अण्णा हजारे पुन्हा दिल्लीत, काय आहेत आंदोलनाची कारणं?

अण्णा हजारे Image copyright Facebook
प्रतिमा मथळा अण्णा हजारेंनी उपोषण आणि आंदोलनासाठी पुन्हा दिल्लीत धडक दिली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आजपासून दिल्लीत पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. या वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकपाल हे दोन प्रमुख विषय असल्याचं अण्णांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. या आंदोलनामागची नेमकी पार्श्वभूमी काय आणि आंदोलनाची कारणं काय याविषयी त्यांच्याबरोबर झालेल्या फेसबुक लाईव्हचा संपादित अंश.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी बातमीच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

प्रश्न : अण्णा तुम्ही लोकपालच्या मुद्द्यावरून 2011 मध्ये देशव्यापी आंदोलन केलंत. त्यानंतर आता सात वर्षांनी पुन्हा याच मुद्द्यावर दिल्लीत येण्याची गरज तुम्हाला का वाटली ?

उत्तर : 2011 मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून देश जागा झाला कारण त्यावेळी भ्रष्टाचार खूपच वाढलेला होता. महागाईचाही प्रश्न होता. हे सगळे लोकांच्या मनातले मुद्दे होते म्हणून सगळे रस्त्यावर उतरले. जनता रस्त्यावर आली त्यामुळे सरकारला लोकपाल विधेयक आणावं लागलं. 1966 पासून या देशात जे झालं नव्हतं ते झालं. यानंतर नवं सरकार आल्यावर हे सरकार तरी याची अंमलबजावणी करेल असं वाटलं होतं. पण या सरकारने हा कायदा कमजोर करणारं नवं विधेयक आणलं. याला माझा विरोध आहे.

प्रश्न : पण अण्णा... हे सरकार येऊनही चार वर्षं होत आली. तुम्ही इतके दिवस वाट का पाहिलीत, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.

उत्तर : भाजपचं सरकार आल्यानंतर दीड महिन्यानं लगेचच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. सशक्त लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक सुधारणा हे माझे तीन मुख्य मुद्दे होते. पण पंतप्रधानांकडून काहीही उत्तर आलं नाही. आतापर्यंत मी पंतप्रधान मोदींना 43 पत्रं लिहिली आहेत. पण एकाचंही उत्तर आलं नाही. मी 8 महिन्यांपूर्वी त्यांना आंदोलनाचा इशारा देणारं पत्र लिहिलं. या मुद्द्यांवर सरकारने काही केलं नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल, असं मी स्पष्ट म्हटलं होतं. त्यालाही त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. म्हणून मी आंदोलनाचा निर्णय घेतला.

प्रश्न : लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुमच्या थेट मागण्या काय आहेत ?

उत्तर : लोकपाल, शेतकरी आणि निवडणूक सुधारणा या मुद्द्यांवर मी सरकारकडे 10 मागण्या केल्या आहेत. लोकपाल कायद्यानुसार, लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नेमणुका व्हाव्यात ही माझी मुख्य मागणी आहे. शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी कृषीमूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा द्या, असं मी म्हटलेलं आहे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल यासारख्या तरतुदी मी सरकारला सुचवल्या आहेत.

प्रश्न : तुम्ही यूपीए सरकारवर गंभीर आरोप केले होते. नरेंद्र मोदींच्या सरकारबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?

उत्तर : हे सरकार आश्वासनं खूप देतं पण पाळत नाही. पंतप्रधान जगभर फिरत असतात पण त्यांना देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मी जे मुद्दे मांडतोय ते त्यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. त्यांचं याकडे लक्ष वेधण्यासाठीच मी रामलीला मैदानावर उपोषण करणार आहे.

प्रश्न : मागच्या वेळी तुमच्या आंदोलनाचा राजकीय कारणांसाठी वापर झाला. अरविंद केजरीवाल यांनी या आंदोलनानंतर राजकीय पक्षाची घोषणा केली, ते सत्तेतही आले. पण तुमच्या आंदोलनामागचं ध्येय बाजूला राहिलं. या आक्षेपावर तुमचं काय म्हणणं आहे ?

उत्तर : खरं आहे. मी अरविंदला सांगत होतो, पक्ष काढू नको, राजकारणात जाऊ नको. पण त्याने ऐकलं नाही. आता अरविंद केजरीवाल आणि माझा काही संबंध राहिलेला नाही. मी आता त्यांचे फोनही घेत नाही. आता मात्र यावेळी आम्ही याचा राजकीय वापर होऊ नये याची खबरदारी घेणार आहोत. ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचं आहे त्यांनी प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यायचं आहे की ते राजकारणात जाणार नाहीत. आतापर्यंत माझ्याकडे अशी 6 हजार प्रतिज्ञापत्रं आली आहेत. तरीही ते लोक राजकारणात गेले तर मी त्यांना कोर्टात खेचेन.

प्रश्न : तुम्ही गेल्या काही दिवसांत 20 राज्यांचा दौरा केलात. तुमच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळाला ?

उत्तर : हो. 20 राज्यांत माझ्या 40 सभा झाल्या. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता. खास करून शेतकरी त्यांचे प्रश्न घेऊन येत होते. त्यांच्या प्रश्नांना आवाज द्यावा, असं त्यांना वाटतं होतं. या दौऱ्यांमध्ये अनेक संस्था, नागरिकांचे गट या आंदोलनात सहभागी झाले. जनतेची ही ताकद तुम्हाला रामलीला मैदानावरच्या आंदोलनातही बघायला मिळेल.

Image copyright Facebook
प्रतिमा मथळा अण्णा हजारेंनी गेल्या काही दिवसांत 20 राज्यांचा दौरा केला.

प्रश्न : सरकार कोणतंही असो, तुमच्या आंदोलनाचा विरोधक राजकीय फायदा उठवतात, अशी टीका होते. यावेळी काँग्रेससारख्या विरोधकांनी हाच प्रयत्न केला तर काय ?

उत्तर : मी हे आधीच स्पष्ट केलं आहे की आमच्या आंदोलनाच्या स्टेजवर कुणाही राजकीय नेत्याला जागा नाही. अरविंद केजरीवाल यांनाही नाही. ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी आंदोलकांमध्ये बसावं. जनतेसोबत बसावं. मी हे आंदोलन राजकीय कारणांसाठी नाही तर गाव, समाज आणि देशासाठी करतो आहे. मी गेली 35 वर्षँ आंदोलन करतोय. एक सरकार गेलं की दुसरं येतं पण प्रश्न तसेच आहेत.

प्रश्न : अण्णा... तुम्ही उपोषणं करता, आंदोलनं करता पण आंदोलन संपल्यावर परिस्थिती जैसे थे होते, अशी टीका तुमच्यावर होते. तुम्ही पुन्हा उपोषणासारखा टोकाचा निर्णय का घेतला आहात ? उपोषण करून प्रश्न सुटतील का ?

उत्तर : मला या प्रश्नांवर उपोषणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही आणि उपोषण करून काहीच झालं नाही, असं कसं म्हणता येईल ? मी आतापर्यंत 16 उपोषण केलं, आंदोलनं केली. या आंदोलनातूनच तर माहितीचा अधिकार आला, ग्रामसभा, दफ्तर दिरंगाई, लोकपाल यासारखे कायदे सरकारला आणावे लागले. म्हणूनच मी म्हणतोय, आता लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस धोरण ठरवावं. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात त्यांनी विधेयकं आणावी, कायदे करावे. मागच्या वेळी जनतेच्या रेट्यामुळे का होईना, रात्री दोन-दोन वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवून लोकपाल विधेयकावर चर्चा झालीच ना.

प्रश्न : शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा सरकारने केली होती. यावर तुमचं काय म्हणणं आहे ?

उत्तर : आपला देश कृषीप्रधान आहे, असं आपण म्हणतो. पण याच देशात शेतकरी आत्महत्या करतोय. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींची चिंता आहे. देशातले उद्योगपती घबाड घेऊन देशाबाहेर पळून गेले तरी सरकार यावर काही करत नाही. अशा राज्यात जगायची माझी इच्छा नाही. आम्ही म्हणतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र कृषीमूल्य आयोग नेमा, त्याला स्वायत्तता देऊन त्यावर अनुभवी शेतकऱ्यांची नेमणूक करा. शेतीमालावरचं सरकारचं नियंत्रणही हटलं पाहिजे.

प्रश्न : तुम्ही आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यापैकी कुणीही तुमच्याशी संपर्क साधला का ?

उत्तर : नाही. कोणत्याही नेत्याने माझ्याशी संपर्क साधलेला नाही.

प्रश्न : तुमच्या आंदोलनांनतरही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांसारख्या नेत्यांची चौकशी का झाली नाही ? असं आमचे वाचक विचारतायत.

उत्तर : हे सगळे प्रश्न तुम्ही मला का विचारता ? असे प्रश्न नेत्यांना विचारायला हवेत. कोणताही मुद्दा असो, जे काही करायचं ते अण्णा हजारेंनी, हे आमचं काम नाही. असं का ? तुम्हीही रस्त्यावर उतरलं पाहिजे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. तेव्हा कुठे सरकारला जाग येईल.

प्रश्न : अण्णा... तुम्ही आता 80 वर्षांचे आहात आणि याही वयात तुमचा उपोषण करण्याचा निर्धार आहे. तुम्ही निराश झाला नाहीत ?

उत्तर : माझं तर ठरलं आहे. जे येतील त्यांच्यासहित आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय मी उपोषण आणि आंदोलन करणार आहे. ही लढाई आता 'आर या पार' आहे. माझ्या देशासाठी मला मरण आलं तरी चालेल. मी नेहमी म्हणतो, हार्ट अटॅकने मरण येण्यापेक्षा देशाची सेवा करताकरता मरण आलेलं अधिक चांगलं.

प्रश्न : पण तुमचं उपोषण हे राजधानीतलं नाट्य होतं, इव्हेंट होतो, अशी टीका होते.

उत्तर : मी टीकेला घाबरत नाही. आणि ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडाला लोक दगड मारतात, हे मी नेहमीच म्हणत आलो आहे.

प्रश्न : मागच्या वेळेसारखं याहीवेळी तुम्हाला माध्यमांचा प्रतिसाद मिळेल, असं वाटतं का ?

उत्तर : खरं आहे. मागच्या वेळी माध्यमांनी आमचं आंदोलन उचलून धरलं पण आता मी बघतोय, सगळी माध्यमं माझ्या मोठमोठ्या मुलाखती घेतात पण जेवढी बातमी यायला हवी तेवढी दिसत नाही. म्हणूनच माझा भर आता सोशल मीडियावर आहे. मी फकीर माणूस आहे, माझ्याकडे खर्च करायला पैसे नाहीत. पण सोशल मीडियातून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. या माध्यमामध्ये खूप ताकद आहे, असं मला वाटतं.

संपूर्ण मुलाखत इथे पाहता येईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)