नवरदेवाचा जीव घेणारं 'बाँब पार्सल' कुणी पाठवलं होतं?

सौम्य शेखर आणि रीमा यांचं 18 फेब्रुवारीला लग्न झालं.
प्रतिमा मथळा सौम्य शेखर आणि रीमा यांचं 18 फेब्रुवारीला लग्न झालं.

लग्नाचं गिफ्ट म्हणून आलेल्या पार्सलमध्ये बाँब निघाल्यानं नवरदेवाचा मृत्यू झाला आणि नवऱ्या मुलीला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर महिना उलटूनही पोलीस तपासात प्रगती झालेली नाही. सौतिक बिस्वास यांनी ओडिशाला जाऊन देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा घेतलेला आढावा.

सौम्य शेखर साहू हा 26 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजीनियर आणि 22 वर्षांची त्याची पत्नी रीमा लग्नानंतर पाच दिवसांनी पाटनगडमधल्या त्यांच्या नवीन घरातल्या किचनमध्ये होते. पाटनागड हे ओरिसातलं एक गाव.

दुपारच्या जेवणासाठी ते वांग्याची भाजी आणि मसूरची डाळ बनवण्याचा विचार करत होते. तितक्यात सौम्यला घराच्या दरवाजावर थाप ऐकू आली. घराबाहेर एक व्यक्ती हातात सौम्यच्या नावानं आलेलं पार्सल हातात घेऊन ऊभी होती.

पार्सल बॉक्सच्या स्टिकरवर ते जयपूर इथल्या एस. के. शर्मा यांनी पाठवलेलं आहे असं लिहिलं होतं. जवळपास 230 किलोमीटर अंतरावरून.

सौम्य ते पार्सल किचनमध्ये घेऊन आला आणि त्यामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी ते उघडू लागला. पार्सल हिरव्या रंगाच्या कापडात गुंडाळलेलं होतं आणि त्यातून पांढऱ्या रंगाची दोरी बाहेर आलेली होती. पार्सलमध्ये नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी सौम्यच्या 85 वर्षांच्या आजी जेमामनी त्याच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या, रीमा त्या दिवसाबद्दल सांगतात.

भेटवस्तू

"हे लग्नाचं गिफ्ट असल्यासारखं दिसत आहे," सौम्यनं त्याच्या पत्नीला सांगितलं. "पण ते कुणी पाठवलं आहे हे मला माहिती नाही. कारण जयपूरमध्ये माझ्या परिचयाचं कुणी नाही," तो पुढे म्हणाला.

जसा त्यानं पांढरा धागा ओढला तसा किचनमध्ये स्फोट झाला. तिघंही खाली कोसळले आणि त्यांच्या शरीरातून रक्तस्राव सुरु झाला. स्फोट एवढा जबरदस्त होता की त्यामुळे छतावरचं प्लास्टर खाली पडलं, किचनमधली खिडकी शेजारच्या मोकळ्या जागेत उडून गेली आणि हिरव्या रंगाच्या भिंतींना तडा गेला.

तिघांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या रक्तामुळे घरात रक्त साचलं होतं. जेमामनी साहू यांना आगीनं लपेटलं होतं. "मला वाचवा. मला वाटतं मी मरणार आहे," सौम्य किंचाळत होता.

रीमानं पतीचे ऐकलेले हे शेवटचे शब्द.

प्रतिमा मथळा स्फोटानंतर किचनमधली परिस्थिती.

आगीमुळे तिचा चेहरा आणि हाताला जखमा झाल्या. तिच्या फुफ्फुसांमध्ये आगीचा धूर जमा झाला आणि तिला श्वास घेण्यासाठी धडपडावं लागलं. स्फोटाच्या आवाजानं कानांवर तडाखा बसला. त्यामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे काय? असं विचारत घरात प्रवेश करणाऱ्या शेजाऱ्यांचा आवाज तिला नीटसा ऐकू येत नव्हता. आगीचा धूर डोळ्यांत साचल्यामुळे तिला स्पष्ट दिसत नव्हतं.

असं असतानाही रीमा सरपटतच बेडरूमपर्यंत गेली आणि तिनं सासूला सांगण्यासाठी फोन हातात घेतला. तिच्या सासू एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. त्यावेळी त्या बाहेर गेलेल्या होत्या.

स्फोटानंतरच्या घरातल्या व्हीडिओ फुटेजमध्ये दिसून आलं की, रक्तानं माखलेल्या या तिघांना शेजाऱ्यांनी बेडशीटमध्ये गुंडाळलं आणि अॅम्बुलन्स येण्याची पाट पाहत राहिले. सौम्य शेखर आणि जेमनानी साहू हे दोघं 90 टक्के भाजल्यानं दवाखान्यात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला. रीमा मात्र सध्या सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहे.

महिना उलटून गेल्यानंतर सौम्यचा खून कुणी केला हे अस्पष्ट आहे. "देवावर श्रद्धा असणारा आणि गुरुंना पूजणारा तरुण मुलगा," असं सौम्यचं वर्णन त्याचे नातेवाईक आणि मित्र करतात.

"आम्ही साधं जीवन जगणारी साधी माणसं आहोत. आमचं कुणाशीही वैर नाही. माझ्या मुलीचंही नाही. तसंच जावयाचंही नव्हतं. मला कुणावरही संशय नाही आणि हे कुणी केलं याबद्दल मला काहीही माहिती नाही," रीमाचे वडील सुदाम चरण साहू सांगतात.

दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी त्या दोघांची भेट घालून दिली आणि वर्षभरापासून ती दोघं सोबत होती. रीमाचे वडील हे कापड व्यावसायिक असून त्यांनी रीमाला त्यांच्या मोठ्या भावाकडून दत्तक घेतलं होतं. कारण दोन मुलं असलेल्या सुदाम यांना मुलगी हवी होती आणि त्यांच्या भावाला तिन्ही मुलीच होत्या. सुंदर आणि आनंदी राहणाऱ्या रीमानं स्थानित कॉलेजात उडिया भाषेत पदवीचं शिक्षण पूर्व केलं.

सौम्य शेखरचे आई-वडील दोघंही कॉलेजात शिक्षक होते. त्याचे वडील प्राणीशास्त्र हा विषय शिकवायचे. त्यानं कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करून मसूरी आणि चंदीगड इथं आयटी कंपनीत काम केलं. त्यानंतर मात्र बेंगलुरू इथल्या जपानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसोबत काम करायला सुरुवात केली होती.

प्रतिमा मथळा 800 पेक्षा अधिक लोक रिसेप्शनच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

"लग्नाअगोदर बऱ्याच वेळा ते दोघं कुटुंबीयांसमवेत एकमेकांना भेटले. ते सुखी दाम्पत्य होतं. कुणी त्याला का मारेल?" सौम्यचे वडील रवींद्र कुमार साहू विचारतात.

सौम्य बेंगलुरूमध्ये असताना त्याला आलेला एक फोन मात्र साशंकतेचं वातावरण निर्माण करतो.

"हा फोन मागील वर्षी आला होता," रीमानं मला सांगितलं. "आम्ही फोनवर बोलत असताना कुणाचातरी फोन येतोय असं त्यानं मला सांगितलं. त्यानंतर त्यानं माझा कॉल होल्डवर ठेवला. नंतर त्यानं मला सांगितलं की, मला धमकीचा फोन आला होता. पलीकडून फोनवर बोलणारा माणूस मला लग्न नको करू असं सांगत होता," रीमा पुढे सांगते.

"त्यानंतर त्यानं कधी कोणत्या कॉलचा उल्लेख केला नाही. नंतर आमचं लग्न झालं आणि तो कॉल आमच्या विस्मरणात गेला," रीमा सांगते.

दोन डझन अधिकाऱ्यांनी जवळपास 100 लोकांची चौकशी केली, यात संबंधित कुटुंबीयांचे नातेवाईक आणि मित्रांचा समावेश होता. मृत्यूशी संबंध असलेल्या चार शहरांत ही चौकशी करण्यात आली. दाम्पत्याचे फोन रेकॉर्ड, लॅपटॉप आदी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

119 किलोमीटरवरील कालाहांडी जिल्ह्यातल्या खासगी कॉम्प्युटर संस्थेकडून पार्सल दोन वेळा ट्रेस करण्यात आलं असं सायबर पोलिसांच्या तपासणीत समोर आलं. त्यामुळे पार्सल पाठवणारा ते पोहोचलं की नाही यावर लक्ष ठेवून होता, असा अनुमान काढण्यात आला. पण पार्सल पोहोचलं की नाही हे तपासणारं दुसरं-तिसरं कुणीही नसून कुरीयर कंपनीच होती हे नंतर समोर आलं.

क्रूड बाँब?

चुकीचं नाव आणि पत्त्यानिशी जयपूरमधून पार्सल पाठवण्यात आल्याचं तेवढं पोलिसांना माहिती आहे. पार्सलच्या डिलिव्हरीसाठी 400 रुपये भरणाऱ्या व्यक्तीनं कुरियर कंपनी काळजीपूर्वक निवडली होती. कारण या कंपनीच्या ऑफिसात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते आणि पार्सल स्कॅन करण्यात आलं नव्हतं.

"तीन वेगवेगळ्या बसमध्ये आणि चार माणसांच्या हातातून 650 किलोमीटरचा प्रवास करून अखेर पार्सल 20 फेब्रुवारीला पाटनगड इथं पोहोचलं. पार्सल पोहोचवण्यासाठी आलेला माणूस त्याच दिवशी संध्याकाळी सौम्य शेखर यांच्या घरी आला होता. पण त्याठिकाणी खूप मोठा विवाह समारंभ सुरू असल्याचं त्यानं पाहिलं आणि तो परत गेला," कुरियर कंपनीचे स्थानिक मालक दिलीप कुमार दास सांगतात.

बाँब तांत्रिकरित्या योग्य कसाकाय बनवला गेला याची पडताळणी फॉरेन्सिक तज्ज्ञ करत आहेत. स्फोटानंतर पांढरा धूर निर्माण झाल्यानं पार्सलमध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेला बाँब क्रूड ब्राँब होता का याची तपासणी पोलीस करत आहेत.

प्रतिमा मथळा सौम्य शेखर आणि रीमा यांचा रिसेप्शनचा फोटो.

या घटनेचा ठोस धागा अद्याप हाती न लागल्यानं चौकशी पथक या हल्ल्यामागचे अनेक पैलू तपासून पाहत आहेत.

एकतर्फी प्रेमातून ही घटना घडलेली आहे का? पोलिसांना याबद्दल अजून काहीही हाती लागलेलं नाही. पण लग्नाच्या आठवड्यापूर्वी सौम्य शेखरनं फेसबुक अकाऊंट डिलीट करून नवीन अकाऊंट का ऊघडलं, याची चौकशी पोलीस करत आहेत.

संपत्तीच्या वादातून तर ही हत्या झाली नाही ना? कारण साहु कुटुंबीयांत सौम्य शेखर हा एकमेव मुलगा आणि वारस होता. कोणताही निष्कर्ष काढण्याअगोदर कुटुंबीयांतल्या आणखी काही जणांची चौकशी करणं गरजेचं आहे असं तपासकर्ते सांगतात.

रीमा शाळेत असताना तिचं हाडवैर असलेल्या मुलाचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का? कारण तिला त्या मुलानं त्रास दिला होता आणि रीमाच्या पालकांना याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांना करावी लागली होती. पण याचा या घटनेशी संबंध असल्याची शक्यता खूपच धूसर वाटते. कारण ही घटना सहा वर्षांपूर्वी झाली होती.

तसंच पार्सल पाठवणाऱ्याला स्फोटकं इतक्या सहजतेनं कशी मिळाली आणि सौम्यपर्यंत त्यानं ती इतक्या सहजतेनं कशी पाठवली? हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग होतं का?

"ही अतिशय गुंतागुंतीची केस आहे," असं बालंगीरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शशी भूषण सांगतात. "बाँब बनवण्याच्या कलेमध्ये चांगल्याप्रकारे ज्ञानी असलेल्या व्यक्तीचं हे काम होतं," असं ते पुढे सांगतात.

रीमा सध्या दवाखान्यात आहे. तिचं दु:ख जाहीर झालं ते तिच्या कुटुंबातल्या सदस्यानं तिची शोकांतिका मोबाईलवर रेकॉर्ड केल्यानं. आपला नवरा स्फोटात मारला गेला आहे हे रीमाला तिच्या खोलीतल्या जुन्या वर्तमानपत्रात वाचायला मिळालं आणि त्यानंतर मात्र तिचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये. तिची हीच दयनीय स्थिती फोनवर रेकॉर्ड करण्यात आली.

"तुम्ही माझ्याशी खोटे बोललात. तुम्ही मला खरं सांगितलं नाही," रीमा तिच्या वडिलांवर राग व्यक्त करते. वैयक्तिक दु:खद क्षणाचा हा व्हीडिओ संध्याकाळपर्यंत स्थानिक टीव्हीवर दाखवण्यात आला.

"मला वाटलं होतं यामुळे तरी सरकार तपासात लक्ष घालेल आणि दोषींना लवकरात लवकर पकडेल," रीमाचे वडील सांगतात.

"आम्हाला फक्त एवढंच हवंय," ते पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)