#5मोठ्याबातम्या : महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू

प्लॅस्टिक Image copyright curtoicurto

आजच्या दैनिकांतील, वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू

राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारनं शुक्रवारी प्रसिद्ध केली. या संदर्भातील बातमी लोकसत्तानं दिली आहे. दुधासाठीच्या 50 मायक्रॉनपेक्षा जाड प्लॅस्टिकच्या पिशव्यांना वगळले आहे. पण अशा पिशव्यांसाठी ग्राहकांनी 50 पैसे जादा मोजावे लागतील. या पिशव्या दूध विक्रेत्यांनी पुन्हा खरेदी करायच्या असून पिशवी परत दिल्यानंतर ग्राहकाला हे पैसे परत मिळतील. तसेच एक आणि अर्धा लीटरच्या प्लॅस्टिक बाटलीसाठीही अनुक्रमे 1 आणि 2 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. बाटली परत केल्यानंतर ग्राहकाला पैसे परत मिळतील.

यातून औषधांच्या वेष्टनासाठी, वन आणि फलोत्पादन, कृषी, घनकचरा हाताळणी, रोपवाटिका यासाठीच्या प्लॅस्टिकला वगळण्यात आलं आहे.

2. राज्यसभा निवडणूक : भाजपची सरशी

देशातील विविध राज्यांत झालेल्या राज्यसभा निवडणुकांत भाजपची सरशी झाली आहे. यामुळे भाजप राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. टाइम्स ऑफ इंडियानंही बातमी दिली आहे. या निकालानंतर राज्यसभेतील भाजपच्या जागा 58 वरून 69 झाल्या आहेत. तर काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 4 जागांचं नुकसान झालं आहे.

Image copyright Getty Images

भाजपनं उत्तर प्रदेशात 10 पैकी 9 जागा जिंकल्या. तर महाराष्ट्रात 6 पैकी 3 जागा जिंकल्या. राजस्थान 3 जागा जिंकल्याच शिवाय उत्तराखंड आणि हरियाणा इथं काँग्रेसकडून प्रत्येकी 1 जागा भाजपनं हिसकावली आहे. पण भाजपने गुजरातमध्ये 2 जागा गमावल्या.

3. राज ठाकरे यांना गडकरींचे लेखी उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लेखी उत्तर दिले आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात ठाकरे यांनी गडकरी यांच्यावर, साबणाच्या पाण्याचे फुगे सोडल्याप्रमाणे आकडे सोडतात, अशी टीका केली होती.

Image copyright Getty Images/SAJJAD HUSSAIN

त्याला उत्तर देताना गडकरी यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत किती किलोमीटरचे रस्ते झाले, किती निधी मंजूर झाला, बंदर विकासासाठी 70 हजार कोटी आणि सिंचन प्रकल्पांसाठी 75 हजार कोटी मंजूर झाल्याचे या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या संभाव्य आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असणार नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. यवतमाळ इथं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

4. काँग्रेसचे नमो अॅपवर प्रश्नचिन्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगण्यात आलं आहे, यावरून हा वाद सुरू झाल्याचं लोकमतच्या वृत्तात म्हटलं आहे.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक, इमेल अशी माहिती यावरून गोळा करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्या दिव्या स्पंदना रम्या यांनी हे अॅप डिलिट करण्याचं आवाहन केलं आहे.

5. 'आप'च्या आमदारांना दिलासा

लाभाच्या पदावरून आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 'आप'च्या 20 आमदारांचे पद कायम ठेवले असून निवडणूक आयोगाला हा मोठा धक्का मानला जात आहे. द हिंदूने हे वृत्त दिलं आहे.

'आप'च्या 20 आमदारांनी संसदीय सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या मुद्द्यावरून निवडणूक आयोगानं या आमदारांना बडर्तफ करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली होती.

निवडणूक आयोगाचा हा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचं न्यायाधीश संजीव खन्ना आणि चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)