#5मोठ्याबातम्या : राज्य सरकार विविध विभागात 72 हजार पदं भरणार

देवेंद्र फडणवीस Image copyright PUNIT PARANJPE/GETTY IMAGES

आजच्या दैनिकांतील, वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. राज्य सरकार येत्या काळात 72 हजार पदं भरणार

राज्य सरकारच्या विविध विभागात दोन वर्षांत 72 हजार पदं भरण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना केली. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

ही पदं दोन टप्प्यात भरण्यात येतील. निम्मी पदं पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित पदं दुसऱ्या टप्प्यात भरली जातील. त्यात कृषी विभागात 2500, पशुसंवर्धनमध्ये 1047, मत्स्यविकास विभागात 90, ग्रामविकासमध्ये 11 हजार, आरोग्य विभागात 10 हजार 568, गृहमध्ये 7111, सार्वजनिक बांधकाम विभागात 8337, जलसंपदा खात्यात 8227, जलसंधारणमध्ये 2423 आणि नगरविकास विभागात 1500 अशी एकूण 36 हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

2. एअर इंडियात सरकारची 76 टक्के निर्गुंतवणूक

'लोकसत्ता'नं दिलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारनं एअर इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनीतून 76 टक्के भागभांडवल विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारचा आता एअर इंडियावरील मालकी हक्क संपून जाईल. केंद्र सरकारनं बुधवारी याबाबत घोषणा केली.

Image copyright MANAN VATSYAYANA/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा एअर इंडिया

नागरी उड्डयण मंत्रालयानं एअर इंडिया आणि त्याच्या दोन सहाय्यक कंपन्यांमधील समभाग खरेदी करण्यात रस दाखवणाऱ्या खासगी कंपन्यांना अर्ज पाठवण्याचं आवाहन केलं आहे. एअर इंडियामधील 76 टक्के भागभांडवल विकल्यानंतर या कंपनीचे सर्व अधिकार संबंधित खासगी कंपनीकडे जातील.

3. ममता यांनी घेतली सोनियांची भेट

भाजपाविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याच्या दृष्टीनं ममता बँनर्जीनं सोनिया गांधीची भेट घेतली. इंडियन एक्सप्रेसनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. या भेटीत त्यांनी युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तसंच भाजप नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे.

त्यांच्याबरोबर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, खासदार अभिषेक बँनर्जी, आणि पश्चिम बंगालमधील मंत्री अरुप बिस्वास यांचा समावेश होता.

4. आधार जोडण्याची मुदत वाढली

लाभार्थी योजनांसाठी आधार कार्ड संलग्न करण्याची मुदत वाढवून 30 जून करण्यात आली आहे. द हिंदूनं हे वृत्त दिलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ही अधिसूचना जारी केली आहे.

Image copyright Ronny Sen

मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांना आधार क्रमांक जोडण्याची मुदत यापूर्वीच अनिश्चित काळासाठी वाढवली आहे.

5. उद्धव ठाकरे दीड तास ताटकळत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांना दीड तास वाट पहावी लागल्याची बातमी 'लोकमत'नं दिली आहे. मुख्यमंत्री विधानसभेच्या कामकाजात असल्यानं ही भेट होऊ शकली नाही. शेवटी उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले.

शिवसेनेच्या आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यासंदर्भात ही भेट नियोजित होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

Image copyright Twitter

दरम्यान, लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार भाजप सरकारच्या काळात डाळ खरेदीत गोंधळ झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी ठेवला आहे.

सहकार, नगरविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम खात्यांसह झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील अनियमिततेवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)