जन्माला आलेल्या कासवांची आई मुंबईकर?

ऑलिव्ह रिडले कासवाचे पिल्लू Image copyright AFROJ SHAH

मुंबईतील वर्सोव्याच्या किनाऱ्यावर गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्लं चालताना दिसली आणि सगळ्यांसाठीच हा कुतूहलाचा विषय ठरला. गेल्या 20 वर्षांत मुंबईच्या किनाऱ्यावर घडलेली ही पहिलीच घटना असल्याचं या निमित्तानं समोर आलं आहे.

वर्सोवा किनाऱ्यावर गुरुवारी जवळपास ८० पिल्लांनी अंड्यातून बाहेर आल्या-आल्या समुद्राकडे धाव घेतली. 'वर्सोवा रेसिडेंट व्हॉलेंटिअर्स' या स्वंयंसेवी संस्थेचे अफ्रोज शाह आणि त्यांचे सहकारी या वेळी तिथे उपस्थित होते. त्यांचे सहकारी आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी समुद्राकडे जाणाऱ्या या कासवाच्या पिल्लांना सुरक्षित समुद्रात पोहोचवण्याची जबाबदारी घेतली.

मुंबईत कासवं आली कुठून?

मुंबईच्या किनाऱ्यावर ही कासवं कशी आली यामागे अनेक तर्क आणि कारणं ऐकवली जात आहेत. मुंबईतील वन अधिकाऱ्यांपासून ते पर्यावरणवादी, प्राणीतज्ज्ञांपर्यंत सगळेच या घटनेमुळे आश्चर्यचकित झाले आहेत. पण, मुंबईच्या सागरी जीवनाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. या कासवांचा मुंबईत जन्म होण्यामागची कारणं अस्पष्ट असल्याने त्यांच्या जन्मामागचं गूढ मात्र कायम राहिलं आहे.

ऑलिव्ह रिडले कासवं ही संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत असल्याने त्यांची काळजी घेण्याविषयीची मागणी आता मुंबईतील वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरणवाद्यांकडून केली जात आहे.

वन्यजीव आणि पर्यावरण तज्ज्ञ आणि स्प्राऊट्स संस्थेचे संचालक आनंद पेंढारकर सांगतात, "या कासवांना हाताळणं किंवा त्यांचा जन्म होण्याच्या जागी माणसांनी गर्दी करणे चूकच आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ या भागाच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. तसंच ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्म होण्याचा हा मोसम असल्याने अन्य ठिकाणीही त्यांची अंडी असण्याची शक्यता नाकारता येत नाही."

किनारे स्वच्छ झाल्यामुळे कासवांचा जन्म?

वर्सोवा किनारा स्वच्छतेची मोहीम स्थानिक नागरिकांनी उभी केली होती. मुंबईतल्या वर्सोवा इथे देखील टनावारी प्लॅस्टीकचा कचरा साठल्याने हा किनारा अस्वच्छ झाला होता. म्हणून वर्सोवा रेसिडेंट व्हॉलेंटिअर्स या संस्थेनं गेल्या १२६ आठवड्यांपासून या किनाऱ्याची शनिवार-रविवार या काळात मुंबई महानगरपालिकेच्या साथीने स्वच्छता केली. त्यानंतर आता हा किनारा स्वच्छ झाला आहे.

या किनाऱ्याची स्वच्छता झाल्यानंतर याठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्म झाल्याने याबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. किनारा स्वच्छतेसाठी पुढाकार घेणारे अफ्रोज शहा याबाबत सांगतात, "हा किनारा गेल्या काही वर्षांपासून अस्वच्छ होता. म्हणून आम्ही स्थानिकांनी हा किनारा स्वच्छ करण्याचा निर्धार केला. किनारा स्वच्छ करणे म्हणजे नुसतं प्लॅस्टिक काढणं नव्हे, तर त्या ठिकाणाचा मूळ आधिवासाचं रूप परत आणणे आणि यात आम्ही यशस्वी झालो. ही कासवं येण्यानं आमचा उद्देश साध्य झाला आहे."

या स्वच्छतेमुळेच कासवं इथे प्रजननासाठी परतल्याचा स्थानिकांचा दावा आहे. पण याला अभ्यासकांनी पूर्ण दुजोरा दिलेला नाही. मुंबईचे मुख्य वन संरक्षक एन. वासुदेवन यांनाही स्वच्छता हेच कारण असेल असं वाटत नाही.

वासुदेवन सांगतात, "ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी घालण्यासाठी मुंबईच्या किनाऱ्याला प्राधान्य द्यावं ही आनंददायी बाब आहे. मात्र, केवळ स्वच्छतेमुळेच या कासवांचा जन्म इथे झाला हे एकच कारण असू शकत नाही. जोपर्यंत या किनाऱ्यावर कासवांचा जन्म होण्याच्या घटनांमध्ये सातत्य निर्माण होणार नाही तोपर्यंत स्वच्छतेमुळेच कासवानं हा किनारा निवडला असं बोलणं धाडसाचं ठरेल."

Image copyright AFROJ SHAH

याबद्दल बोलताना स्प्राऊट्स संस्थेचे संचालक आनंद पेंढारकर सांगतात की, "स्वच्छता हा एकच निकष कासवांच्या जन्मासाठी असू शकणार नाही. मुंबईतला मढचा समुद्र किनारा हा अत्यंत स्वच्छ आणि काहीसा एकाकी किनारा आहे. मात्र, तिथे आजपर्यंत किंवा अन्य किनाऱ्यांवर अशा घटना दिसल्या नाहीत. पण, म्हणून मुंबईतल्या किनाऱ्यांवर अशा घटना घडणार नाहीत असंही नाही. यासाठी या घटनांची रितसर नोंद ठेऊन त्याचा माग ठेवावा लागेल."

डहाणू इथल्या वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनसोबत काम करणारे पशूवैद्य डॉ. दिनेश विन्हेरकर हे सागरी कासवांच्या प्रजातींचे अभ्यासक आहेत. ते सांगतात की, "अलिबागपासून पुढे मुंबई आणि अगदी डहाणूपर्यंत ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माची नोंद झालेली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे जन्मासाठी हेच ठिकाण निवडण्यामागचं नेमकं कारण काय असेल हे आताच सांगणं अवघड आहे."

'मुंबईच्या किनाऱ्यांवर पहारा ठेवणार'

ऑलिव्ह रिडले कासवं ही धोकादायक प्राण्यांच्या यादीत असल्याने त्यांची काळजी घेण्याविषयीचा सूर वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरणवाद्यांकडून उमटत आहे. स्प्राऊट्स संस्थेचे पेंढारकर सांगतात, "या कासवांना हाताळणे किंवा त्यांचा जन्म होण्याच्या जागी माणसांनी गर्दी करणे चूकच आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ या भागाच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. तसेच ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्म होण्याचा हा मोसम असल्याने अन्य ठिकाणीही त्यांची अंडी असण्याची शक्यता नाकारता येत नाही."

तर, याबाबत ऑलिव्ह रिडले कासवांचे अभ्यासक डॉ. विन्हेरकर सांगतात, "मुंबईच्या किनाऱ्यांवर आणि या वर्सोवा किनाऱ्यावर जर प्रखर दिवे असतील तर त्यांना लाल शेड्स लावून त्यांचा प्रकाश मंद होईल याची काळजी घ्यावी. तसेच, जिथे ही अंडी सापडली आहेत त्या परिसराची आणि आजूबाजूच्या परिसरात लक्ष दिले जावे. जेणेकरून अन्य ठिकाणी अंडी असल्यास त्यांची काळजी घेता येईल."

Image copyright AFROJ SHAH

सुरक्षेच्या मुद्द्याबाबत बोलताना मुंबईचे मुख्य वन संरक्षक एन. वासुदेवन सांगतात, "ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्मामुळे हा परिसर संवेदनशील झाला आहे. त्यामुळे आम्ही जवळपास १२ वन कर्मचाऱ्यांची या भागात नियुक्ती केली आहे. ज्यांच्याकडून या परिसराच्या सुरक्षेची आणि पर्यायाने कासवांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. तसेच, मुंबईच्या अन्य किनाऱ्यांवरही आता यादृष्टीकोनातून विशेष लक्ष पुरवले जाईल."

जन्माला आलेल्या कासवांची आई मुंबईकर?

कासवाचा जन्म ज्या किनाऱ्यावर झाला त्याच किनाऱ्यावर ती कासवे कालांतराने अंडी घालण्यासाठी येतात का? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. विन्हेरकर सांगतात, "ही गोष्ट खरी आहे. यापूर्वीच्या निरीक्षणांतून ही बाब सिद्ध झाली आहे की, ज्या ठिकाणी कासवांचा जन्म होतो त्याच ठिकाणी किंवा त्याच भागात ती कासवे अंडी घालण्यासाठी येतात. कारण, ही जन्माला आलेली पिल्ल ही एकप्रकारे पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राशी जोडलेली असतात. त्यामुळे जन्माला आल्यावर त्यांनी जे स्थळ पाहिलं असतं त्याच स्थळी कासवाची मादी अंडी घालण्यासाठी परतते. हे संशोधनाअंती सिद्धही झाले आहे." त्यामुळे या नव्याने जन्माला आलेल्या कासवांच्या मादीचा जन्म मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरात झाल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)