पैशाची गोष्ट : स्टार्ट अप खरंच फायद्याचे आहेत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : पैशाची गोष्ट : स्टार्ट अप खरंच फायद्याचे आहेत का?

मराठी माणूस पांढरपेशा आणि व्यवसायाची जोखीम न घेणारा असा सर्वसाधारण समज आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, गेल्या दहा वर्षांत राज्यात दहा हजारांपेक्षा जास्त नवउद्योजक तयार झाले आहेत.

मधल्या काळात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने ते नाव कमावून आहेत. मेरू, कारवाले, मॅजिकब्रिक्स, ऑनबाईक्स, रेडबस अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गेल्या दशकात युवकांनी स्टार्ट अपच्या माध्यमांतून चांगला पैसा उभा केला आहे.

घरातून उद्योगाची फारशी पार्श्वभूमी नसलेले पण, नवीन कल्पना राबवून त्यातून आर्थिक उलाढाल निर्माण करणारे तरुण आता पुढे येतायत. अशा सेवा किंवा वस्तू पुरवणाऱ्या कंपन्यांनाच मॅनेजमेंटच्या भाषेत स्टार्ट अप असं म्हणतात.

'झाडू मारणारा झाला उद्योजक'

विजय गायकवाड हे यशस्वी स्टार्ट अपचं एक मूर्तीमंत उदाहरण आहे. सातारा गावात 8 हजार रुपयांच्या पगारावर हा माणूस झाडू मारण्याचं काम करत होता.

पुढे त्यांनी कंपनी सुरू केली ती ही झाडू मारण्याची म्हणजेच सफाई कामांची सेवा देणारी. गावातल्या सर्व सफाई कामगारांना एकत्र करून त्यांनी ही सेवा सुरू केली.

आणि आज साताऱ्यापासून मुंबईपर्यंत त्यांची कंपनी सफाई सेवा पुरवते आणि त्यांच्या कंपनीची उलाढाल आहे आठ कोटी रुपयांची.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गायकवाड यांनी सफाई कामगार पुरवणारी सेवा सुरू केली. ( प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबईतले व्हेंचर कॅपिटल उद्योजक आणि गायकवाड यांना आर्थिक पाठबळ देणारे प्रताप काकरिया यांनी गायकवाडांचं उदाहरण विस्तारानं समजावून सांगितलं.

'विजय गायकवाड हे स्टार्ट अपचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. कारण, त्यांनी जी सेवा लोकांना देऊ केली आहे, त्याची लोकांना गरज होती.

ती कल्पना तेव्हा बाजारात नवीन होती आणि कल्पना फक्त मुंबईतच नाही तर देशभर राबवता येईल अशी होती. म्हणजेच धंदा वाढवणं शक्य होतं. याच गोष्टी स्टार्ट अपना तारून नेतात.' काकरिया यांनी स्पष्ट केलं.

आणखी काय लागतं स्टार्ट अपना?

धंदा करण्याची मानसिकता, नेतृत्व गुण, स्वत: सुरुवात करण्याची जोखीम आणि धंदा पुढे नेण्याचं स्वप्न आणि अर्थातच आर्थिक पाठबळ... या गोष्टी असतील तर स्टार्ट अप नक्की यशस्वी होऊ शकतो.

प्रताप काकरिया यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेलं भजी विकण्याचं उदाहरण पुन्हा एकदा दिलं.

"सर्वसामान्यपणे भजी लोकांना आवडतात. त्याचा दर्जा कायम ठेवला तर तुमच्या भजींवर लोक तुटून पडतील. मुख्य म्हणजे भजी विकण्याचा धंदा पुढे जाऊन वाढू शकतो. हे काही निकष आहेत स्टार्ट अपना आर्थिक पाठबळ देणाऱ्या कंपन्यांचे. त्या निकषात भजी विकण्याचा धंदाही चपखल बसतो," असं काकरिया म्हणतात.

'शिकत असताना सुरू होऊ शकतो स्टार्ट अप'

असं म्हणतात आंघोळ करताना आर्किमिडिजला वस्तूमानाचा सिद्धांत सुचला. सांगण्याचा मुद्दा हा की शोध जसा कुठेही, कधीही लागतो स्टार्ट अपची कल्पनाही कधीही सुचते.

यासाठी साहिल वैद्य यांचं उदाहरण घ्या. मुंबई आयआयटीला एनर्जी विषयात बीटेक करत असताना त्यांनी 'द मिनिमलिस्ट' ही डिजिटल ब्रँडिंग कंपनी सुरू केली. सोबतीला त्यांचा चिराग जेंडर हा मित्र होता.

साहिलला लिहायची आवड आणि कल्पकतेचं वरदान तर चिराग तंत्रज्ञान वापरण्यात माहिर. दोघांनी शिक्षण सुरू असताना द मिनिमलिस्ट नावाचं एक फेसबुक पेज सुरू केलं.

अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींवर चित्रात्मक भाष्य करणारं हे पेज होतं. काम असं चोख होतं की वर्षभरात पेजला एका लाखांच्या वर लाईक्स आले. इतकंच नाही तर समोरून डिजिटल ब्रँडिंग आणि ब्रँड पोझिशनिंगच्या ऑफर चालून आल्या.

त्यातून जन्म झाला द मिनिमलिस्ट या कन्सल्टन्सीचा. आज पवईच्या त्यांच्या ऑफिसमध्ये 60 डिजिटल कलाकार काम करतात.

कोक, एअरटेल, आयसीआयसीआय, डान्स विथ माधुरी यासारख्या 200 कंपन्या त्यांच्याकडून ब्रँडिंग करून घेतात. आता कंपनीची उलाढाल कोट्यवधी रुपयात गेली आहे.

हे सगळं शिक्षण सुरू असतानाच. कंपनी स्थापन केल्यानंतरही दोघांनी एमटेक पूर्ण केलं. आयआयटीमध्ये टेडटॉक्ससाठी त्यांना बोलावलं जातं.

चांगल्या कल्पनेला मरण नाही

थोडक्यात काय तर चांगल्या कल्पनेला मरण नाही. पण, ती सुचल्यानंतर तिची किंमत कळणं, मेहनतीने ती पुढे नेणं आणि योग्य टीम तयार करणं याशिवाय ते शक्य नाही.

"आम्हाला जे काम करायचं ते जागतिक दर्जाचं करायचं आहे. ग्लोबल कंपनी तयार करायची आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करतो. दर्जाशी तडजोड नाही. कल्पना सकस असतील याचा विचार करतो, " साहिल वैद्य यांनी कामाची पद्धत सांगितली.

शिवाय हा विश्वासही दिला की कधी कधी बिन भांडवली धंदा सुरू करता येतो.

"आमच्यासाठी समोरून क्लायंट चालून आले. घरबसल्या, घरातून आम्ही व्यवसाय सुरू केला. हे शक्य आहे. पण, त्याचबरोबर प्रचंड मेहनत आणि काम करायचं चांगलंच असं धोरण ठेवलं त्यामुळे सहा वर्षांत आमच्याकडे चांगली जागतिक दर्जाची प्रोडक्ट आहेत," साहिल वैद्य यांनी यशाचं गमक सांगितलं.

गुंतवणूकतज्ज्ञ जयंत विद्वांस यांनी साहिल वैद्य यांचा हा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यांनीही काही वैशिष्ट्य सांगितली.

"तुम्हाला एखादी कल्पना सुचणं आणि त्यातून उद्योग उभा राहू शकेल हे भान येणं आणि त्याप्रमाणे तुम्ही पावलं उचलणं यासाठी हुशारी लागते. ती साहिल आणि त्यांच्या मित्राकडे होती. शिवाय मेहनतीची तयारी होती. तसंच, तुमचं शिक्षण कुठल्याही विषयातलं असलं तरी त्याच क्षेत्रात उद्योग सुरू करायचं असंच काही नसतं, हेही लक्षात घेणायासारखे आहे," असं जयंत विद्वांस यांनी सांगितलं.

त्याचबरोबर हे ही महत्त्वाचं की, जिथे उद्योग सुरू करायचा त्या बाजारपेठेचा चांगला अभ्यास पाहिजे, मागणी आणि आपले संभाव्य ग्राहक यांचा समज पाहिजे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आरोग्य सेवा पुरवणारे स्टार्ट अपदेखील भारतात सुरू झाले आहेत.

याबाबतीत विद्वांस दीपक घैसास या आणखी एका नामांकित मराठी उद्योजकांचं उदाहरण देतात.

दीपक घैसास यांनी जेन्कोवल ही स्टार्ट अप कंपनी सुरू केली. आरोग्य सेवा देणारी ही कंपनी नवीन होती. सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या घैसास यांना हा अनुभव नवीन होता. पण, श्रेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना घेऊन त्यांनी कंपनी सुरू केली. नेतृत्व आणि पुढचा विचार करण्याची क्षमता याच्या जोरावर प्रकल्प यशस्वी केला. घैसास आता नवीन कंपन्यांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचंही काम करतात.

आर्थिक पाठबळ कुठे मिळेल?

अनेकदा सगळं गाडं पैशाच्या मुद्यावर येऊन अडतं. पण, अलीकडे वातावरण सकारात्मक असल्याचं दोन्ही तज्ज्ञ सांगतात. जयंत विद्वांस यांनी सरकारी स्टार्ट अप योजना किंवा बँकांकडून कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे.

तर प्रताप काकरिया हे स्वत: व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत जे अशा नवीन उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवतात.

"तुमचा दृष्टिकोन, तुम्ही देऊ केलेली सेवा किंवा वस्तू, तुमचा भविष्यातला आराखडा, नेतृत्व गुण, त्यात विस्ताराची शक्यता अशा गोष्टी पाहून आम्ही आर्थिक मदत करायची की नाही हे ठरवतो. एकदा मदत करायची ठरली की बिझिनेस प्रपोझल बनवण्यापासून दो-तीन वर्षं कंपनीला सर्व मदत करण्याचं काम आमचं असतं," काकरिया यांनी व्हेंचर कॅपिटल ही संकल्पना समजून सांगितली.

Image copyright Justin Sullivan
प्रतिमा मथळा नवीन उद्योगांना आर्थिक पाठबळ

शिवाय पैसे गोळा करण्याचे आणखी मार्ग सांगितले. एकतर घरातून तुम्ही पैसे घेऊ शकता, काही जणांकडून थोडे थोडे पैसे कर्जाऊ घेऊ शकता, काही जुन्या कंपन्या अलीकडे स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करतात.

त्यांची मदत घेऊ शकता किंवा बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

थोडक्यात मोबाईल आणि तंत्रज्ञानातल्या क्रांतीमुळे उद्योग क्षेत्रातली नवीन कवाडं उघडी झाली आहेत. टॅक्सी आणि मोबाईल पूर्वीपासून होते.

पण, उबेरनं तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहक, मोबाईल आणि टॅक्सी सेवा पुरवठादार अशा तिघांना एकत्र आणलं आणि मोठी कंपनी उभी केली.

तसंच नवनवीन कल्पना राबवून तुम्हीही यशस्वी होऊ शकता.

थोडी जोखीम उचलावी लागेल आणि मेहनत करावी लागेल.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)