#BBCShe : 'काहींना बलात्काराच्या बातम्यांमध्येच 'रस'!'

मगध महिला विद्यालय

बलात्काराच्या घटनांच्या बातमीदारीवर पाटण्याच्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते बलात्काराच्या बातमीदारीच्या पद्धतीमुळे पीडितेच्या मनावर दडपण येतं.

"बलात्काराची बातमी सतत चालवली जाते. पीडितेला तेच-तेच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तिच्यावर मानसिक दडपण येतं."

"कुटुंबीय तर पोलिसांत तक्रार करायलाही घाबरतात. त्यांना वाटतं तसं केल्यानं मुलीचं नाव मीडियात येईल आणि त्यामुळे कुटुंबाची बदनामी होईल."

"मीडियातली माणसं शेजाऱ्या-पाजाऱ्यांना प्रश्न विचारतात, त्यामुळे मुलीबद्दल अधिक माहिती समोर येते आणि मुलीची ओळख जगजाहीर होते."

पाटणातल्या मगध महिला कॉलेजच्या विद्यार्थीनींनी जेव्हा त्यांच्या मनातलं सांगायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की, आज त्या संपूर्ण नाराजी, सगळे प्रश्न सांगून टाकतील.

एकदम स्पष्टपणे त्या टीका करत होत्या. बलात्कारावराच्या घटनांच्या मीडियातल्या बातमीदारीवर त्या इतक्या नाराज असतील याची काही कल्पना नव्हती.

#BBCShe या सीरिजमध्ये आम्ही देशातल्या 6 शहरांतल्या विद्यार्थीनींना भेटणार आहोत. त्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून त्यावर अधिक बातम्या आणि विश्लेषण करता येईल. या उपक्रमात आम्ही भेट दिलेलं पाटणाहे पहिलं शहर होतं.

मी माईक त्यांच्यासमोर ठेवला तोच त्यांनी बोलण्यासाठी हात उंचावायला सुरुवात केली.

त्यांच्यासोबत बोलताना गेल्या वर्षी वैशाली येथे शाळेच्या हॉस्टेलजवळ मृतावस्थेत सापडलेल्या मुलीचा प्रसंग मला आठवला.

तिचं शरीर वाईट अवस्थेत सापडलं होतं, कपडे फाटलेले होते. बलात्कार पीडितेचं नाव न छापण्याचा कायदा असला तरी मीडियानं तिचं नाव छापलं होतं.

मगध महिला कॉलेजमध्ये बोलणाऱ्या मुलींमध्ये सर्वांत पुढे तीन-चार मैत्रिणी होत्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी कॉलेजमधल्या विशेष कार्यक्रमात भाग घेतला होता.

या कार्यक्रमाच्या आधी त्यांच्याच वयाच्या एका मुलीवर पाटण्यात अॅसिड हल्ला झाला होता.

त्या दिवशी मुलीसोबत तिचे मामा होते. मुलगी आणि मामा यांच्यात वयाचं अंतर फार जास्त नव्हतं. त्यावेळी, मीडियात अॅसिड फेकणाऱ्या मुलाऐवजी मुलगी आणि मामा यांच्या कथित संबंधांचीच अधिक चर्चा झाली.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनींमधील नाराजी याप्रकारच्या बातम्यांच्या विरोधात होती.

"बातम्यांमध्ये जास्त करून मुलींकडेच बोट दाखवलं जातं. तिनं कोणते कपडे घातले होते? कधी बाहेर निघाली होती? कुणासोबत होती इ..."

"असं असेल तर मुली समोर का येतील, त्यापेक्षा त्या गप्पच नाही का राहणार? सलवार-सूट घालणाऱ्या मुलींसोबतही हिंसाचार होतच आहे, कपड्यांनी काही फरक नाही पडत."

यातल्या काही मुलींनी सलवार-सूट घातले होते, काहींनी जीन्स-टॉप परिधान केला होता. बहुतेक जणी पाटण्यातच वाढलेल्या होत्या.

बिहार सरकारच्या विविध योजना आणि शिष्यवृत्ती यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कॉलेज आणि विद्यापीठातल्या विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे.

मगध महिला कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणतात की, "विद्यार्थीनींच्या विचारांना दिशा देणं, अधिकारांची जाणीव करून देणं आणि मोकळेपणानं व्यक्त होण्याची शक्ती देणं यासाठी याप्रकारचं वातावरण आवश्यक आहे."

पण असा बदल मुलांच्या जीवनात येत नाहीये.

बिहारच्या वरिष्ठ महिला पत्रकार रजनी शंकर यांच्या मते, "क्राईम रिपोर्टिंग बहुतांशवेळा पुरुषच करतात. त्यामुळे त्यातल्या काहींचा अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि संवेदनशीलता अपेक्षेपेक्षा कमी असते."

त्यांच्या बोलण्यातल्या 'काहीं'चा या शब्दावरचा भर महत्त्वाचा आहे.

रजनी पुढे म्हणतात की, "काही पुरुष बलात्काराचा रिपोर्ट तयार करताना हिंसेची गरेजपेक्षा जास्त माहिती खोदून काढतात आणि लिहितात. जणू काही त्यांना त्यात रस वाटतोय, रोमांचकारी वाटतं."

दक्षिण आशियाच्या महिला पत्रकारांची संघटना 'साऊथ एशियन वुमेन इन मीडिया'च्या बिहार शाखेच्या अध्यक्ष रजनी शंकर हिंदुस्थान समाचार संस्थेच्या बिहार प्रमुख आहेत.

संस्थेत त्यांनी पुरुष पत्रकारांसोबत कार्यशाळा घेऊन या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

बदल होत नाही, असं नाही. दैनिक भास्करच्या बिहार आवृत्तीचे संपादक प्रमोद मुकेश यांनी विचारपूर्वक त्यांच्या टीममध्ये महिलांची नियुक्ती केली आहे.

त्यांच्या 30 पत्रकारांच्या टीममध्ये 3 महिला पत्रकार आहेत. या तीनही पत्रकार महिलांशी संबंधित विषयांवरच बातमीदारी करतात.

मी त्यांना कॉलेजात झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं आणि विचारलं की, बातमी सांगण्याचं, दाखवण्याचं मीडियाचं काम इतकं असंवेदनशील आहे का की, त्यामुळे तक्रार करण्यापूर्वी मुलींना खूप विचार करायला लागतोय?

मीडियाबद्दलचं असं मत बऱ्याच वर्षांपासून बनलेलं आहे. ते बदलण्यासाठी बराच कालावधी लागेल, असं प्रमोद मुकेश मानतात.

त्यासाठी, पहिला पर्याय म्हणजे पत्रकारांमधलं महिलांचं प्रमाण वाढवणं. तर, पुरुषांची संवेदनशीलता वाढवणं हा दुसरा पर्याय आहे.

कॉलेजातल्या मुलींकडेही यावर काही उपाय आहेत.

"बलात्काराच्या घटनांची बातमी व्हायलाच हवी. पण मुलींविषयी नाही तर मुलांना केंद्रस्थानी ठेवून. प्रश्न मुलांचे कपडे आणि चालण्या-वागण्यावर करायला हवेत."

"बलात्काराचा खटला खूप दिवस चालतो. त्यामुळे अधून-मधून मुलीच्या आई-वडिलांवर बातमी करायला हवी. एखाद्या मुलाला कठोर शिक्षा होत असेल तर ती बातमी नीट दाखवली पाहिजे."

पाटणातल्या या मुलींचं ज्यावर एकमत होतं ते मत माझ्याही मनात पक्कं बसलं.

ते म्हणजे " मनोबल वाढेल अशापद्धतीनं बातम्या करा, भीती निर्माण होईल अशाप्रकारे नव्हे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)