पाहा व्हीडिओ : महाराष्ट्रात गुड फ्रायडेला चर्चमध्ये होतं उपनिषदाचं वाचन

  • संकेत सबनीस, राहुल रणसुभे
  • बीबीसी मराठी
व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : गुड फ्रायडेला चर्चमध्ये होतं संस्कृतमधल्या उपनिषदाचं वाचन

गुड फ्रायडे आणि त्यानंतर येणारा इस्टर संडे हे ख्रिश्चन धर्मीयांचे महत्त्वाचे सण. या काळात प्रार्थनेला ख्रिश्चन धर्मीयांमध्ये महत्त्व असतं. पण, हल्ली देशातल्या काही चर्चमध्ये या प्रार्थनेसोबतच मूळ संस्कृत भाषेत असलेल्या नारायण उपनिषदाचंही वाचन केलं जातं.

ख्रिश्चन धर्मीय येशू ख्रिस्तांच्या मृत्यूच्या दिवसाला गुड फ्रायडे मानतात, तर त्यानंतर येणाऱ्या रविवारी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं म्हणून इस्टर संडे साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मातल्या काही महत्त्वाच्या सणांपैकी हे सण असून त्यांना आध्यात्मिक महत्त्व आहे.

ख्रिश्चन धर्मीयांच्या या सणामध्ये मात्र धार्मिक सलोख्याच्या निमित्तानं होणारा एक वेगळा उपक्रम आयोजित केला जात आहे.

महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक या राज्यांमधल्या काही चर्चमध्ये या दिवशी ख्रिश्चन धर्मातील प्रार्थनांच्या बरोबरीनं संस्कृत भाषेतील नारायण उपनिषदाचं वाचन होताना पाहायला मिळत आहे.

भेद मिटवण्यासाठी...

पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराचे सदस्य असलेले हिंदू धर्मीय नागरिक गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या नारायण उपनिषदाचं वाचन करतात. हिंदू धर्मीयांकडून केल्या जाणाऱ्या उपनिषदातील श्लोकांच्या वाचनामुळे दोन धर्मांतील अनोखा सलोखा यावेळी दिसत असल्याचे ख्रिश्चन धर्मगुरू सांगतात.

फोटो कॅप्शन,

स्वाध्याय परिवाराचे सदस्य कर्जत इथल्या चर्चमध्ये गुड फ्रायडेच्या दिवशी नारायण उपनिषदाचं वाचन करताना.

या उपक्रमाबद्दल माहिती देताना स्वाध्याय परिवाराचे प्रतिनिधी आमोद दातार सांगतात, "1991 साली पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्वतः या उपक्रमाची सुरुवात केली. गुड फ्रायडे हा तसा ख्रिश्चन धर्मीयांसाठी दुःखाचा प्रसंग. अशावेळी त्यांच्या दुःखात एकप्रकारे सहभागी होण्यासाठी आम्ही चर्चमध्ये जातो. तसंच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, दोन धर्मांतले भेद मिटवण्यासाठी भक्तीचा आधार घेतला पाहिजे असं आम्ही मानतो."

ते पुढे सांगतात, "नारायण उपनिषदांमधून विश्वशांतीचा संदेश दिला असल्यानं आम्ही त्याचं वाचन चर्चमध्ये करतो. तैतिरिय अरण्यकामधला 10वा प्रपाठ हा नारायण उपनिषदाचा असून ते संस्कृत भाषेमध्ये लिहिलं गेलं आहे. याला ख्रिश्चन धर्मीयांकडून कोणतीही हरकत घेतली जात नाही. उलट त्यांचं सहकार्यच असतं."

दातार पुढे या नारायण उपनिषदातला पहिला मंत्र सांगतात, "सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशंभुवम् । विश्वं नारायणं देवम् अक्षरं परमं पदम्।।, विश्वतः परमान्नित्यं विश्वं नारायणं हरिम् । विश्वमेवेदं पुरुषस्तद्विश्वमुपजीवति।।

तर, याचा अर्थ असा होतो की, हजारो मस्तकवान्, अनंत डोळ्यांच्या, विश्वकल्याण करणाऱ्या देवाला (तसेच) सर्वव्यापक, पाण्याचा आश्रय घेणाऱ्या (पंचमहाभूतात राहणाऱ्या) नित्य, श्रेष्ठ, ज्ञानी भक्ताला प्राप्य, अशा नारायणाचं ध्यान केलं पाहिजे. जगाहून श्रेष्ठ असा नित्यस्वरूप, सर्वस्वरूप नारायण पाप व अज्ञान नाश करणारा आहे. हा दृश्यमान विश्वपुरुष परमात्मस्वरूपच आहे. हा परमात्मा विश्वस्वरूप असूनही स्वतःच्या व्यवहारासाठी जगाचा आश्रय घेतो. अशा परमात्म्याचे ध्यान केलं पाहिजे. या मंत्रानेच चर्चमध्ये वाचनाला सुरुवात होते.

दुरावा टाळण्यासाठी...

या उपक्रमाबद्दल ख्रिस्त धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी बीबीसीकडे आपलं मत व्यक्त केलं. दिब्रेटो सांगतात, "भारत हा बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक देश आहे. प्रत्येकाची उपासना करण्याची, प्रार्थना करण्याची पद्धत निराळी आहे आणि हे या विविधतेचं सौंदर्य आहे. पण, या वैविध्यामुळे दोन भिन्न धर्मीयांमध्ये दुरावा येता कामा नये."

दिब्रेटो पुढे सांगतात, "त्यामुळे एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं हे महत्त्वाचं असल्याचं आम्ही मानतो. यातून स्नेहभाव वाढीस लागतो आणि सलोख्याचं वातावरण तयार होतं. त्यामुळे आम्ही स्वाध्याय परिवाराच्या या उपक्रमाचं स्वागत करतो. गुड फ्रायडेच्या दिवशी ते चर्चमध्ये येतात तर, दिवाळीत आम्ही त्यांच्याकडे जातो."

यंदा 30 मार्चला आलेल्या गुड फ्रायडेला महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या चर्चमध्ये हा कार्यक्रम झाला. यात रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथल्या अवर लेडी ऑफ फातिमा या चर्चमध्ये हा कार्यक्रम झाला. गुड फ्रायडेच्या सोहळ्यासाठी या चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मीय नागरिक जमले होते. त्यांच्याबरोबरीनं स्वाध्याय परिवाराचे हिंदू धर्मीय नागरिकही सहभागी झाले होते.

चर्चमधल्या प्रार्थना झाल्यावर स्वाध्याय परिवाराच्या सदस्यांनी इथे नारायण उपनिषदाचं वाचन केलं. यावेळी उपस्थित असलेले चर्चचे फादर कॅलिस्टस फर्नांडीस सांगतात, "2010पासून स्वाध्याय परिवाराचे सदस्य या नारायण उपनिषदाचं वाचन करण्यासाठी चर्चमध्ये येतात. आम्ही त्यांचं मोठ्या अंतःकरणानं स्वागत करतो. त्यांच्या या वाचनाला चर्चमध्ये आलेल्या ख्रिश्चन नागरिकांचा कोणताही विरोध नसतो. उलट त्यांना याचा आनंदच होतो. भारतीय परंपरेनुसार त्यांनी केलेल्या प्रार्थनेचं स्वागतच केलं जातं."

आमोद दातार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016मध्ये महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात मिळून 98 चर्चमध्ये तर, 2017मध्ये याच राज्यांमधल्या 114 चर्चमध्ये गुड फ्रायडेच्या दिवशी नारायण उपनिषदाचं वाचन करण्यात आलं. यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदाबाद, राजकोट, बडोदा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं हा उपक्रम होतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)