#5मोठ्याबातम्या : अयोध्येत राम मंदिरासाठी आंदोलन नाही - तोगडिया

Image copyright Getty Images

1. अयोध्येत राम मंदिरासाठी आंदोलन नाही : तोगडिया

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आता कुठंलही आंदोलन केलं जाणार नाही, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी जाहीर केली आहे. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे. नागपूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी न्यायालयाचा निर्णयच मान्य होणार असेल तर यापूर्वी आंदोलन का केल, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी आता कुठलंही आंदोलन केलं जाणार नाही, कोणीही कार्यकर्ता पोलिसांची गोळी खाणार नाही, कोणी तुरुंगात जाणार नाही. राम मंदिर बांधण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारची आहे, असं ते म्हणाले आहेत.

2. स्टीव्ह स्मिथच्या जागी रहाणे कर्णधार?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी दरम्यान सलामीवीर कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टनं चेंडूचा पृष्ठभाग घासण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात कर्णधार स्टीव्ह स्मिथवर कारवाई झाली आहे. त्यानंतर आता स्मिथच्या आयपीएलमधल्या स्थानाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. राजस्थान रॉयलच्या कर्णधार पदावरून स्टीव्ह स्मिथला हटवण्यात आलं तर त्याची जागा अजिंक्य रहाणे घेईल, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

3. यंदा सामान्य मॉन्सूनचा अंदाज

यंदा सामान्य मॉन्सून पडण्याची शक्यता आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. हवामान विभागाकडून पावसासंदर्भातला अधिकृत अंदाज येण्यासाठी अजून काही दिवस असले तरी हवामान विभागानं एल निनो आणि सदर्न ऑस्किलेशनवर अहवाल प्रसिद्ध केला आहे.

ऑगस्ट महिन्यापर्यंत एल निनोचा प्रभाव जाणवणार नाही, असं या अहवालात म्हटलं आहे. एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर नकारात्मक परिणाम करतो, असं या वृत्तात म्हटलं आहे.

4. चहाचा भाव ऐकून मी धास्तावलोय : चिदंबरम

चेन्नई विमानतळावर चहा आणि कॉफीचे दर एकूण मला धक्काच बसला, असं वक्तव्य माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

"चेन्नई विमानतळावर मी चहाची ऑर्डर दिली होती. मला गरम पाणी आणि टी बॅग देण्यात आले. त्याची किंमत 135 रुपये होती. मी चहा घेण्यास नकार दिला. मी बरोबर आहे की चूक?" असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

5. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये उष्णतेची लाट

येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 प्रमुख शहरांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे, असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

मुंबईत रविवारी 41 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. यापूर्वी 17 मार्च 2011ला मुंबईत 41.3 इतक तापमान नोंदवलं गेलं होतं. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सर्वसाधारण आहे, पण येत्या काही दिवसांत या भागातही उन्हाचे चटके जाणवू लागतील, असं या वृत्तात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)