#BBCShe : सावळ्या महिलांच्या राज्यात गोऱ्या हिरॉईन का?

  • दिव्या आर्य
  • बीबीसी प्रतिनिधी

मी जेव्हा कोईम्बतूरच्या रस्त्यावरून जात होते तेव्हा मला दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या. सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या स्त्रिया रस्त्यावरून जात होत्या आणि जाहिरातीच्या फलकांवर मात्र होत्या गोऱ्यापान मुली.

ज्या राज्यात सावळ्या रंगांचं प्राबल्य आहे, तिथं जाहिरातीचे फलक मात्र दुसऱ्याच प्रदेशातून आले होते.

गोंधळून गेलेली मी फक्त एकटीच तिथं नव्हते. मी जेव्हा अविंशिंलिंगम विद्यापीठातल्या मुलींना BBC She या प्रकल्पाच्या निमित्तानं भेटले तेव्हा त्यांनी सुद्धा माझ्या भावनांना दुजोरा दिला.

रंग असावा गोरा

"ज्या स्त्रिया आपण जाहिरातीत बघतो, मला वाटतं प्रत्येकच स्त्री तशी नसते. प्रत्येकच स्त्री गोरीपान, लांब केस असलेली आणि सडपातळ बांध्याची असेलच अशी अपेक्षा आपण करू शकत नाही."

या वाक्याला प्रेक्षक म्हणून बसलेल्या 70 मुलींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यापैकी बहुतांश मुली सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या होत्या.

सडपातळ बांध्याचं सगळीकडे कौतूक होत असतं. पण या भागात एका विशिष्ट रंगाचं प्राबल्य आहे, तिथं दुसऱ्या रंगाच्या स्त्रियांनी उत्पादनं का विकावी?

हे फक्त जाहिरातींच्या होर्डिंग पुरतं मर्यादित नाही, टीव्हीवरील जाहिरातींची सुद्धा तशीच स्थिती आहे. कल्याण ज्वेलर्सच्या या जाहिरातीत गोरी गोमटी बाईच मॉडेल म्हणून घेतली आहे.

एका विद्यार्थिनीनं हीच परंपरा कॉलिवूडमध्ये असल्याचंही सांगितलं. तामिळ अभिनेत्री असं गुगलवर शोधलं तर असे फोटो दिसतात.

काजल अगरवाल आणि सिमरन पंजाबी आहेत, तमन्ना आणि हंसिका मोटवानी महाराष्ट्रातल्या आहे, अनुष्का शेट्टी कर्नाटकातली आहे, तर स्नेहा ची मातृभाषा तेलुगू आहे आणि असिन मुळची केरळची आहे हे उल्लेखनीय.

दहापैकी तीन म्हणजे त्रिशा कृष्णन, समान्था अक्कीनेनी आणि श्रुती हसन या तिघीजणी तामिळनाडूच्या आहेत. गोरा रंग हा त्यांच्यातला समान दुवा आहे.

सावळ्या हिरोंना पाहिजे गोरी हिरोईन

पण गंमत म्हणजे धनुष, विशाल, विजय सेतुपथी, विजयकांत आणि सुपरस्टार रजनीकांत हे सावळ्या वर्णाचे आहेत. पण या लोकांच्या सिनेमांमधील गोऱ्या रंगाच्या अभिनेत्री तामिळी प्रेक्षकांना स्वीकारार्ह आहेत.

काही चित्रपटांत या गोऱ्या रंगाच्या अभिनेत्रींना सावळा हिरो हवा असं दाखवण्यात आलं आहे.

अनेकांना ही चर्चा व्यर्थ वाटेल. कारण जाहिराती आणि चित्रपटांत सगळं आभासी जग असतं. ते काय दाखवतात इतकंच लोक बघतात.

पण या महाविद्यालयातल्या स्त्रियांनी गोऱ्या रंगाच्या अट्टाहासाचा त्यांच्यावर काय परिणाम झाला याबद्दलचे अनुभव शेअर केले.

त्यात शाळा आणि महाविद्यालयात भेदभाव, पालक, मित्रमैत्रिणींचा दबाव अशा अनेक घटकांचा समावेश होता.

फेअर म्हणजेच लवली असा एक साचेबद्धपणा पुढे नेण्यासाठी सुपरस्टार शाहरुख खान जेव्हा सरसावला तेव्हा तर मामला आणखीनच बिकट झाला. 2013 साली त्यानं एक फेअरनेस क्रीमची जाहिरात केली होती. ( खरंतर ती पुरुषांसाठी होती.)

ही जाहिरात त्यांच्या एका चित्रपटाच्या आधी दाखवण्यात आली होती. त्यात एका तरुण मुलाची कथा होती. थोड्या सावळ्या वर्णाच्या त्याच्या चाहत्याची ती कथा होती. फेअरनेस क्रीममुळे त्याला कसं यश मिळालं हे रंगवून सांगण्यात आलं. या उत्पादनाला ग्राहकांनी उचलून धरलं.

गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये नंदिता दाससारख्या लोकांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे. त्या Dark is beautiful च्या ब्रँड अँबेसेडर आहेत. 2017 मध्ये मिसेस इंडिया अर्थच्या उपविजेत्या आणि कोईम्बतूरच्या राहिवासी गायत्री नटराजन यांनी सुद्धा सावळ्या वर्णावरून होणाऱ्या भेदभावाविरुद्ध आवाज उठवला होता.

जाहिरातदार नेहमीच गोऱ्या रंगाच्या मुली मॉडेल म्हणून घेण्याचं समर्थन करतात. त्याला सामान्य जनतेचं समर्थन आहे असं कारण ते देतात.

चेहऱ्याची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये 50 टक्के वाटा हा फेअरनेस क्रीमचा आहे.

जाहिरात आणि सिनेमांची निर्मिती करणारे कॉलेजमधल्या या मुलींचं हे म्हणणं ऐकणार आहेत का?

फक्त मुलींना काय पाहिजे हे समजून घेण्यासाठी नाही तर त्यांची विकण्याची स्टाईल सुद्धा स्टिरिओटाईप आहे.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)