पश्चिम बंगाल ग्राउंड रिपोर्ट : दंगलीनंतर काय भावना आहेत हिंदू-मुस्लिमांच्या?

  • दिलनवाज पाशा
  • बीबीसी प्रतिनिधी, आसनसोलहून
फोटो कॅप्शन,

शायर रौनक नईम यांचे पुत्र

"माझं सगळं जळालं, माझ्या घरात मीच एकटा कमवत होतो आता मी काय करणार?" हे बोलत असतानाच रामचंद्र पंडित यांच्या डोळ्यातून अश्रूचे ओघळ वाहत गालावर आले आणि कंठ दाटून आला.

त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत तिथं सद्दाम आले आणि म्हणाले, "त्यांच्या घरात हेच एकटे काम करत होते. त्यांच्यावरच त्यांचं कुटुंब अवलंबून होतं. जेव्हा पासून त्यांचं दुकान जळालं तेव्हापासून ते दिवसभर रडत असतात. नुसतं डोक्याला हात लावून इकडं तिकडं बसून राहतात."

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यापासून 200 किमी अंतरावर राणीगंज आहे. या भागात भगवा फडकताना दिसत आहे. रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी लावण्यात येणाऱ्या भगव्या झेंड्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

तणावग्रस्त शहर

प्रथमदर्शनी असं वाटतं, इथं सर्व काही सामान्य आहे. पण पोलिसांचा बंदोबस्त पाहिला की परिस्थिती लक्षात येते. घरांवर, रस्त्यांवर आणि चौकाचौकात भगवे झेंडे फडकत आहेत, असं वाटतं पूर्ण गाव रामनवमीच्या उत्सवात रंगलं आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की हे शहर तणावात आहे.

रामनवमीच्या उत्सवावेळी झालेल्या दंगलीमुळे शहराला गालबोट लागलं आहे. मिरवणुकीच्या वेळी झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर भांडणात झालं आणि त्यानंतर दंगल भडकली.

26 मार्चला झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीत बरीच दुकानं पेटवली गेली. रामचंद्र पंडित यांचं दुकान त्यापैकी एक होतं. सद्दाम यांचं दुकानही दंगलीत जळालं. पण त्यांना स्वतःच्या दुकानापेक्षा पंडित यांच्या दुकानाची चिंता आहे.

फोटो कॅप्शन,

रामचंद्र पंडित

जेव्हा मी हटिया बाजारातील जळालेल्या दुकानांचे फोटो काढत होतो तेव्हा मला सद्दाम यांनी पंडित यांच्या दुकानावर नेलं.

कोण करणार मदत?

पंडित यांच्या दुकानाच्या बाजूलाच भगवान दास यांचं दुकान आहे. दंगलीआधी त्यांचं दुकान हटिया बाजाराची शान म्हणून ओळखलं जात असे. त्यांनी दुकानाचं नूतनीकरण केलं होतं आणि लाखो रुपयांचा माल देखील भरला होता. पण आता तिथं, जळालेलं फर्नीचर आणि बेचिराख झालेल्या उमेदीशिवाय काही नाही.

"माझा तर कणाच मोडला असं वाटतंय, परत हे सर्व उभं करायला सहा-सात वर्षं लागतील. कोण मदत करेल आता माझी, देईल का सरकार पैसे? मजा लुटणाऱ्यांनी मजा केली. दुकानदार फसले, आम्ही तर दंगली केल्या नाही पण आमची दुकानं मात्र जळाली," भगवानदास सांगतात.

फोटो कॅप्शन,

भगवानदास यांचं दुकान जळून खाक झालं.

जेव्हा भगवानदास आपली व्यथा सांगत होते तेव्हा त्यांच्या बाजूला उभे असलेल्या नदीम यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्यांचं शंभर वर्षं जुनं असलेली पिढीजात दुकान दंगलीच्या आगीत होरपळलं होतं.

नदीम सांगतात, "पूर्ण दुकान जळालं, काही नाही उरलं, सगळं भस्म झालं, दोन दिवस झाले राख सावडतोय, पाहताय ना, माझे हात काळे पडले."

सर्वांत जास्त नुकसान

राणीगंजचे शायर रौनक नईम यांच्या दोन मुलांची दुकानं देखील जाळण्यात आली. त्यांचे पुत्र सांगतात, "माझं दुकान रौनक वॉच आणि माझ्या भावाचं दुकान रौनक कलेक्शन जाळलं गेलं. आम्ही कधी कोणा हिंदू भावाचं नुकसान नाही केलं पण आमच्यासोबत असं झालं. फक्त मुस्लिमांचंच नाही तर हिंदूंचंही नुकसान झालं आहे."

हटिया बाजारातील मोठी दुकानं जळाली पण सर्वाधिक नुकसान छोट्या व्यावसायिकांचं झालं. हे छोटे दुकानदार रस्त्याच्या बाजूला आपलं दुकान थाटत असत. सर्वांत जास्त नुकसान यांचंच झालं आहे.

रस्त्यालगत दुकान लावणारे युवक सांगतात, "आम्ही रोज 100-200 रुपये कमवत असू. आमची पोरं-बाळं त्यावरच जगत असत. जर आमच्या पोटावरच लाथ माराल तर आम्ही खावं काय? कुठं जाणार आम्ही?"

त्याचं बोलणं संपत नाही तोवर तिथं विनोद कुमार आले आणि म्हणाले, जर याच्या ताटात अन्न नाही पडलं तर माझ्या ताटात कुठून पडणार. याचं दुकान बंद झालं म्हणून आम्हीही दुकान बंद केलं.

'पाण्यापासून पाणी कधीच वेगळं करता येत नाही.'

सद्दाम हुसैन यांनी विनोद कुमार यांना छातीशी धरून सांत्वन केलं.

विनोद सांगतात, "आम्ही भाऊ भाऊ आहोत. वेगळे नाहीत, मेहनत करून आम्ही आमचं पोट भरतो, कुणी फूस लावली म्हणून त्यांच्या म्हणण्यासारखं वागणार नाहीत. काही जणांवर त्याचा परिणाम झाला पण आमच्यावर झाला नाही. त्यांना एकेदिवशी त्यांची चूक लक्षात येईल. त्यांना कळेल की कितीही प्रयत्न केले तरी पाण्यापासून पाणी कधीच वेगळं करता येत नाही."

हटिया बाजारापासून दूर एका दुसऱ्या भागात मजार रोडवर राणीगंजचे मोठे व्यापारी विनोद सर्राफ यांचं ठोक मालाचं दुकान आहे. त्या दिवशी त्यांचं दुकानही लुटलं गेलं.

फोटो कॅप्शन,

हटिया बाजारातील एक दुकान

सर्राफ सांगतात, "मी गच्चीवरून पाहत होतो, शेकडो लोक आले, त्यांच्या हातात लोखंडाचे पाइप होते, मी सतत पोलिसांना फोन लावत होतो. मी पोलीस स्टेशनवरही गेलो. पण काही मदत मिळाली नाही. शेजारी माझ्या चुलतभावाचं दुकान आहे. ते पण जळालं, मी अग्निशमन दलाला फोन केला तर ते म्हणाले आमच्याकडे बंब नाही."

पुढं ते सांगतात, "जे झालं त्यात दोन्ही समुदायांची चुकी आहे. जेव्हा हे माहीतच होतं की तणाव होऊ शकतो तर मिरवणूक मशिदीसमोरून का नेण्यात आली. त्याची काय गरज होती?"

अचानक दगडफेक सुरू झाली

सर्राफ यांचं चार-पाच लाखांचं नुकसान झालं आहे पण त्यांना काळजी वाटते ती छोट्या दुकानदारांची. ते म्हणतात, "मी तर हे नुकसान सहन करू शकतो. पण त्या छोट्या दुकानदारांचं काय? जे आर्थिक नुकसान झालं त्याची भरपाई एकवेळ होऊ शकते पण भावा-भावात जे अंतर तयार झालं ते कसं भरून निघणार."

स्थानिक नगरसेवक आरिज जलीस सांगतात, "मी त्या भागात सकाळपासून होतो. मिरवणुकीचा एक भाग शांतपणे निघून गेला. पण नंतर आलेल्या लोकांनी घोषणाबाजी आणि गाणे लावले गेले. त्याला विरोध झाला. ही घोषणाबाजी थेट दुसऱ्या धर्माविरोधात होती. त्या विरोधातच अचानकपणे दगडफेक सुरू झाली. त्यानंतर सर्व शहर पेटलं."

...त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली

जलीस सांगतात, त्या ठिकाणी जे समजूतदार लोक होते त्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना येण्यासाठी दीड-दोन तासांचा उशीर झाला. ही गोष्ट शहरात पसरली.

"जर पोलीस वेळेवर आले असते तर परिस्थिती नियंत्रणात आली असती. राणीगंजला हा दिवस पाहावा लागला नसता."

स्थानिक पत्रकार विमल देव गुप्ता यांनी तीन दशकांहून अधिक काळ राणीगंज आणि आजूबाजूच्या परिसराचं वृत्तांकन केलं आहे.

ते सांगतात, "असं पहिल्यांदा झालं आहे, की मी माझ्या वृत्तात धार्मिक तणाव किंवा दंगल हा शब्द वापरला आहे. राणीगंजमध्ये पहिल्यांदा मी असं वातावरण पाहिलं आहे. जेव्हापासून मी पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत मला असं कधीच दिसलं नाही. पहिल्यांदा असं झालं की मी स्पष्टपणे 'कम्युनल रॉयट', धार्मिक तणाव किंवा दंगल असे शब्द लिहिले आहेत."

पश्चिम बंगालच्या भूमीवर

या आधी कधी धार्मिक तेढ हा शब्द लिहिला गेला नव्हता. पश्चिम बंगालच्या भूमीवर हे पहिल्यांदाच घडत आहे. हे दुःखद आहे. हे फक्त याच भागासाठी नाही तर पूर्ण देशासाठी दुःखद आहे.

आसनसोल हे शहर औद्योगिक क्षेत्र आहे. आसनसोल जवळ असलेल्या राणीगंजची लोकसंख्या सव्वा लाख किंवा दीड लाख असेल. या भागातील वस्ती मिश्रित आहे. इथं दुसऱ्या राज्यातून लोक येतात.

विमल देव सांगतात, "भारतातली पहिली कोळशाची खाण राणीगंज येथे सुरू झाली होती. या ठिकाणी भारतातील वेगवेगळ्या भागातून लोक येऊन स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या भागाला मिनी इंडिया देखील म्हटलं जातं. 'गंगा-जमुना' संस्कृतीचा संगम हीच या भागाची ओळख आहे. असं कधीच वाटलं नव्हतं इथं धार्मिक तेढ निर्माण होऊन दंगल होईल."

इथले लोक, व्यापारी, समाजसेवक आणि स्थानिक नेत्यांनी दंगलीची दोन मुख्य कारणं सांगितली आहेत.

प्रशासनाची जबाबदारी

पहिली गोष्ट म्हणजे रामनवमीच्या मिरवणुकीवेळी झालेली घोषणाबाजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना ही स्थिती हाताळता आली नाही. त्यामध्ये ते पूर्णपणे अयशस्वी झाले असं ते सांगतात.

राणीगंज चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद खेतान सांगतात, "दंगली घडू न देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रामनवमीच्या मिरवणुकीवरून हा गोंधळ उडाला. गेल्या चार पाच वर्षांपासून रामनवमीला अशीच मोठी मिरवणूक निघते."

"सर्वांना माहीत होतं की मिरवणुकीला 10-15 हजार लोक असतील. त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त करणं ही प्रशासनाची जबाबदारी होती. सरकारची गुप्तहेर यंत्रणा बारीक-सारीक हालचालीवर लक्ष ठेऊन असते. त्याच आधारावर प्रशासन बंदोबस्त करतं. जर बंदोबस्त नसेल तर स्थिती कशी नियंत्रणात राहील?"

26 मार्चला दंगल झाली. अजून जनजीवन सुरळीत झालं नाही. कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. पण अजून पूर्ण समजलं नाही. सर्वांत जास्त नुकसान लोकांचे मनं दुभंगल्यामुळं झालं आहे. आमच्या शहरात गंगा जमुना संस्कृती नांदत होती. ते नुकसान मोठं आहे."

"आपसातल्या नात्यांमध्ये दरी निर्माण झाली याची आम्हाला जास्त चिंता आहे. दंगेखोर आग लावून निघून गेले पण आमच्या शहरातील लोकांची जखम भळभळत आहे त्याचं काय? सर्वांत जास्त त्रास याच गोष्टीचा आहे."

शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी हिंसाग्रस्त आसनसोल आणि राणीगंज भागाचा दौरा केला.

स्थानिक पोलीस राज्यपालांना सांगत होते, "मिरवणुकीतील लोक उत्तेजित झाले, डीजे आणि घोषणाबाजीनं तणाव निर्माण झाला आणि लोक समोरासमोर आले."

IPS अधिकारी शायक दास हे राज्यपालांना तिथल्या परिस्थितीबाबत सांगत होते. तितक्यात राणीगंजचे एक वयोवृद्ध पत्रकार तिथं आले आणि त्यांनी राज्यपालांच्या हाती आपलं व्हिजिटिंग कार्ड ठेवलं. राज्यपालांनी त्यांना विचारलं, इथं काय झालं? तर ते म्हणाले, "जे व्हायचं नव्हतं ते झालं. मी कधी असं नव्हतं पाहिलं. आपसात दरी पडली आहे. दोन भाऊ एकत्र मिळून मिसळून राहत होते ते त्यांच्यात दरी पडली आहे."

फोटो कॅप्शन,

राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी

राज्यपालांनी हटिया बाजाराला भेट द्यावी असं पत्रकारांना वाटत होतं पण पोलिसांनी सांगितलं त्या भागात ताफा जाऊ शकणार नाही.

राज्यपालांना हटिया बाजाराची स्थिती तर पाहू शकले नाही, पण बाजाराच्या कोपऱ्यावर असलेल्या मंदिरावरचा भगवा आणि जवळ असलेल्या मशिदीचा मिनार हटिया बाजाराकडे पाहत आहे. बिल्कुल तसंच जसं, राणीगंजचे लोक एकमेकांचा चेहरे पाहत आहे. जणू ते विचारत आहेत, "राणीगंजला काय झालं?"

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)