सोशल : 'सत्ता मिळवण्यासाठी सगळे अतृप्त आत्मे गोळा झालेत?'

सोशल Image copyright Sharad Badhe/BBC

भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एल्गार मोर्चा आयोजित केला होता.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे मुंबई, पुणे आणि कोकणातले कार्यकर्ते सहभागी झाले, असं संभाजी ब्रिगेडतर्फे सांगण्यात आलं.

तसंच या मोर्चाला मराठा सेवा संघ, लिंगायत समाज या संघटनांनीही पाठिंबा दर्शवला. या निमित्तानं एक वेगळं राजकीय आणि जातीय समीकरण दिसून आलं.

याबाबत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले, "हा सामाजिक विषय आहे. त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न नाही. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्यासाठी काहींनी प्रयत्न केला, पण आम्ही त्याला थारा देणार नाही, आम्ही तेढ निर्माण होऊ देणार नाही."

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना विचारलं होतं की, या एल्गार मोर्चाच्या निमित्ताने अनेक संघटना एकत्र आल्या. याचा राजकीय सामाजिक समीकरणांवर परिणाम होईल का?

वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे देत आहोत.

"हे स्वागतार्ह आहे. सर्व समाजबांधवांनी एकत्र येणं ही काळाची गरज होती आणि ते एकत्र आले," असं म्हटलं आहे आदित्य कांबळे यांनी.

Image copyright Facebook

बाबू डिसूझा म्हणतात, "सामाजिक परिणाम नक्की होईल. राजकीय आश्रित ओळखू येणार."

Image copyright Facebook

"ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय मिळालाच पाहिजे. मात्र सध्याच्या कलुषित घटनांनी आपण आपल्याच मराठा, दलित आणि इतर समाजबांधवांचे शत्रू होत आहोत. एकमेकांच्या मोर्चात सामील होऊन काही फरक पडणार नाही. एकी आतून यायला हवी," असं मत व्यक्त केलं आहे दीपक चौगुले यांनी.

Image copyright Facebook

या सगळ्याने काही फरक पडत नाही, असं चैतन्य देशपांडे यांना वाटतं. "भारतीय जनता सगळं विसरते. 5-6 दिवसात एखादा स्कॅम उघडकीस येईल आणि या प्रकरणावर पडदा पडेल", असं ते लिहितात.

Image copyright Facebook

"सत्ता मिळवण्यासाठी सर्व अतृप्त आत्मे गोळा झाले आहेत?" असा प्रश्न विचारला आहे रंजन राऊळ यांनी.

Image copyright Facebook

अमोल गोरेंनी ट्वीट केलं आहे, "(याचा) कोणताच परिणाम होणार नाही."

राजन लोके लिहितात, "यांना भाजपा नको आहे. खोटं काँग्रेस सरकार हवं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)