.

गुजरात आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका केली होती. त्यामुळे त्यांना नुकसानच झालं.

त्यामुळे व्यक्ती आधारित नकारात्मक राजकारणापेक्षा राहुल गांधी यांनी भाजपाप्रणित सरकारच्या अपयशाला अधोरेखित करायला हवं. तसंच याबरोबर हेही सांगायला हवं की, सद्य परिस्थिती बदलण्यासाठी त्यांच्याकडे काय उपाय आहेत.

ही दोस्ती तुटायची नाय

महाभारतात कृष्ण-अर्जुन असो की दुर्योधन-कर्ण मित्रांच्या कहाण्या सांगितल्या जातात. याचप्रमाणे काँग्रेस आणि राहुल गांधींना मैत्रीचं महत्त्व समजावं लागेल. वेळप्रसंगी त्यांना आपल्या मित्रांचं म्हणणंही ऐकावं लागेल.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

गोरखपूर आणि फुलपूर निवडणुकांत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी एकत्र येऊन काय करता येऊ शकतं, हे नुकतंच दाखवून दिलं.

आता 2019च्या निवडणुका जवळ आल्यात आणि काँग्रेसनं नवीन नाती बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसंच ज्या राज्यांत काँग्रेसची ताकद नाममात्र राहिलेली आहे, तिथं अहंकार बाजूला ठेवत प्रादेशिक पक्षांसोबत हात मिळायला हवा. काही ठिकाणी सीनियर तर काही ठिकाणी ज्युनियर अशा भूमिकेत काँग्रेसला राहावं लागेल.

अर्धवट माहिती धोकादायक

महाभारतातला अभिमन्यूचा प्रसंग धाडसाचं वर्णनही करतो आणि त्यापासून धडाही शिकवतो. अर्धवट माहितीच्या आधारे चक्रव्युहात प्रवेश करता येऊ शकतो पण त्यातून बाहेर नाही पडता येऊ शकत, हा तो धडा.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

युट्यूबवर राहुल गांधींचे अनेक व्हीडिओ आहेत, ज्यात भाषणावेळी ते काहीनाकाही चुकी करताना दिसून येतात. असं नाही की ते आपली चूक स्वीकारत नाही. सामान्य माणूस आसल्यानेच मी चुकतो, असंही ते म्हणतात.

पण ज्यावेळी ते भाषण करत असतात त्यावेळी आपली प्रतिमा बेजबाबदार नेता अशी बनता कामा नये, याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं. केंद्र सरकारला घेरायचं असेल तर तथ्यांमध्ये तफावत राहता कामा नये.

"पूर्वीचे राहुल आणि आजचे राहुल यांमध्ये तुलना केल्यास आजचे राहुल अधिक चांगले वाटतात, यात काहीही दुमत नाही. पण जेव्हा तुम्ही राहुल यांची तुलना नरेंद्र मोदींशी करता तेव्हा त्यासाठी त्या दोघांमध्ये आज बरंच अंतर आहे," असं नीरजा चौधरी सांगतात.

पराभवातून सावरणं

महाभारतातलं कर्णाचं पात्र मनोवेधक आहे. जन्मानंतर अनेक वर्षं या सूतपुत्रानं भेदभाव आणि अपमान पचवले. पांडवांनी अज्ञातवासादरम्यान बऱ्याचदा संकटांचा सामना केला. पण कोणतीही गोष्ट त्यांना थांबवू शकली नाही.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

यातून ही शिकवण मिळते की, राजकीय कारकीर्दीत अनेक वळणं, चढ-उतार असतात. पण मेहनत करत राहिल्यास ध्येय गाठता येऊ शकतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या वाटेत अनेक वळणं होती, पण तरीही ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले.

अशा अनेक शक्यता आज राहुल यांच्यासमोर आहे. ते अशावेळी काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत, ज्यावेळी पक्षासमोर खूप अडचणी, मोठी आव्हानं आहेत. पण याच अडचणींमध्ये अनेक संधीही लपलेल्या आहेत.

वेळेनुसार बदलणं

महाभारतात एक काळ असा येतो जेव्हा पांडवांना राज्य सोडून अनेक वर्षं बाहेर राहावं लागतं. यावेळी ते स्वत:ला वेळेच्या कसोटीवर तावून सुलाखून बघतात.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

राजकीय परिस्थितीसुद्धा अशाप्रकारे बदलत असते आणि या बदलांसोबत नेत्यांनीही जुळवून घेणं आवश्यक असतं. पूर्वीप्रमाणे ताकदवान नसलेल्या काँग्रेसला समोर घेऊन जाण्याची जबाबदारी राहुल गांधींवर आहे.

त्यांच्यासमोर एका बाजूला भाजपसारखा शक्तिशाली पक्ष आहे तर दुसरीकडे आपापल्या गडांवर राज्य करणारे प्रादेशिक पक्ष. म्हणून काही ठिकाणी त्यांना नवीन मित्र बनवावे लागतील तर काही ठिकाणी स्पर्धा करावी लागेल. ही वेळ भूमिका बदलण्याची आहे.

काँग्रेस पांडव कशी बनणार?

ज्येष्ठ पत्रकार मधुकर उपाध्याय सांगतात, "मी राहुल गांधींचं यासंबंधीचं वक्तव्य ऐकलं नव्हतं तर वाचलं होतं. ते वाचताक्षणीच डोळ्यासमोर आलं की, काँग्रेसमध्ये पांडव कोण आहे?"

"काँग्रेसमध्ये सत्यासाठी उभे राहणारे युधिष्ठिर कोण आहेत? हरएक लक्ष्य पार करणारे अर्जुन कोण आहेत? प्रहार करणारे भीम कोण आहेत आणि नकुल-सहदेव कुठे आहेत? ही जी पाच पात्रं आहेत, त्यांची जी वैशिष्ट्य आहेत ती कुठे आहेत? ही पात्रं कुठे आहेत?" असं उपाध्याय पुढे म्हणाले.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

असं असताना पांडवांचा उल्लेख राहुल यांनी का केला?

उपाध्याय सांगतात, "मला असं वाटतं की, राहुल कोअर टीम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती नवीन टीम असेल. मला वाटतं पांडवांच्या रूपात राहुल याच टीमचा उल्लेख करत असतील."

"काँग्रेसचे अध्यक्ष जर महाभारताचा उल्लेख करत असतील तर त्यांनी हेही जाणून घ्यायला हवं की, त्यांना पांडव बनवावे लागतील. हा तर पार्ट टाईमर्स लोकांचा पक्ष झाला आहे. आणि पार्ट टाईमर्स कधीच फुल टाईमर्सची जागा नाही घेऊ शकत," उपाध्याय सांगतात.

लढत सोपी नाही

काँग्रेससमोर जी ताकद उभी आहे ती दिवस-रात्र, जागता-उठता राजकारण करते. त्यांच्या डोक्यात दुसरं काहीही चालत नाही.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

राहुल स्वत:ला अर्जुनाच्या भूमिकेत पाहत आहेत की कुणा दुसऱ्या पात्राच्या, याबाबत नीरजा स्पष्ट काहीही सांगत नाही.

"सध्याच्या राजकारणाची महाभारताशी तुलना करायची झाल्यास काँग्रेसला कृष्णाची गरज आहे. तो कोण होणार? मला वाटत सोनिया कृष्ण बनू शकतात. UPAच्या प्रमुख त्याच बनतील," असं नीरजा सांगतात.

सोनियांना निवृत्त व्हायचं नव्हतं का? यावर नीरजा सांगतात, "तसंच काहीतरी होतं, पण आता मात्र तसं काही वाटत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की मायावतींनी UPAची जबाबदारी सांभाळायला हवी. ममता यांच्याशीही याबद्दल चर्चा व्हाही, असं वाटत होतं. कारण आताच पंतप्रधानपदाची चर्चा होणार नाही, झालीच तर UPAचं प्रमुखपद कोण सांभाळेल? याची होईल."

मोदींवर बरंच काही अवलंबून

"सोनियांनी इतर पक्षीयांना नुकतंच भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. पण विरोधी पक्ष एकवटले तरीही यशाची खात्री नाही. मोदींनी वैयक्तिकरीत्या किती मैदान मोकळं सोडलं आहे, यावर बरंच काही अवलंबून असेल," नीरजा सांगतात.

Image copyright PUNEET BARNALA/BBC

"जिथं भाजप पोटनिवडणुका हरलेला आहे, तिथं नरेंद्र मोदींनी काहीही काम केलेलं नाही," नीरजा सांगतात.

काँग्रेस अधिवेशनात 'प्रॅग्मॅटिक अॅप्रोच'च्या उल्लेखाकडे नीरजा यांचं लक्ष वेधलं. त्यांनी प्रश्न केला की, "याचा अर्थ काय आहे? पंतप्रधानाच्या खुर्चीकरता काँग्रेस अडून बसणार नाही?"

विरोधकांच्या एकत्रित येण्यानं नरेंद्र मोदींना फायदा होऊ शकतो का? यावर नीरजा सांगतात, "हा तसं होऊ शकतं. सगळेच जण मला घेरत आहेत, असं म्हणून मोदी लोकांच्या भावनेला हात घालू शकतात."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)