#5मोठ्या बातम्या : देशात शेतकरी आत्महत्या घटल्या पण महाराष्ट्रात सर्वाधिक

farmer Image copyright Getty Images

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या पण...

केंद्रीय कृषी मंत्रालयानं लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 2016मध्ये देशभरात 11,370 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2015मध्ये हे प्रमाण 12,602 एवढं होतं.

2016च्या शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, या आकडेवारीवरून देशात दर तासाला एक आत्महत्या होत असल्याचं स्पष्ट होतं. 2016मध्ये चांगला पाऊस झाल्यानं खरीप हंगामात विक्रमी उत्पादन आलं होतं. त्यामुळे आत्महत्या घटल्या असाव्यात.

महाराष्ट्रात या काळात 3661, तर कर्नाटकमध्ये 2079 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्महत्यांपैकी हेच प्रमाण 50 टक्के आहे.

दरम्यान, भूसंपादनात योग्य मोबदला द्यावा, या मागणीची दखल घेतली जात नसल्याने अकोला जिल्ह्यातील खामगाव येथील 91 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे एक निवेदन पाठवून स्वेच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे.

उपोषणाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने या शेतकऱ्यांनी शेवटी स्वेच्छामरणासाठी राष्ट्रपतींकडे धाव घेतली, असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

Image copyright RAVI PRAKASH/BBC

2. झारखंड : गोरक्षकांना जन्मठेप

गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावानं हत्या केल्याप्रकरणी रामगढच्या फास्ट ट्रॅक कोर्टानं 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अलीमुद्दीन अन्सारी हत्याकांड प्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात झारखंड उच्च न्यायालयात जाणार असल्याचं दोषींच्या वकिलांनी सांगितलं.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, 16 मार्च रोजी या प्रकरणी न्यायालयाने 11 आरोपींना दोषी ठरवलं होतं. न्यायालयाने या प्रकरणी 12 पैकी 11 जणांना 302 कलमांतर्गत दोषी धरलं , तर एकाला ज्युवेनाइल ठरवलं होतं.

या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. सुनावणी दरम्यान न्यायालयाबाहेर अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

गेल्या वर्षी 29 जून रोजी रामगढ येथे जमावाने गोमांस तस्कर असल्याच्या संशयावरून अलीमुद्दीन याला जबर मारहाण केली होती. त्याच्या मारूती व्हॅन गाडीलाही आग लावण्यात आली होती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अलीमुद्दीनचा मृत्यू झाला होता.

Image copyright Getty Images

3. महाराष्ट्रातल्या जंगलात अडीचशे वाघ!

देशात व्याघ्रगणनेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, महाराष्ट्रातील जंगलात सुमारे 235 ते अडीचशे वाघ असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. डिसेंबर 2017 पासून राज्यात व्याघ्रगणनेला सुरवात झालेली आहे. त्याची आकडेवारी देशपातळीवर मार्च 2019 पर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, त्या दृष्टीने राज्यात सर्वच व्याघ्र प्रकल्पांसह इतरही गणना झालेल्या भूभागातील वाघ आणि वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे, खुणा आणि विष्ठांचे नमुने, कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र आणि इतरही माहिती तातडीने पाठविण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयांनी संबंधितांना पाठविलेल्या आहेत. यंदा जळगावमध्येही वाघांचे अस्तित्व दिसल्याची माहिती पुढे आलेली आहे. गणनेमध्ये देशातील वाघांची संख्या 2 हजार 500 पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2010मध्ये देशात 1700 तर राज्यात 169 वाघांची नोंद झाली होती.

4. मुख्यमंत्र्यांच्या नावाने नगरसेवकाकडे 10 कोटींची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हुबेहूब आवाज काढत 10 कोटींची खंडणी उकळणाऱ्या एका महाठगाला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनुद शिरगावकर असं या इसमाचं नाव आहे.

एबीपी माझाच्या बातमीनुसार, शिरगावकरने विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यासाठी ठाण्यातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरेंकडे 10 कोटींची मागणी केली. एका महिलेने मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करून देत असल्याची बतावणी केली.

यानंतर अनिल भानुशाली नावाच्या तिच्या साथीदाराने फोनवर मुख्यमंत्र्यांचा आवाज काढला. यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून अनुद शिरगावकरसह एका महिलेला अटक केली.

याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महाठगाने आणखीही काही जणांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.

Image copyright SAJJAD HUSSAIN/Getty Images

5. अॅट्रॉसिटी कायदा : पुनर्विचार याचिकेची मागणी

अॅट्रॉसिटी कायद्याच्या अमलबजावणीबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या पार्श्वभूमीवर, या निकालाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.

भाजपमधील दलित खासदारांनी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना गाठून या प्रकरणी पुनर्विचार याचिका करावी, अशी मागणी केल्याचं समजतं, अशी बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसनंही सरकारनं हे प्रकरण नीट हाताळलं नसल्याची टीका करत, पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे, असं आनंद शर्मा यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)