स्मिथ आणि वॉर्नरवर वर्षभराची बंदी, IPL ही हातचं गेलं

बॉल टेपरिंग, क्रिकेट ऑस्ट्रेलिया Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर वर्षभराची बंदीची कारवाई करण्यात आली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत बॉल टँपरिंग अर्थात चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली आहे. दरम्यान पिवळ्या टेपसह बॉलची स्थिती बदलवणाऱ्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

हे प्रकरण उघड झाल्यानंतर स्टीव्हन स्मिथनं इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतल्या राजस्थान रॉयल्स तर डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. बीसीसीआयनं या दोघांना आयपीएलच्या अकराव्या हंगामात खेळण्यावर बंदी घातली आहे. बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी यासंदर्भात माहिती दिली.

बॉल टँपरिंगप्रकरणी आयसीसीनं स्टीव्हन स्मिथवर एका कसोटीची बंदी घातली होती. याव्यतिरिक्त त्याच्या मानधनातून 75 टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. बॅनक्रॉफ्टला समज देण्यात आली असून त्याच्या मानधनात कपात करण्यात आली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेपरिंगप्रकरणी सक्त कारवाई केली आहे.

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट या तिघांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. हे तिघं जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाहीत. दरम्यान या तिघांच्या ऐवजी ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ आणि जो बर्न्स यांना संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. संघाच्या कर्णधारपदाची धुरा यष्टीरक्षक फलंदाज टीम पेनकडे असणार आहे.

दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियानं प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना क्लिनचिट दिली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या उर्वरित सामन्यांसाठी लेहमन प्रशिक्षक म्हणून कार्यरत असतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)