दृष्टिकोन : राहुल गांधी यांचे तरुण तुर्क येत आहेत पण ज्येष्ठांचं काय?

  • रशीद किडवई
  • ज्येष्ठ पत्रकार
राहुल गांधी

राहुल गांधी यांनी 16 डिसेंबर रोजी औपचारिकदृष्ट्या पक्षाचं नेतृत्व हाती घेतलं तेव्हा त्यांच्याकडून या पक्षात मोठे बदल होतील अशी अपेक्षा ठेवली जात होती.

या अपेक्षांवर काम करण्याऐवजी, नव्या टीमला प्रोत्साहन देण्याची त्यांची गती मंदावलेली दिसते आहे.

राहुल गांधी तरुण आहेत पण कामातील तीव्रता दाखवण्याऐवजी ते पारंपरिक पद्धतीने निर्णय घेताना दिसत आहे. राहुल गांधी यांच्या कामाच्या पद्धतीनं असा संकेत मिळत आहे की ते पक्षातील त्या जुन्या पिढीला कायम ठेवतील आणि नव्या पिढीला मात्र नेतृत्वाची संधी दाखवण्यासाठी ताटकळत बसावं लागणार आहे.

अशोक गेहलोत यांना त्यांनी संघटन आणि प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस बनवलं आहे. हा त्यांचा निर्णय अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. हे मोठं पद आहे. संघटन प्रभारी सरचिटणीस, काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव आणि कोषाध्यक्ष ही तीन पदं काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण आहेत.

फोटो कॅप्शन,

अशोक गेहलोत यांच्यासोबत राहुल गांधी

त्यांनी ही निवड करून जनार्दन द्विवेदींसाठी पुढचा मार्ग बंद केला. गहलोत यांची निवड राजस्थानच्या रणभूमीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. तिथं आता प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट यांच्या हातात राज्याच्या काँग्रेसची सूत्रं आहेत.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना शह देण्यासाठी काँग्रेस सचिन पायलट यांना पुढं करू शकतं आणि जर काँग्रेसनं सत्ता पालटवली, तर तिथं पायलट काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बनलेले दिसतील.

फोटो कॅप्शन,

सचिन पायलट

अशोक गेहलोत यांची निवड काँग्रेसमधल्या जुन्या पिढीला सकारात्मक संदेश देणारी आहे. तर, राजीव सातव आणि जितेंद्र सिंह यांची गुजरात आणि ओडिशाच्या प्रभारीपदी केलेली निवड पक्षातील नव्या नेतृत्वाला दिलासा देणारी आहे. त्यांची निवड करून गांधी यांनी संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर, गुजरातचे विरोधी पक्षनेते परेश धनानी आणि प्रदेश अध्यक्ष अमित चावडा हे चाळिशीतले आहेत.

चावडा हे काँग्रेसचे सर्वांत तरुण प्रदेशाध्यक्ष आहेत, ओबीसी नेते आहेत. तरुण नेतृत्वाला पुढं आणून पक्षात ऊर्जा भरण्याचं काम करून राहुल यांनी भरत सोलंकी गटाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. कारण चावडा हे सोलंकी यांचे नातेवाईक आहेत.

फोटो कॅप्शन,

मोतीलाल व्होरा हे सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.

एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की राहुल गांधी, मोतीलाल व्होरा यांना कोषाध्यक्ष पदावर राहू देतात की नाही याबाबत चर्चा आहे. 80 वर्षांचे व्होरा हे सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. असंही होऊ शकतं की, मोतीलाल व्होरा यांचं पद कायम ठेवलं जाईल, पण त्यांच्यासोबत कामकाज कनिष्क सिंह पाहतील.

गेल्या काही वर्षांपासून कनिष्क सिंह हे व्होरा यांच्या सोबत काम करत आहेतच. त्यांना या पदासाठी तयार केलं जात आहे, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे.

फोटो कॅप्शन,

पटेल यांना गांधी कटुंबानंतर काँग्रेसमधला सर्वांत शक्तिशाली नेता समजलं जातं.

तसंच, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना कोणतं पद दिलं जाईल? पटेल यांना गांधी कटुंबानंतरचा काँग्रेसमधला सर्वांत शक्तिशाली नेता समजलं जातं. गांधी हे पटेल यांच्या अनुभवाचा फायदा आघाडीतील इतर पक्षाच्या नेत्यांशी जवळीक साधण्यासाठी करून घेऊ शकतात.

देशात एकूण 20हून असे पक्ष आहेत जे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक मोठी आघाडी उभारण्यासाठी इच्छुक आहेत. जागावाटपासाठी ज्या क्लिष्ट वाटाघाटी होतात, त्यात पटेल यांचा अनुभव कामाला येऊ शकतो.

किंवा असं होऊ शकतं का? राहुल गांधी हे राजकीय सचिव हे पद रद्द करतील!

जर राजू आणि अजय माकन यांची वर्णी काँग्रेस अध्यक्ष कार्यालयात लावू शकले तर ते राजकीय सचिव हे पद आरामात रद्द करू शकतात.

राहुल गांधी यांच्यासमोरचं आव्हान कठीण आहे. त्यासाठी त्यांना कठोर निर्णय आणि वेगवेगळ्या स्तरावर रणनीती आखण्याची गरज आहे. त्यामध्ये व्यावसायिकता आणण्याची आवश्यकता आहे. पण प्रश्न असा आहे की, राहुल यांच्याहून अधिक काँग्रेसची मानसिक तयारी दिसत नाहीये.

राहुल यांना आता कार्यकारी समिती तयार करायची आहे. त्यांच्याकडे याचे पूर्णाधिकार 17-18 मार्चला आले आहेत. 1991 नंतर काँग्रेस संसदीय बोर्डाच्या निर्मितीबाबत काँग्रेस अध्यक्ष मौन बाळगून आहेत. काँग्रेसच्या घटनेनुसार काँग्रेस अध्यक्षानंतर दहा सदस्यांच्या काँग्रेस संसदीय बोर्डाचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो.

विधानसभा आणि संसदेसाठी उमेदवारांची निवड, मुख्यमंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी या बोर्डाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असं पक्षाच्या घटनेत म्हटलं आहे. काँग्रेस कार्यकारी मंडळाकडे हे अधिकार त्या प्रमाणात नाहीत.

बदल आवश्यक

काँग्रेस संसदीय बोर्ड झालं तर त्यात मनमोहन सिंग, अहमद पटेल, अंबिका सोनी, दिग्विजय सिंह, ऑस्कर फर्नांडिस, मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे आणि ए. के. अॅंटनी यांच्यासारखे मोठे नेते असतील.

राहुल गांधी यांनी पक्षात प्रत्येक स्तरावर नेतृत्व उभं करून जबाबदारी हाती देण्यास पुढाकार घ्यावा. सोनिया गांधी यांच्या काळात 'सब चलता है' असा दृष्टिकोन ठेवण्यात आला होता, पण राहुल यांना तसं वागता येणार नाही.

काही गोष्टींना राहुल गांधी यांना आव्हान द्यावं लागणार आहे. प्रोत्साहन देऊन युवकांकडून काम करून घेणं तसंच अस्मितेचं राजकारण आणि हुजरेगिरीला कमी महत्त्व देणं ही राहुल यांच्या राजकारणाची वैशिष्ट्यं आहेत. या गोष्टीसाठी त्यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध होऊ शकतो त्याचा सामना त्यांना करावा लागू शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)