भीमा कोरेगाव प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक झाली, मग संभाजी भिडेंना का नाही?

संभाजी भिडे Image copyright Raju Sanadi
प्रतिमा मथळा संभाजी भिडे

पुण्यातल्या भीमा कोरेगावात 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दोन संशयित आरोपी आहेत - समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे. काही दिवसांपूर्वी मिलिंद एकबोटेंना अटक झालेली असली तरी हिंसाचाराच्या अडीच महिन्यांनंतरही भिडेंना मात्र अजून अटक झालेली नाही. का?

एकबोटेंनंतर भिडेंनाही अटक व्हावी, या मागणीवरून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले असून त्यांनी 26 मार्चला मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी 14 मार्च रोजी या प्रकरणात मिलिंद एकबोटे यांना अटक केली होती. एकाच प्रकरणात एकबोटेंना अटक झाली असली तरी संभाजी भिडेंना अटक का नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

भीमा कोरेगावातील हिंसाचारानंतर अनिता सावळे यांच्या तक्रारीवरून पिंपरी पोलीस ठाण्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर 2 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. भीमा कोरेगाव शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलं. त्यानंतर पुढील तपास शिक्रापूर पोलिसांकडून सुरू आहे.

भिडेंवर लावण्यात आलेले आरोपच खोटे आहेत, असं शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, " ज्या आरोपांच्या आधारावर गुन्हा दाखल झाला आहे, ते आरोपच खोटे आहेत. त्यामुळे गुन्हा रद्द केला पाहिजे. मिलिंद एकबोटेंवर लावलेले आरोपही खोटे आहेत. या दोघांवरील गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान संघटना 28 मार्चला संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे."

पोलिसांचं काय म्हणणं आहे?

शिक्रापूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारित येतं. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना बीबीसीने संभाजी भिडे यांच्या चौकशी आणि अटकेबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं, "संभाजी भिडे यांची चौकशी अजून झालेली नाही. गरज पडल्यास त्यांची चौकशी केली जाईल."

Image copyright www.narendramodi.in
प्रतिमा मथळा गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलेल्या एका व्हीडिओमध्ये संभाजी भिडेंसोबत हा फोटो होता.

"मिलिंद एकबोटेंना अटक झाली कारण एकबोटेंविरोधात प्रथमदर्शनी पुरावे मिळाले होते. हा निर्णय तपास अधिकाऱ्यावर अवलंबून असतो. तपासादरम्यान पुरावे मिळाले, अटक करण्याची गरज भासली तरच अटक केली जाते. भिडेंची चौकशी करायची की नाही ते सुद्धा अजून ठरवलेले नाही," असं ते म्हणाले.

कायदा काय म्हणतो?

"एकाच प्रकरणात दोन व्यक्तींवर सारखेच गुन्हे दाखल झाले असले तरी त्या गुन्ह्यांमध्ये त्या व्यक्तींचा सहभाग वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे एकाच गुन्ह्यात एका आरोपीला अटक आणि दुसऱ्याला अटक नाही, असं होऊ शकतं," असं कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

"मात्र संभाजी भिडेंवर दाखल झालेला गुन्हा हा दखलपात्र आहे. अशा गुन्ह्यात अटक व्हायलाच हवी. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अडीच महिने उलटून गेले आहेत. भिडे यांची चौकशी आत्तापर्यंत व्हायलाच हवी होती. भिडे फरार झालेले नाहीत, मग त्यांची चौकशी का झाली नाही हा प्रश्न आहेच," असंही त्यांनी सांगितलं.

पोलिसांच्या भूमिकेबाबत बोलताना सरोदे म्हणाले की, "पोलिसांकडे विशेषाधिकार असले तरी त्यांचं उत्तरदायित्व कायद्याशी आहे. Discretion shall be used at most sensitivity, असं कायद्याचं तत्त्व आहे. प्रशासन विशेषाधिकार कोणाच्या बाजूने वापरतं, त्यावर त्या प्रशासनाचा दर्जा अवलंबून असतो," असं ते म्हणाले.

पोलिसांनी रीतसर प्रक्रिया पाळली का?

अशा प्रकरणात पोलिसांची प्रोसिजर काय सांगते हे बीबीसीने निवृत्त IPS अधिकारी सुधाकर सुराडकर यांच्याकडून जाणून घेतलं. सुराडकरांचं म्हणणं आहे की, "या प्रकरणात जो गुन्हा दाखल आहे तो अतिशय गंभीर आहे. प्रोसिजरनुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपींना त्वरित अटक व्हायला पाहिजे होती."

"या प्रकरणात सकृतदर्शनी जी माहिती समोर आली होती त्यानुसार लगेचच अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेतला असता तर पुढच्या तपासासाठी त्याचा उपयोग झाला असता. विलंबामुळे आरोपींना पुरावे नष्ट करण्यासाठी संधी मिळते. आरोपीला पोलिसांवर दबाव आणण्याची, आमिषं दाखवण्याची संधी मिळते. या प्रकरणात प्रोसिजरप्रमाणे पोलिसांचे वर्तन दिसत नाही. तसेच भिडेंना अटक झाल्यावर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याची भीतीही पोलिसांनी बाळगण्याची गरज नाही," असं त्यांनी पुढे सांगितलं.

राजकीय दबाव आहे?

राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ यांचं म्हणणं आहे की, "संभाजी भिडेंना अटक होत नाही किंवा त्यांची चौकशी झाली नाही यात आश्चर्याचं काहीच नाही. भिडे हिंदुत्ववादी परिवारातले असल्याने भाजप सरकार त्यांना अटक करणार नाही. भिडेंचा राजकारण्यांवर प्रभाव आहेच आणि तो केवळ भाजपच्या नेत्यांवर नाही तर इतरही पक्षांच्या नेत्यांवर भिडेंचा प्रभाव आहे. त्यामुळे विरोधकांकडून हा मुद्दा प्रकर्षाने लावून धरलेला दिसत नाही. न्यायालयाने जर आदेश दिला तरच भिडेंच्या अटकेची शक्यता आहे."

Image copyright Raju Sanadi
प्रतिमा मथळा संभाजी भिडे अनवाणी चालतात, असं सांगलीतील लोक सांगतात.

भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "संभाजी भिडेंच्या प्रकरणावर सरकार योग्य ती चौकशी करून निर्णय घेईल. हिंदुत्ववादी संघटनेशी संबधित असल्याने कारवाई होत नाही, यात तथ्य नाही. आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईल आणि तथ्य नसेल तर कारवाई होणार नाही."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)