ग्राऊंड रिपोर्ट : 'इराक धोकादायक आहेच पण इथली गरिबीही जीव घेत होती'

मंजित कौर आणि कुटुंबीय
प्रतिमा मथळा मंजित कौर आणि कुटुंबीय

"इराकमध्ये राहणं धोकादायक आहे, पण इथेही गरिबी आमचा जीव घेत होती." हे शब्द आहेत इराकच्या मोसूलमध्ये हत्या करण्यात आलेल्या दविंदर सिंह यांच्या पत्नी मंजित कौर यांचे.

52 वर्षीय दविंदर सिंह यांचा त्या 39 भारतीयांमध्ये समावेश होता ज्यांची इराकच्या मोसूलमध्ये कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटने हत्या केली.

पाणावलेल्या डोळ्यांनी मंजित पुढे सांगतात, "ज्या दिवशी ते इराकला चालले होते त्या दिवशी त्यांच्या बहिणीने त्यांना समजावून सांगितलं की, इराकमध्ये युद्ध सुरू आहे. त्यावर ते म्हणाले की, काळजी करायचं कारण नाही, मला काही होणार नाही."

या वाक्यानंतर मात्र मंजीत यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या. जुन्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोरून तरळू लागल्या आणि त्यांच्या स्वप्नांचा भंग झालाय, अशी त्यांची अवस्था झाली.

"जिथं हल्ले होत आहेत ते ठिकाण बरंच दूर आहे आणि ते राहत असलेल्या ठिकाणी वातावरण शांत आहे. आमचं त्यांच्याशी शेवटचं बोलणं जून 2014मध्ये झालं तेव्हा त्यांचं अपहरण झालेलं होतं. पण त्यांनी आम्हाला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. त्यांना आम्हाला काळजीत टाकायचं नव्हतं. पण आता तर ते काहीच नाही करू शकत," मंजित सांगतात.

'इराकहून आल्यानंतर आपलं घर बांधू'

दविंदर रुडका कला गावात मजुरी करायचे. त्यातून ते दररोज 200 ते 250 रुपये कमावायचे पण त्यांना दररोजच काम मिळेलच असं नव्हतं.

मंजित कौर यांना तीन अपत्य आहेत, ज्यापैकी दोघं जुळे आहेत. घरखर्च भागवण्यासाठी मंजित गावातल्या एका शाळेत शिवणकाम शिकवतात. यातून त्या दर महिन्याला अडीच हजार रुपये कमावतात.

"मी तीन-चार वर्षांसाठी इराकला जातोय आणि तिथून आल्यानंतर आपण आपलं घर बांधू, असं ते म्हणाले होते," मंजित सांगतात.

"त्यांना इराकला जाता यावं म्हणून आम्ही दीड लाख रुपयांचं कर्ज घेऊन एजंटला पैसे दिले. ज्या ठिकाणी यांना काम करायचं आहे ते ठिकाण अमेरिकेच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे आणि तिथली परिस्थिती सामान्य आहे, असा दावा त्या एजंटने केला होता," मंजिता सांगतात.

परराष्ट्र मंत्र्यांचा दिलासा

2011 साली दविंदर इराकला गेले त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा सहा वर्षांचा होता, तर जुळी मुलं आठ महिन्यांची होती.

"अपहरण होण्यापूर्वी ते दर महिन्याला कमाईतले 25,000 पेक्षा जास्त पैसे पाठवायचे," मंजित सांगतात.

गेल्या चार वर्षांपासून मंजित त्यांच्या पतीची वाट पाहत होत्या. "जेव्हा केव्हा मी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना भेटायची तेव्हा त्या सांगायच्या - 'आशा सोडायची नाही'."

"काही महिन्यांपूर्वी सरकारने त्यांच्या DNA चे नमुने घेतले होते. DNA घेताना ते कशासाठी घेण्यात येत आहेत याबद्दल आम्हाला काहीही सांगण्यात आलं नाही. पण गावातल्या लोकांनी हा अंदाज व्यक्त केला की, दविंदर आजारी असतील आणि म्हणूनच हे नमुने घेतले जात आहेत," मंजित पुढे सांगतात.

मुलांची इच्छा

मंगळवारी गावातल्या काही महिलांनी जेव्हा मंजित यांना सरकारने जाहीर केलेल्या माहितीबद्दल सांगितलं तेव्हा मंजित धावतच माहेरी पोहोचल्या. "त्यांच्या मृत्यू झालाय, हे ऐकूनच मला धक्काच बसला. मी धावतच माहेरी निघून आले."

त्यांच्या जुळ्यांपैकी एकाकडे पाहून मंजित सांगतात, "हा नेहमी विचारायचा - 'पप्पा वापस केव्हा येणार?'. आम्ही मग त्याला सांगायचो, 'तुझे पप्पा विदेशात राहतात. जेव्हा पप्पा परत येतील तेव्हा ते तुझ्यासाठी सायकल आणतील. पण आता तर त्याचे पप्पा कधीच परत येणार नाहीत."

मोसूलमध्ये हत्या झालेल्या 39 लोकांमध्ये 31 पंजाबचे होते. चांगली संधी मिळाल्यास विदेशात जाण्यासाठी पंजाबी लोक प्रसिद्ध आहे. राज्यातल्या गरिबी आणि नोकऱ्यांअभावी ते युद्ध सुरू असलेल्या देशांमध्येही जायला कचरत नाहीत.

विदेशात जाण्याची कारणं

32 वर्षांचे संदीप कुमार यांचंही नाव त्या 39 जणांच्या यादीत आहे. जालंधर जिल्ह्यातल्या मल्सियानजवळच्या एका गावातून संदीपही 2012साली इराकला गेले होते. तिथे मजुरीतून चार जास्त पैसे कमवता येतील, आपल्या चार बहिणींच्या देखभालीसाठी पैसे गोळा होतील, म्हणून...

संदीप यांच्या घराला दरवाजासुद्धा नाही, यावरूनच त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

"कुटुंबीय दर महिन्याला पैशांची वाट पाहायचे," संदीप यांचे भाऊ कुलदीप कुमार सांगतात.

धुरी गावातले प्रीतपाल शर्माही हत्या करण्यात आलेल्या 39 जणांपैकी एक आहेत. त्यांच्या पत्नी राज राणी यांच्या मते, "2011 साली ते इराकला गेले होते कारण इथे करण्यासारखं काही नव्हतं. इराकमध्ये खूप पैसा आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. पण पैसा कमावण्यासाठी त्यांना तिथं खूप कष्ट करावे लागायचे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)